Monday, October 7, 2019
'' सुहाना सफर और ..... '' कवी शैलेंद्र यांच्या गीतमय जीवन-प्रवासाची वाचनीय सफर
'' सुहाना सफर और ..... '' कवी शैलेंद्र यांच्या गीतमय जीवन-प्रवासाची वाचनीय सफर
--------------------------------------------------------------------------
' १९५० ते १९७० ही दोन दशके हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ मानला जातो. या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा 'गाणी' हा आत्मा होता. त्या काळांतील चित्रपटांतील गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. चित्रपटाच्या कथेला अनुरूप ठरलेली अनेक गाणी अतिशय अर्थपूर्ण असायची आणि त्या गाण्यांना श्रवणीय चाल देऊन अनेक संगीतकारांनी त्या गीतांना अजरामर केले होते. त्या काळातील संगीतकार आणि गायक-गायिका जसे प्रतिभावान होते तसेच गीतकार देखील प्रतिभावान होते. गीतकार शैलेंद्र हे त्यापैकीच एक होत. आजही त्यांची शेकडो लोकप्रिय गाणी असंख्य रसिकांच्या ओठांवरती रेंगाळतात आणि ते या गाण्यांचा आनंद लुटतात. अशा या प्रतिभासंपन्न कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवन प्रवास सुप्रसिद्ध लेखक विजय पाडळकर यांनी ;'' सुहाना सफर और ..... '' या ग्रंथात शब्दबद्ध केला आहे. शैलेंद्र प्रेमी रसिकांच्या दृष्टीने तो एक सुहाना दस्तऐवजच ठरला आहे.
चित्रपट अभ्यासक असलेले विजय पाडळकर हे चांगले ललित लेखकही आहेत. कवी शैलेंद्र यांच्या प्रत्येक गाजलेल्या गीतांवर लालित्यपूर्ण भाष्य करताना त्यांनी त्या गीताचा, संगीताचा आणि चित्रपटाचा माहितीपूर्ण आढावा घेतला आहे तसेच शैलेंद्र यांच्या अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यामुळे शैलेंद्र यांचा हा गीतमय जीवन प्रवास वाचनीय झाला आहे. कवी शैलेंद्र यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. अतिशय सामान्य कुळातील कुटुंबात जन्मलेले शैलेंद्र हे लहानपणापासूनच कविमनाचे होते. तसेच लय -सूर-ताल यांची त्यांना जन्मजात देणगी होती. लहानपणापासूनच ते डफली छान वाजवायचे आणि त्या डफलीच्या तालावरच त्यांना अनेक समर्पक शब्दरचना सुचायच्या. त्यातूनच ते कविता करायला लागले. ;पुढे शिकत असताना त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला. अतिशय संवेदनशील असलेले शैलेंद्र यांना सामाजिक अन्याय सहन होत नसे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक कवितांमधून दिसू लागले. आपल्या कविता लोकांना ऐकवणे त्यांना अतिशय आवडायचे त्यामुळे कविसंमेलनात त्यांचा सहभाग दिसू लागला. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेताना त्यांनी तुरुंगवासही भोगला मात्र नंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सामान्य नोकरी करावी लागली. ;नोकरीनिमित्तानेच ते मुंबईत आले. आणि एका कविसंमेलनात निर्माता-दिग्दर्शक राज कपूर आणि त्यांची ओळख झाली. शैलेंद्र यांची काव्यप्रतिभा पाहून राज कपूर यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मात्र केवळ पैशासाठी चित्रपटासाठी गीतलेखन करणे मनस्वी कवी असलेल्या शैलेंद्र यांना पटले नाही त्यामुळे राज कपूर यांना त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट शब्दात नकार दिला. परंतु विवाहानंतर संसारी बनलेल्या शैलेंद्र यांना खूप आर्थिक ओढाताण सहन करावी लागली त्यामुळे नंतर त्यांनी राज कपूर यांची ऑफर स्वीकारली. आणि तेथून शैलेंद्र यांच्या गीतांची चित्रपटसृष्टीवर जी 'बरसात' झाली त्यामध्ये असंख्य रसिक भिजून चिंब झाले.
शैलेंद्र यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेताना, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कवी शैलेंद्र गीतकार शैलेंद्र झाले आणि त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आणि त्या 'इष्टापत्ती'मुळे दुसऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसंगीतालाही चांगले वळण मिळाले हे लेखकाने केलेले भाष्य मनोमन पटते. राज कपूर यांचे आवडते गीतकार होते शैलेंद्र तर आवडते संगीतकार होते शंकर-जयकिशन. ;या 'त्रयी' ने एक इतिहास निर्माण केल्यामुळे राज कपूर यांचे सर्वच चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात त्यांना यश मिळाले. सुरुवातीच्या 'बरसात' पासून 'मेरा नाम जोकर' पर्यंत राज कपूर यांच्या सर्वच चित्रपटांचे गीतलेखन शैलेंद्र यांनी केले त्यातील गाजलेल्या अनेक अर्थपूर्ण गाण्यांचे श्री पाडळकर यांनी या पुस्तकात सुंदर विवेचन केले आहे. शैलेंद्र यांनी राज कपूर खेरीज बिमल रॉय (मधुमती, परख आदी ), हृषीकेश मुखर्जी (अनुराधा, अनाडी आदी ), विजय आनंद (गाईड) आदी अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठीही गीत लेखन केले . ('गाईड' साठी तर विजय आनंद यांना शेलेंद्रच हवे होते ) या चित्रपटातील गाजलेल्या सर्व गाण्यांचा तपशीलवार आढावाही या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्यातून शैलेंद्र यांच्या गीतलेखनातील खुमारी अधिक स्पष्ट होते.
'तीसरी कसम' हा शैलेंद्र यांची निर्मिती असलेला एकमेव चित्रपट. मात्र त्याच्या निर्मितीपासून शैलेंद्र यांच्या आयुष्याला जी उतरती कळा लागली ती कायमचीच. त्यातून त्यांची सुटका केली ती मृत्यूनेच. एका अर्थाने ;'तीसरी कसम' हा चित्रपट शैलेंद्र यांची शोकांतिकाच ठरली. त्यासंदर्भात पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील घटनांचेही विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. त्यातून 'तीसरी कसम' ची काव्यात्मता आणि शोकात्मता शैलेंद्र यांच्याच वाट्याला कशी आली हे अधोरेखित होते. याशिवाय गीतकार शैलेंद्र यांनी 'बरसात' (१९४९) पासून 'ममता की छाव मे' (१९८९) पर्यंत लिहिलेल्या असंख्य चित्रपटातील गीतांची (संगीतकार आणि गायक-गायिकांच्या नावासह ) देण्यात आलेली सूची ही देखील या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
---- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
विजू खोटे : जमिनीवर पाय असलेला सच्चा कलावंत
विजू खोटे : जमिनीवर पाय असलेला सच्चा कलावंत
-----------------------------------------
" अफाट प्रसिद्धी मिळूनही अभिनेते विजू खोटे यांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले कारण मराठी मातीत जन्मलेले ते एक सच्चा कलावंत होते. चित्रीकरणादरम्यान मराठी तसेच हिंदी चित्रपट कलाकारांना त्यांचा हा अनुभव नेहमीच यायचा. त्यांच्या निधनामुळे एक अजातशत्रू, मनमिळावू आणि अभिनयकलेवर मनापासून प्रेम करणारा सच्चा कलावंत हरपला आहे असेच म्हणावे लागेल.
अभिनेते विजू खोटे यांच्या निधनाचे वृत्त कानावर आले आणि चटकन डोळ्यासमोर उभा राहिला तो 'शोले' चित्रपटातला त्यांनी रंगविलेला 'कालिया' नावाचा डाकू आणि डाकूंचा सरदार असलेला अमजदखान याला उद्देशून म्हटलेला त्याचा तो अतिप्रसिद्ध डॉयलॉग ... '' सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं '' तसेच 'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील त्याने रॉबर्टच्या भूमिकेत '' बॉस, गल्तीसे मिस्टेक हो गयी '' हा स्वतःची चूक लक्षात आल्यावर प्रत्येक वेळी म्हटलेला डॉयलॉग. अभिनेते विजू खोटे चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकाच करायचे मात्र प्रत्येक भूमिका वेगळी असूनही ती प्रेक्षकांच्या लक्षात कशी राहील यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे 'या मालक' या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटापासून नंतर असंख्य हिंदी चित्रपटांत त्यांनी रंगविलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्या आणि मोठ्या पडद्यावरील एक प्रमुख 'ओळखीचे चेहरा' म्हणून ते नावारूपास आले.
विजू खोटे यांचा जन्म १९४१ साली मुंबईतील एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील नंदू खोटे हे देखील नाट्य आणि चित्रपट व्यवसायातील नावाजलेले कलावंत होते. तर विजू खोटे यांच्या 'काकी' दुर्गा खोटे या तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांच्या घरातच अभिनयकलेचे वातावरण होते. नंदू खोटे यांनी १९६४ साली 'या मालक' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आणि त्याद्वारे विजू खोटे यांची मोठ्या पडद्यावर 'एंट्री' झाली. 'या मालक' चे नायक-नायिका होते प्रसिद्ध विनोदी कलाकार मेहमूद आणि शुभा खोटे. मेहमूद यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. या चित्रपटाची नायिका असलेली शुभा खोटे ही विजू खोटे यांची सख्खी बहीण. खरे तर शुभा खोटे यांच्यामुळेच विजू खोटे यांना हिंदी चित्रपटांत भूमिका करण्याची संधी मिळाली. तो एक विलक्षण योगायोग होता असेच म्हणावे लागेल . त्याचा किस्सा खुद्द विजू खोटे यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता.
त्याचे असे झाले.... शुभा खोटे यांनी नुकतीच सहकलाकार म्हणून हिंदी चित्रपटात भूमिका करण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका देण्यासाठी एक हिंदी निर्माता खोटे यांच्या घरी आला. 'विजू' हे नाव थोडेसे स्त्रीलिंगी असल्यामुळे तो शुभा खोटे यांचे नाव विजू खोटे असे समजूनच तो भेटायला आला होता. आणि त्यादिवशी नेमक्या शुभा खोटे घरी नव्हत्या. त्याला सामोरे गेले ते विजू खोटे. आणि नंतर साहजिकच त्या निर्मात्याचा गैरसमज दूर झाला. मात्र त्या निर्मात्याला काय वाटले कोणास ठाऊक, तो विजू खोटे यांना म्हणाला की, मी आलो होतो तुमच्या बहिणीसाठी परंतु मी तुम्हालाही छोटीशी भूमिका देऊ शकतो तुमची इच्छा असल्यास तुम्ही ती भूमिका करू शकता. विजू खोटे यांनी यांची ही ऑफर स्वीकारली आणि अशा रीतीने विजू खोटे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री झाली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका केल्या. आपल्या बहिणीमुळे आपल्याला हिंदी चित्रपटात संधी मिळाली त्याबद्दलची कृतज्ञता ते कधीच विसरले नाहीत. एक कलाकार म्हणून शुभा खोटे आणि विजू खोटे ही गाजलेली बहीण-भावाची जोडी चित्रपटसृष्टीत एक अनोखे उदाहरण ठरली होती.
विजू खोटे यांच्या व्यक्तीमत्वामुळे त्यांना सुरुवातीला हिंदी चित्रपटात गुंड किंवा तत्सम भूमिका मिळाल्या. ('अशी ही बनवाबनवी' या मराठी चित्रपटात देखील त्यांनी एका गुंडाचीच भूमिका केली होती) मात्र कोणतीही भूमिका वाईट नसते या भूमिकेतूनच त्यांनी प्रत्येक भूमिका केली आणि ती प्रेक्षकांच्या कायम कशी लक्षात राहील अशा पद्धतीने पेश केली. वास्तविक शुभा खोटे यांचेच ते बंधू असल्यामुळे त्यांना विनोदी भूमिका करण्याची अधिक आवड होती. त्याप्रमाणे त्यांना विनोदी भूमिकाही मिळत गेल्या आणि त्याही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्या लक्षात राहिल्या. एक काळ तर असा होता की, एकीकडे खलप्रवृत्तीच्या भूमिका करताना त्यांनी दुसरीकडे त्याला विनोदाचीही डूब दिली. त्यामुळे त्यांनी रंगविलेला 'शोले' चित्रपटातील 'कालिया' त्याचप्रमाणे 'अंदाज अपना अपना' मधील 'रॉबर्ट' देखील प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून बसला. 'शोले' चित्रपटातील डाकूंचा सरदार असलेला अमजदखान याला उद्देशून म्हटलेला त्यांचा तो अतिप्रसिद्ध डॉयलॉग ... '' सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं '' खूपच गाजला आणि विजू खोटे यांना एका रात्रीत भारतभर प्रसिद्ध मिळाली. 'कालिया' च्या भूमिकेबद्दल त्यांना त्यावेळी अवघे २५०० रुपये मानधन मिळाले होते मात्र भूमिकेपुढे त्यांनी पैशाला कधीच महत्व दिले नाही त्यामुळे आजही जेंव्हा 'शोले' चित्रपट आठवतो तेंव्हा त्यातील त्यांचा हा प्रसिद्ध डॉयलॉग अगदी सहजतेने आठवून त्यांचा तो 'कालिया' डोळ्यासमोर येतो. एका छोट्याश्या भूमिकेबद्दल आणि एका डॉयलॉगमुळे एवढी प्रचंड प्रसिद्धी मिळालेले विजू खोटे हे एकमेव अभिनेते असतील. मात्र एवढी अफाट प्रसिद्धी मिळाली तरीही त्यांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले कारण मराठी मातीत जन्मलेले ते एक सच्चा कलावंत होते. चित्रीकरणादरम्यान मराठी तसेच हिंदी चित्रपट कलाकारांना त्यांचा हा अनुभव नेहमीच यायचा. समोरच्या कलाकारांची अडचण ओळखून ते त्यांना नेहमीच सहकार्य करायचे. त्यांच्या निधनामुळे एक अजातशत्रू, मनमिळावू आणि अभिनयकलेवर मनापासून प्रेम करणारा सच्चा कलावंत हरपला आहे असेच म्हणावे लागेल.
----- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
Subscribe to:
Posts (Atom)