Thursday, January 30, 2020

'' चहा --पुराण ''

'' चहा - पुराण '' ------------------- '' मावळत्या वर्षातील अखेरच्या म्हणजे डिसेंबर महिन्यातील एका रविवारी जागतिक 'चहा- दिन' साजरा करण्यात आला. या जगात अनेक 'दिन' साजरे करण्यात येतात त्यामध्ये आता 'चहा-दिना'ची ची भर पडली आहे. अनेकांनी चहाचे घुटके घेत घेत त्यादिवशी 'चहा-दिन' साजरा केला असेल. तसे पाहता चहा म्हणजे जगातील असंख्य लोकांचे आवडते पेय. त्यामुळे हा 'टी-डे' 'टी-टाईम' न घेताच साजरा झाला असेल. वास्तविक भारतात ब्रिटिश लोक येण्यापूर्वी हा 'चहा' औषधालाही सापडत नव्हता, परंतु ब्रिटिश लोक भारतात आले ते 'चहा' घेऊनच आणि नंतर त्यांनी भारतीयांना या चहाचे असे जबरदस्त व्यसन लावले की, आज जगात इंग्लंड किंवा इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात जास्त लोक चहा पिणारे आहेत. असंख्य भारतीयांची रोजची सकाळच चहाने सुरुवात होते. ज्यादिवशी ज्यांना सकाळी चहा मिळाला नाही त्यादिवशी त्यांना ती सकाळच नव्हे तर अख्खा दिवस सुनासुना वाटून राहतो.अनेकजण तर सकाळी चहा पिल्याशिवाय अन्य कोणत्याही कामाला हात लावत नाहीत. काहीजणांचे ते 'स्फूर्तिपेय' आहे. चहाशिवाय त्यांना 'तरतरी' येत नाही त्यामुळे चहा हा अनेकांना 'अमृता' समान वाटतो. जणू काही पृथ्वीवरचे ते 'अमृत'च आहे अशा थाटात असंख्य लोक या चहाचा आस्वाद घेत असतात. म्हणूनच कदाचित पुण्यात केवळ 'अमृततुल्य चहा' मिळणारी कितीतरी दुकाने आहेत. 'अमृता' समान वाटणाऱ्या या चहाचे प्रकार तरी किती म्हणून वर्णावेत. 'साधा चहा', 'कटिंग चहा', 'स्पेशल चहा', 'मसाला चहा', 'मलई चहा', 'बासुंदी चहा', 'रबडी चहा', 'कडक चहा', 'कडक स्पेशल चहा', 'गोल्डन चहा' वगैरे वगैरे. त्यामध्ये आता नव्याने सांगायचे तर 'प्रेमाच्या चहा' चीही भर पडली आहे. अस्मादिक औरंगाबादला शिकत असताना तेथे चहाच्या टपरीवर 'मारामारी' नावाचा चहा मिळायचा. तो फारच 'चवप्रिय' आणि त्यामुळे 'लोकप्रिय' होता. ही 'मारामारी' म्हणजे 'साधा चहा' आणि 'स्पेशल चहा' यांचे मिश्रण असायचे. हे दोन्ही चहा पहिल्यांदाच मिसळताना या दोन्ही चहांची 'मारामारी' झालेली बहुधा त्या चहा दुकानदाराला दिसली असावी म्हणून त्याने त्या मिश्रणातून झालेल्या चहाला 'मारामारी' हे गोंडस नाव दिले असावे आणि 'मारामारी' करायला जरी नसली तरी 'पाहायला' कोणाला आवडत नाही त्यामुळेच 'ही 'मारामारी' लोकप्रिय झाली असावी.चहाच्या या प्रकारची यादी करायची म्हटले तर 'चहाच्या मळ्यातील चहाची 'पाने' अपुरी पडतील. 'तरुणाई' आणि चहा यांचे तर अतूट नाते आहे.कारण अनेक तरुणांना केवळ चहामुळे 'जिवाभावाचे मित्र भेटतात. केवळ मित्रच नाहीत तर मैत्रिणीही मिळतात आणि हो ! त्यातील एखादी नंतर जीवनाची साथीदारही झालेली असते. केवळ चहाच्या निमित्ताने एखाद्या सुंदर तरुणीची ओळख व्हावी म्हणून अनेक कॉलेज तरुण चहाचे 'व्यसनी' झाले आहेत. त्यामुळे निदान कॉलेजमधला तरुण तरी कोणी चहाची ऑफर दिली तर ती बहुधा नाकारीत नाही. कॉलेजचे पिरियड बुडवून कॉलेज कॅंटीनमध्ये (इकडे-तिकडे पाहत) चहाचे घुटके घेत घेत मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा यासारखे दुसरे सुख ते कोणते असेल. जवळजवळ प्रत्येक कॉलेज युवक अशा सुखात रममाण होऊनच आपल्या आयुष्याची पहिली पदवी घेत असतो. आमच्या कॉलेजमधील माझ्या एका वर्गमित्राचे कँटीन हेच 'कॉलेज' होते. कॉलेजचे तास 'बंक' करून तो सदासर्वदा कँटिनमध्येच चहा पिणाऱ्या मित्रांच्या गराड्यात असे. घरचा चांगला असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्याला चहा पाजणे हाच त्याने आपला 'स्वधर्म' मानला होता. अर्थात त्याचा हा 'स्वधर्म' त्याच्या चांगलाच फळाला आला. चहा पिता पिता त्याचे इतके मित्र झाले की तो एकेवर्षी कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून आरामात निवडून आला. आपल्या भावी काळातील राजकारण प्रवेशाचा श्रीगणेशा त्याने केवळ चहामुळे झालेल्या मित्रांच्या जोरावर केला होता. त्यामुळे कॉलेज कँटीन असो, कॉलेजजवळ असलेली कोण्या 'अण्णां'ची टपरी असो वा मोठे हॉटेल असो तेथे चहा पिणाऱ्या तरुणांची गर्दी ठरलेली असते. बदलता काळ लक्षात घेता 'चहाचा कट्टा' हा अनेक तरुणांचा 'माईलस्टोन' असतो असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. अशा या चहाचे व्यसन हे आरोग्याला घातक (विशेषतः तरुणाईच्या) आहे असे अनेक डॉक्टर्स सांगत असले तरी सहजासहजी हे व्यसन सोडायला कोणी तयार होत नाही कारण चहा हा आपल्या आदरातिथ्याचा अविभाज्य भाग बनला आहे. तुम्ही कोठेही जा तुमचे स्वागत या चहानेच होणार. चहाच्या जागी 'बासुंदी' जरी दिली तरी काहीजणांना ते 'स्वागत' अपुरेच वाटते. म्हणूनच 'बाईने कुंकूवाला आणि पुरुषाने घोटभर चहाला नाही म्हणू नये ' अशी नवी म्हण प्रचलित झाली असावी. एरवी घोटभर चहा औषधालाही न घेणारे काहीजण असतीलही मात्र या चहावर जगणारीही माणसे आहेत. दिवसाला २५-२५ कप चहा पिऊन ताजेतवाने राहणारे लोक जसे आहेत तसेच अन्न म्हणून केवळ चहाचे सेवन करणारे काहीजण सापडतील. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात चौकटीत आलेली बातमी मला चांगली आठवते. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेडेगावातील 'चतुरा' नावाची महिला ही केवळ चहा पिऊन जगत होती. दररोज ती न जेवता केवळ चहाच घ्यायची. कारण तिला चहा इतका अंगवळणी पडला होता की, चहा हेच तिचे 'भोजन' होते. दिवसातून ३०-४० कप चहा पिऊन ती शेतात राबायची. चहाशिवाय तिला खायला-प्यायला लागत नसे. तिचा संसार असा 'चहामय' झाला होता आणि केवळ तिच्या घरात नव्हे तर अख्ख्या पंचक्रोशीत 'चहावाली चतुरा' म्हणून ती प्रसिद्ध होती. चहाप्रेमींच्या अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. लातूरला आमच्या महाविद्यालयात सामान्य प्रशासन विभागात काम करणाऱ्या एका कारकुनाला चहा पिण्याचं इतके जबरदस्त वेड होते की, त्याचा ऑफिसमधील निम्म्याहून अधिक वेळ कॅंटीनमध्ये जात असे. कोणताही विद्यार्थी त्याच्या कामासाठी ऑफिसमध्ये गेला तेंव्हा हा कारकून कधीच जागेवर सापडायचा नाही. आणि जरी तो जागेवर सापडलाच तरी तो त्या विद्यार्थ्याला हमखास म्हणणारच, ''पाच मिनिटांनी या, तोपर्यंत मी चहा पिऊन आलोच. अशा या कारकुनाला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील 'फिशपॉन्ड' च्या कार्यक्रमात 'चला च्या प्यायला' असा शेलका आहेर मिळाला होता. परंतु तो त्याने 'लाईट-चहा' इतकाच लाईटने घेतला त्यामुळे त्याच्या चहा पिण्याच्या कार्यक्रमात मुळीच बदल झाला नाही. अलिकडच्या काळात तर भारतात 'चहा'चा गौरवाने उल्लेख होतो आहे. कारण एक सामान्य 'चहावाला' पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे टपरीवाल्या चहावाल्यालाही हल्ली फार महत्व प्राप्त झाले. त्याच्याकडे कधी नव्हे ते आदराने पाहिले जात आहे. 'चहावाला' पंतप्रधान होऊ शकतो यापासून प्रेरणा घेऊन आमच्या पुण्यातील एका इंजिनिअर झालेल्या मित्राने नोकरीच्या मागे न लागता चक्क चहाचे दुकान थाटले आहे.अर्थात आपल्याला मिळालेली इंजिनिअरिंगची डिग्री फ्रेम करून आणि त्याला हार घालून आपल्या चहाच्या दुकानात लावायला तो विसरला नाही. त्याचा 'कडक' चाय आता अनेकांची तल्लफ भागवितो आणि आमचा मित्र 'कडक' मध्ये ऐटीत फिरतो. खरे तर चहापानाच्या निमंत्रणाचे सर्वत्र स्वागतच होते. मात्र राजकारणात मात्र हे 'चहापान' नाकारले जाते असा नेहमीचाच अनुभव आहे राज्यविधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सरकारने आयोजित केलेल्या 'चहापान' कार्यक्रमावर विरोधी पक्षांतर्फे बहिष्कारच घातला जातो असा जणू इतिहास झाला आहे. अनेकदा सत्तारूढ असलेला पक्ष कधीकाळी विरोधी पक्षात असतो तर विरोधी पक्ष सत्तारूढ झालेला असतो तरीही या 'चहापाना'वर बहिष्कार हा ठरलेलाच असतो. निदान 'चहा' वरून तरी त्यांनी राजकारण करू नये. चहा पिऊन झाल्यानंतर उर्वरित कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार घालावा अशीच तमाम चहाप्रेमींची इच्छा असेल. असे हे 'चहा-पुराण' कितीही सांगायला गेले तरी अपुरेच पडेल. चहाचे घुटके घेत घेत ते ऐकायला अनेकांना आवडेल याबद्दल कोणाच्याही मनात शंका राहणार नाही हे मात्र खरे. ---- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )