Friday, June 25, 2021

'आणीबाणी"चे 'ते' अविस्मरणीय दिवस

'आणीबाणी"चे 'ते' अविस्मरणीय दिवस ------------------------------ '' तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ साली भारतात अचानक जारी केलेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरचा फार मोठा कलंक होता. जो नंतर लोकशाहीप्रेमी जनतेनेच पुसून टाकला. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ अशी तब्बल २१ महिने देशात आणीबाणी होती. 'त्या' आणीबाणीच्या कालखंडाला या महिन्यात ४६ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र त्या कालखंडातील काही आठवणी अजूनही ताज्या आहेत. १९७१ च्या बांगला देश युद्धात पाकिस्तानचा पराभव होऊन बांगला देशची निर्मिती झाली . या युद्धात भारताने पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्यासाठी बांगला देशाला सर्व प्रकारची मदत केल्याने हा विजय सुकर झाला. या विजयामुळे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच नाव झाले होते. त्यांचा अभूतपूर्व असा दबदबा निर्माण झाला. त्यामुळे त्यांचा एकछत्री अंमल सुरु झाला. देशापुढील महागाई, बेरोजगारी, काळाबाजार, नफेखोरी, भ्रष्टाचार आदी प्रमुख ज्वलंत प्रश्न मात्र कायम होते. त्यांच्याविरोधात सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन सुरु केले आणि त्यांनी 'संपूर्ण क्रांती' चा नारा दिला. जयप्रकाशजींच्या या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी तसेच रा. स्व. संघांनेही सक्रिय पाठींबा दिला. आंदोलनाला तरुण वर्गाचा वाढता पाठिंबा मिळू लागल्यामुळे पाहता पाहता हे आंदोलन देशभर पेटले. या आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून खवळलेल्या इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी मध्यरात्री अचानक 'आणीबाणी' जाहीर केली आणि विरोधी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांची धरपकड करण्यात येऊन त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. आणीबाणीत प्रामुख्याने रा. स्व. संघाला लक्ष्य करण्यात आले. संघावर बंदी घालण्यात आली आणि हजारो संघ-स्वयंसेवकांना अटक करून कारागृहात ठेवण्यात आले. नागरी स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला. सरकारविरुद्ध काहीही बोलण्यास आणि लिहिण्यास मनाई करण्यात आली. वृत्तपत्रांसाठी सेन्सॉरशिप लागू करण्यात आली. एक प्रकारे ती अघोषित हुकूमशाहीच होती. त्यावेळी माझी पत्रकारितेची नुकतीच सुरुवात झाली होती. मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाची ( बॅचलर ऑफ जर्न्यालिझम ) पदवी घेऊन मी नांदेड येथील 'प्रजावाणी ' या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून रूजू झालो होतो. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. ते नांदेडचेच असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावेळी नांदेडला फार मोठे महत्व प्राप्त झाले होते. शंकरराव चव्हाण यांची पहिल्यापासून 'कडक स्वभावाचे' मंत्री म्हणून ख्याती होती त्यातच देशात 'आणीबाणी' लागू करण्यात आल्यामुळे त्यांचा कारभार आणखीनच 'कडक' झाला आणि त्याचे प्रत्यंतर सर्वत्र येऊ लागले. मुख्यमंत्री चव्हाण नांदेडचे असले तरी नांदेडला 'आणीबाणी'ला विरोध झालाच त्यामुळे रा. स्व. संघ आणि जनसंघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह बऱ्याच जणांना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र एकदा खुद्द मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासमोरच आणीबाणीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आणि ती घटना सर्वत्र चर्चेची ठरली आणि तिचे नंतर दूरगामी परिणाम झाले. त्या घटनेला मी पत्रकार म्हणून साक्षी होतो. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याच शारदा भवन शिक्षण संस्थेच्या यशवंत महाविद्यालयात एक खास कार्यक्रम होता आणि त्याला मुख्यमंत्री चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून त्याला उपस्थित होते. त्यामुळे महाविद्यालयात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तत्कालीन पोलीस अधीक्षक मल्होत्रा हे जातीने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाला तरुण विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्या गर्दीत आधीपासूनच मध्यभागी दबा धरून बसलेल्या भास्कर ब्रम्हनाथकर या तरुण संघ-स्वयंसेवकाने मुख्यमंत्री चव्हाण यांचे भाषण सुरु होताच एकदम उठून जोरजोराने आणीबाणीच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणांमुळे सारी सभा अवाक झाली आणि एकदम शांतता पसरली. स्वतः मुख्यमंत्री चव्हाण हे देखील या घोषणांनी काही काळ स्तब्ध झाले त्यांनाही पुढे काही बोलण्याचे सुचेना. श्री ब्रह्मनाथकर हे अगदी मध्यभागी बसल्याने पोलीसही चक्रावले कारण त्यांनाही त्यांच्यापर्यंत लवकर जाता येत नव्हते. शेवटी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मल्होत्रा यांनी स्वतः पळत पळत जाऊन भास्कर ब्रम्हनाथकर यांस ताब्यात घेतले. खुद्द मुख्यमंत्र्यांसमोर त्यांच्याच गावात आणि त्यांच्याच शिक्षण संस्थेत ही घटना घडल्यामुळे हे प्रकरण आपल्यावर शेकणार म्हणून पोलीस अधीक्षक अतिशय चिडले आणि त्याचा परिणाम म्हणून पोलीस कोठडीत ब्रम्हनाथकर यांचा अतिशय क्रूर पद्धतीने छळ करण्यात आला. आणीबाणीनंतर 'आणीबाणीतील छळांच्या कहाण्या' सांगणारे जे पुस्तक प्रसिद्ध झाले त्यामध्ये प्रामुख्याने ब्रम्हनाथकर यांच्या छळाचीही हकिकत सांगण्यात आली आहे. त्यानंतरची एक घटना अशीच माझ्या कायम स्मरणात आहे. आणीबाणी असतानाच काही महिन्यानंतर इंदिराजींनी लोकसभेच्या निवडणूका जाहीर केल्या. त्यांच्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली अर्थातच काँग्रेसविरोधी उमेदवारांच्या प्रचारावर फारच मर्यादा आल्या होत्या. नांदेड लोकसभा मतदारसंघात, काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री चव्हाण यांच्याच यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य गो. रा. म्हैसेकर आणि जनता पक्षातर्फे शेकापचे नेते केशवराव धोंडगे असा सामना रंगणार होता. म्हैसेकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री चव्हाण यांची जुन्या मोंढ्यातील टॉवरसमोरील मैदानात पहिलीच सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला तरुणांची मोठी गर्दी होती. मुख्यमंत्री चव्हाण बोलायला उभे राहताच एका तरुणाने जोरात बोंब ठोकली. त्यापाठोपाठ अनेक तरुणांनी आणीबाणीच्या विरोधात आणि जनता पक्षाच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली. आणि सभेचा नूरच एकदम पालटला. मुख्यमंत्री चव्हाण यांनी कसेबसे आपले भाषण आटोपते घेतले आणि ते तेथून निघून गेले. व्यासपीठावरून ते निघून जाताच काँग्रेसची प्रचार सभा क्षणार्धात जनता पक्षाची प्रचारसभा झाली. तरुणांनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली आणि नागरिकांना जनता पक्षाला निवडून देण्याचे आवाहन केले. आणीबाणीच्या विरोधात जनता जागृत झाल्याचे ते चित्र नंतर अधिकाधिक गडद होत गेले आणि अपेक्षेनुसार त्या निवडणुकीत जनतेचा विजय झाला आणि जनता पक्षाचे केशवराव धोंडगे हे प्रचंड मतांनी विजयी झाले. ( केशवराव धोंडगे यांचे निवडणूक चिन्ह 'खटारा' (गाडा ) होते. त्यामुळे ''धोंडगे यांचा गाडा : दिल्लीला धाडा " ही निवडणूक काळातील घोषणा खूपच लोकप्रिय झाली होती ) केवळ नांदेडलाच नव्हे तर संपूर्ण देशात जनता पक्षाचा प्रचंड मोठा विजय झाला आणि केंद्रात पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. या निवडणुकीत खुद्द इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसचा सर्वत्र जबरदस्त पराभव झाला. आणि केंद्रातील काँग्रेसची सत्ता पहिल्यांदाच संपुष्टात आली. 'आणीबाणी'ला जनतेनेच सपशेल नाकारले होते आणि आपले लोकशाहीवरचे प्रेम आणखी दृढ केले होते. -------- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )

अनेक प्रश्न निर्माण करून गेलेला सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू

अनेक प्रश्न निर्माण करून गेलेला सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू --------------------------------------------- हरहुन्नरी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होऊन १४ जूनला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. मात्र त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. घरातील पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. एका तरूण अभिनेत्याचा अकाली दुर्देवी अंत सर्वांनाच चटका लावून गेला त्याचबरोबर अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेला. त्याच्या या आततायी कृत्याने केवळ चित्रपटसृष्टीत नव्हे तर देशातील त्याच्या लाखो चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्याच्या आत्महत्येच्या कारणांना नंतर अनेक फाटे फुटले. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील एका तरुण अविवाहित मंत्र्यांचे बॉलिवूडमधील कलाकारांशी असलेले मैत्रीसंबंध लक्षात घेऊन सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आला अशीही जोरदार चर्चा सुरुवातीला सुरू झाली होती. त्याचीही अनेक कारणे सांगण्यात येऊ लागली. बॉलिवूडमधील घराणेशाही, स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रस्थापितांकडून नवोदित आणि होतकरू अभिनेत्यांची होत असलेली गळचेपी, अल्पावधीत मोठे यश मिळविण्यासाठी चालू असलेली जीवघेणी स्पर्धा, आदी गोष्टींवरही चर्चा झडल्या. याशिवाय सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकाराने बॉलिवूडचे ड्रग्सशी असलेले कनेक्शन पुन्हा एकदा उघडकीस आले. याप्रकरणात सुशांतसिंग याच्या घरात राहणारी त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला तसेच सिद्धार्थ पिठानी या त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली. तपासात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग्स प्रकरण बाहेर आले आणि पुढे चालून दीपिका पदुकोण, रकुल प्रीती सिंग आदी अभिनेत्रींची चौकशीही झाली. त्याशिवाय सुरूवातीलाच सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात सुशांतसिंगने आत्महत्याच केली असा निष्कर्ष काढला होता. मात्र मुंबई पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीबाबत लगेच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. अर्थात त्यामागेही उघडपणे झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप होते . त्यातच सुशांतच्या वडिलांनी त्याचा खूनच झाला असा आरोप करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुशांतसिंग हा बिहारचा असल्याने बिहार सरकारनेही या वादात उडी घेतली आणि सुशांत सिंग याच्या वडिलांच्या मागणीला पाठिंबा दिला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सीबीआयने चौकशी सुरू केली. सुरुवातीला सीबीआयच्या चौकशीत सुशांतसिंग प्रकरणात फार मोठे 'घबाड' लागेल अशी हवा निर्माण झाली होती मात्र तसे काही दिसले नाही. आता वर्षभरानंतरही सीबीआयने सुशांतसिंग प्रकरणात आपला कोणताही निष्कर्ष दिलेला नाही. 'तपास चालू आहे' एवढेच सीबीआयतर्फे सांगण्यात आले आहे. आपल्याकडे कोणत्याही प्रकरणाचे कसे 'राजकीय भांडवल' केले जाते त्याचे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण हे उत्तम उदाहरण आहे. केंद्रात भाजपचे सरकार आणि महाराष्ट्रात भाजपविरोधी आघाडीचे सरकार (महाविकास आघाडी ) सत्तेवर असल्यामुळे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात हे 'राजकारण' प्रकर्षाने दिसून आले. त्याचा निरपेक्ष वृत्तीने केलेल्या तपासावर परिणाम होतो हेही अनेकांच्या लक्षात आले नाही. वास्तविक अशा तपासात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंधांचा प्रश्न येतोच कोठे ? परंतु सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात ही गोष्ट प्रकर्षाने दिसून आली त्यामुळे तपास यंत्रणांवर कसा दबाव येतो हेही अधोरेखित झाले. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस, सीबीआय प्रमाणेच अतिरिक्त संचालनालय तसेच ड्रग्सविरोधी पथकाने तपास केला. यानिमित्त बॉलिवूडमधील कलाकार ड्रग्जच्या विळख्यात कसे अडकले आहेत हेही स्पष्ट झाले. सुशांतसिंगची मैत्रीण रिया चक्रवर्तीने तर त्याची कबुलीच दिली आहे. रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती सध्या जामिनावर मुक्त आहेत. मात्र रियाच्या जबाबामुळे बॉलिवूडमधील कलाकारांचे परस्परांशी कसे 'मुक्त संबंध' आहेत हेही दिसून आले. ड्रग्स प्रकरणाच्या मुळाशी जाऊन बॉलिवूडमधील 'रॅकेट' उद्ध्वस्त करण्याची नामी संधी यानिमित्ताने अमलीपदार्थ विरोधी संचालनायला मिळाली आहे. हे मात्र खरे. मात्र अंतिम तपासात त्यातून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. चित्रपटसृष्टीत कसलाही वारसा नसलेला वा साधी ओळख-पाळख नसलेल्या सुशांतसिंगने अतिशय अल्प काळात मिळविलेले यश कौतुकास्पद होते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेद्वारे आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या सुशांतसिंगने 'काय पो छे' द्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि अल्पावधीतच तो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला. गेल्याच वर्षी ( म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर ) प्रदर्शित झालेला 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा चित्रपट. त्यामध्ये त्याने खेळकर, बिनधास्त ( हॅप्पी-गो लकी ) तरुणाची भूमिका फार चांगल्या प्रकारे निभावली होती. असा हा अभिनेता आपल्या जीवनाचा शेवट असा अनपेक्षितपणे करू शकतो यावर अनेकांचा साहजिकच विश्वास बसला नाही. यानिमित्ताने तरुणांच्या मानसिकतेचा मुद्दा चर्चिला गेला. मृत्यूपूर्वी सुशांतसिंग हा देखील मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार चालू होते असे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. त्या 'बेचारा' सुशांतसिंगच्या मानसिक आजाराचे रहस्य काय असावे ? त्याचाही शोध घेण्याची गरज आहे. थोडक्यात सुशांतसिंग राजपूत या तरुण अभिनेत्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्या सर्वांचीच उत्तरे मिळणे आवश्यक आहेत. त्यामध्ये 'राजकारण' आणू नये एवढीच अपेक्षा आहे. ----- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )

Sunday, June 13, 2021

'राष्ट्र सेवा दला' तील नवी दलदल

'राष्ट्र सेवा दला' तील नवी दलदल --------------------------- " राष्ट्र सेवा दलाचे एकेकाळी खूप नाव होते. प्रामुख्याने समाजवादी विचारांच्या तरुणांची संघटना म्हणून तिचा बोलबाला होता. कारण समाजवादी नेत्यांनीच पुढाकार घेऊन राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली होती. आणि हे सर्व समाजवादी नेते महाराष्ट्रातील असल्याने प्रामुख्याने महाराष्ट्रातच तरुणांची एक प्रभावी संघटना म्हणून राष्ट्र सेवा दल उदयास आली. वास्तविक ब्रिटिश राजवटीविरुध्द काँग्रेसने सुरू केलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काँग्रेसमधील काही तरुण नेत्यांना तरुण मुलामुलींसाठी जाती-धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे धडे देण्यासाठी युवक संघटनेची गरज भासू लागली. या विचारातूनच ना. सु. हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली १९२३ साली 'हिंदुस्थान सेवा दल ' या संघटनेची स्थापना करण्यात आली. मात्र नंतर ब्रिटिशांनी ही संघटना बेकायदा ठरविल्याने कालांतराने तिचे अस्तित्व संपुष्टात आले. पुढील काळात स्वातंत्र्य चळवळीला आणखी जोर चढला आणि काही सांप्रदायिक संघटनाही त्यामध्ये सामील झाल्या. त्याला विरोध करण्यासाठी शिरूभाऊ लिमये, ना. ग. गोरे. एस. एम. जोशी. साने गुरुजी आदी तत्कालीन समाजवादी विचारांच्या नेत्यांनी ४ जून १९४१ रोजी पुणे येथे तरुणांचे एक खास शिबीर घेऊन त्यामध्ये राष्ट्र सेवा दलाची पुनर्स्थापना केली. जनमानसात समाजवादी विचार रुजविण्यासाठी स्थापन केलेली युवकांची एक संघटना म्हणून सुरुवातीला तिला चांगला प्रतिसाद मिळत गेला. शिवाय रा.स्व. संघाच्या शाखा आणि रा. स्व.. संघानेच स्थापन केलेल्या अ. भा. विद्यार्थी परिषदेसारख्या युवक संघटनेला एक सक्षम पर्याय म्हणून तरुण वर्गात तिचा प्रसार करण्यात येऊ लागला. रोज सायंकाळी भरणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत वैचारिक, बौद्धिकतेबरोबरच शारीरिक खेळ, कवायतींचेही धडे देण्यात येऊ लागले. त्यामुळे समाजवादी विचाराचे असंख्य युवक या संघटनेत सामील होऊ लागले आणि संघटनेला राज्यात चांगली बळकटी आली. (आजही मुंबई, पुणे नाशिक आदी शहरांत राष्ट्र सेवा दलाच्या शाखा सक्रिय आहेत ) याशिवाय राष्ट्र सेवा दलाने कलापथकाचीही निर्मिती केली. शाहीर अमर शेख, शाहीर लीलाधर हेगडे, कविवर्य वसंत बापट, निळू फुले, दादा कोंडके यांनी सुरुवातीच्या काळात या कलापथकांद्वारे सामाजिक व राजकीय जागृती मोठ्या प्रमाणावर केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर या कलापथनाने भरीव कामगिरी केली. मात्र बदलत्या काळानुसार या कलापथकाला साहजिकच नंतर उतरती कळा लागली. तसेच समाजवादी चळवळीला लागलेल्या फुटीच्या ग्रहणाचा फटका राष्ट्र सेवा दलालाही बसला. त्यामुळे एक काळ असा आला की , 'राष्ट्र सेवा दल' म्हणजे फक्त तरुण-तरुणींचे प्रेम करण्याचे एकमेव ठिकाण आहे असे गंमतीने म्हटले जाऊ लागले. राष्ट्र सेवा दलात काम करण्यासाठी एकत्र आलेल्या अनेक समाजवादी कार्यकर्त्यांचे प्रेमविवाह हा त्याकाळी चर्चेचा विषय झाला होता. ( नंतर मात्र बदलत्या काळानुसार बस स्टॉप, उद्याने आदी सार्वजनिक ठिकाणीही तरुण-तरुणींचे 'प्रेम' जमू लागले त्यामुळे साहजिकच राष्ट्र सेवा दलाला उतरती कळा लागली आणि या संघटनेविषयीचे तरुणांमधील औत्स्युक संपत गेले असावे ) राष्ट्र सेवा दल या संघटनेविषयी एवढा उहापोह करण्याचे मुख्य कारण म्हणजे अलीकडेच म्हणजे चार जूनला पुण्यात राष्ट्र सेवा दलाचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. मात्र या स्थापनादिवशीच संघटनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. राष्ट्र सेवादलाचे विद्यमान अध्यक्ष गणेश देवी आणि उपाध्यक्ष कपिल पाटील यांच्याविरोधात संघटनेतीलच मिहीर थत्ते आणि त्यांच्या समर्थकांनी उपोषण केले आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्याचा प्रयत्न केला. अन्यायाचे कारण काय तर काही कार्यकर्त्यांचे संघ आणि भाजपशी असलेले संबंध आणि त्याला पदाधिकाऱ्यांनी घेतलेली हरकत. त्यामुळे हा स्थापना दिन चांगलाच गाजला. मिहीर थत्ते हे ज्येष्ठ समाजवादी यदुनाथ थत्ते यांचे चिरंजीव आहेत. एकेकाळी यदुनाथ थत्ते यांनी मोठ्या मोठ्या निष्ठेने राष्ट्र सेवा दलाचे कार्य केले होते. परंतु मिहीर थत्ते हे स्वतःचे महत्व वाढविणारे एक स्वयंभू कार्यकर्ते असल्यामुळे 'एक उपदव्यापी माणूस' म्हणूनच त्यांची सध्या ख्याती आहे. अशा माणसाला गणेश देवी यांच्यासारखे साधे, सोज्ज्वळ व्यक्तिमत्व कसे मानविणार? त्यातच गणेश देवी हे पडले मोदी - पर्यायाने भाजपाविरोधक त्यामुळे राष्ट्र सेवादलात सुंदोपसुंदी सुरू झाली नसल्यासच नवल. वास्तविक पाहता गणेश देवी यांचा यापूर्वी कधी राष्ट्र सेवा दलाच्या कार्याशी प्रत्यक्ष काही संबंध आल्याचे ऐकिवात नाही केवळ समाजवादी विचारसरणीचे म्हणूनच त्यांना अध्यक्ष केले असावे. एक विद्वान, बोलीभाषेचा अभ्यासक आणि आदिवासी परंपरेचा अभिमान असणारा आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करणारा एक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता अशीच गणेश देवी यांची ओळख आहे. मोदी-विरोधकांच्या 'दक्षिणायन' चळवळीला प्रोत्साहन देता देता त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे उत्तरदायित्व घेण्याचे 'उत्तरायण' का आणि कधी केले हे अनेकांना कळलेच नाही. कदाचित पंतप्रधान मोदी आणि पर्यायाने भाजपाला विरोध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनेसारखे एक मोठे व्यासपीठ पाठीशी असावे म्हणून त्यांनी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्षपद स्वीकारले असावे असे वाटते. कदाचित हीच बाब राष्ट्र सेवा दलातील संघ आणि भाजपाला अनुकूल असणाऱ्या कार्यकर्त्यांना खटकली असावी. त्यामुळेच त्यांच्या विरोधात स्थापना दिवशीच उपोषणाचे अस्त्र वापरण्यात आले असावे. याबाबत अध्यक्ष गणेश देवी यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही मात्र हा अंतर्गत विरोध वाढतच गेला तर राष्ट्र सेवा दलात आणखी दरी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधीच मरणपंथाला लागलेल्या राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनेचे पुढे काय होणार ? याचीच चिंता अनेकांना वाटत असेल हे मात्र निश्चित. ---- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी - ९४ २२३ १९१४३ )

Thursday, June 10, 2021

संघर्षशील लोकनेता गोपीनाथ मुंडे

संघर्षशील लोकनेता गोपीनाथ मुंडे ------------------------- '' महाराष्ट्रातील भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना स्वर्गवासी होऊन पाहता पाहता सात वर्षे झाली. तीन जून २०१४ रोजी दिल्लीत झालेल्या एका मोटार अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. एका वादग्रस्त आणि झुंजार लोकनेत्याची अशा पद्धतीने अखेर झाल्यामुळे साहजिकच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला होता त्याचे प्रत्यंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आलेच. शोकसंतप्त जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यातूनच मुंडे यांच्या लोकनेतेपदाची प्रचिती येते. अ. भा. विद्यार्थी परिषदेचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री असा गोपीनाथ मुंडे यांनी केलेला राजकारणाचा प्रवास खरोखरच थक्क करणारा होता. मराठवाड्यातील परळीजवळच्या नाथ्रा या छोट्या खेडेगावात बालपण घालविलेला, शाळेची इमारत नाही म्हणून झाडाखाली भरणाऱ्या शाळेत शिकलेला गोपी नावाचा मुलगा पुढे चालून महाराष्ट्राचा एक लोकनेता होईल असे त्यावेळी कोणी सांगितले असते तर त्याला लोकांनी निश्चितच वेड्यात काढले असते मात्र जिद्द, संघर्ष आणि झुंजार वृतीने केलेले राजकारण यांच्या आधारे गोपीनाथ मुंडे यांनी 'लोकनेतेपद' मिळवून दाखविले. आजही बहुजन समाजाचा एक आदरणीय नेता नेता म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रात घेतले जाते. परळीतील शालेय शिक्षणानंतर गोपीनाथ मुंडे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी म्हणून अंबेजोगाईत आले आणि तेथे त्यांचा प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचा परिचय झाला. महाजन यांची भेट त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली असेच म्हणावे लागेल. महाजन यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम सुरु केले. त्यातूनच मुंडे यांचे नेतृत्व घडत गेले. १९७५ साली इंदिरा गांधी यांनी देशात आणलेली आणीबाणी महाजन आणि मुंडे यांच्या दृष्टीने जणू काही इष्टापत्तीच ठरली. तुरुंगवासात असताना दोघांनीही आपली वैचारिक बैठक पक्की केली. महाजन यांच्याशी असलेली त्यांची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली पुढे या मैत्रीचे नात्यातच रूपांतर झाले. महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा यांच्याशी मुंडे यांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे मुंडे यांच्या कार्यकर्तृत्वाला आणखी वाव मिळाला. विद्यार्थी परिषदेनंतर जनसंघ युवा आघाडी, नंतर जनसंघ आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास महाजन यांच्याबरोबरच झाला. प्रमोद महाजन यांचे वैचारिक नेतृत्व आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा दांडगा लोकसंपर्क असलेला बहुजन समाजाचा नेता यामुळे महाराष्ट्रात हळूहळू भाजपची पाळेमुळे रुजू लागली. एक काळ असा होता की महाजन-मुंडे यांच्याशिवाय महाराष्ट्रात भाजपचे पान हालत नसे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात सत्ता मिळविणे खूप अवघड काम आहे हे ओळखून शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षाच्या सहकार्याने आपण सत्ता मिळवू शकतो हे महाजन-मुंडे यांनी वेळीच ओळखले होते त्यामुळे त्यांनी शिवसेनेशी युती करण्याबाबत पुढाकार घेतला. तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी उभयतांशी असलेली खास मैत्री हा तर राजकारणातील चर्चेचा एक खास विषय होता. सेनेच्या मदतीने गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्यात 'संघर्ष-यात्रा' काढून काँग्रेस सरकारविरुद्ध रान पेटवून दिले. त्याचाच परिणाम म्हणून की काय १९९० साली महाराष्ट्रात प्रथमच भाजप-सेना युतीचे सरकार सत्तेवर आले. आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. महाजन-मुंडे यांचे एक स्वप्न साकार झाले होते. परंतु अनेकदा राजकारणात विरोधकांबरोबरच नियतीही उलटे फासे टाकत असते. प्रमोद महाजन यांची आकस्मिक हत्या झाल्यामुळे आणि मारेकरी घरचाच निघाल्यामुळे मुंडे यांना लोकनिंदेला सामोरे जावे लागले. महाजन यांच्यासारखा आधारवडच अचानक गेल्यामुळे ते खूप खचले. त्यातच पक्षांतर्गत विरोधकांनी डोके वर काढायला सुरुवात केल्यामुळे काही काळ ते एकाकी पडले मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील आपले महत्व त्यांनी कमी होऊ दिले नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजपतर्फे उभे असलेले मुंडे प्रचंड मतांनी निवडून आले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केन्द्रात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले. मात्र केंद्रीय मंत्री होण्यासाठी आणि महत्वाचे खाते मिळण्यासाठी मुंडे यांना तेथेही संघर्ष करावाच लागला. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन आठ-दहा दिवसही झाले नसतील तोच मुंबईला येण्यासाठी निघालेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यावर काळाने अचानक घाला घातला आणि मोटार अपघातात त्यांचे दुर्देवी निधन झाले. एका संघर्षशील लोकनेत्याची अशी शोकांतिका झाली. त्यांच्या स्मृतीनिमित्त नुकतेच ३ जून रोजी परळी येथील गोपीनाथ गडावर झालेल्या एका खास कार्यक्रमात केंद्र सरकारतर्फे टपाल-पाकिटाचे अनावरण करून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली हेही नसे थोडके.आधी प्रमोद महाजन, नंतर विलासराव देशमुख आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनाने केवळ मराठवाड्याची नाही तर महाराष्ट्राची हानी झाली हे कोणीही मान्यच करेल. ---- श्रीकांत नारायण

Wednesday, June 2, 2021

'योगबाजारी' गुरू रामदेवबाबा

'योगबाजारी' गुरू रामदेवबाबा ------------------------- '' गेल्या काही दिवसापासून योगगुरू रामदेव बाबा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. देशात आणि साऱ्या जगातच सध्या थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या संदभात रामदेव बाबा यांनी 'अलोपॅथीच्या उपचारांनाच आव्हान दिले आहे. आपल्या दैनंदिन शिबिरात योग शिकविता शिकविता अखंड बडबड करणाऱ्या रामदेव बाबांनी अलोपॅथीच्या औषधांनाच आक्षेप घेतला आहे. असल्या औषधांनी कोरोना कधीच बरा होणार नाही असे सांगताना त्यांनी आयुर्वेदिक औषधांची ( म्हणजे त्यांनी स्वतःच तयार केलेल्या ) भलामण केली आहे. गेल्या काही वर्षात रामदेव बाबांनी 'योग' शिकविता शिकविता स्वदेशीचा मूलमंत्र जपत आपला 'एक डोळा' त्याच्या 'बाजारीकरणाच्या' फायद्यावर कसा ठेवला हे सांगायची आता आवश्यकता नाही. योग आणि आयुर्वेदाच्या प्रसारासाठी त्यांनी बघता बघता स्वतःचे 'दुकान' उघडले आणि त्याद्वारे आता 'मीठा' पासून 'आट्या' पर्यंत सारे पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत. देशातील अनेक शहरात उभारण्यात आलेल्या 'पतंजली मॉल' मार्फत या पदार्थांची विक्री केली जाते. गेल्यावर्षीच त्यांनी कोरोनावर हमखास उपाय म्हणून 'कोरोनील' नावाच्या गोळ्या बाजारात आणल्या होत्या मात्र त्या औषधाला केंद्रीय आरोग्य खात्यानेच चाचणीअंती अधिकृत परवानगी न दिल्यामुळे रामदेवबाबांचा भ्रमनिरास झाला तरीही या गोळ्या अजून बाजारात विकल्या जात आहेतच. अर्थात त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही ही गोष्ट वेगळी. रामदेवबाबांनी घेतलेल्या 'अलोपॅथीच्या औषधांच्या ' आक्षेपांना साहजिकच इंडियन मेडिकल असोसिएशनने (इमा ) तीव्र हरकत घेतली आहे.रामदेवबाबांविरूद्ध एक हजार कोटींचा दावा करताना 'इमा'ने त्यांच्याविरूद्ध राजद्रोहाचा खटला भरण्याची आणि त्यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी विचारणा करताच त्यांनी आपण 'ते' विधान मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे मात्र त्याचबरोबर दुसरीकडे रामदेवबाबांनी योग शिकविता शिकविताच आडवे होत '' मला अटक करायची कोणाच्या बापाची हिम्मत आहे '' अशा शब्दात 'इमा' ला आव्हान दिले आहे. रामदेवबाबांचे देशाच्या 'प्रधान सेवकांशी' असलेले सख्य लक्षात घेता त्यांचे हे म्हणणे बरोबरच आहे. रामदेवबाबांवर लगेच कारवाई होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळेच शेफ़ारलेल्या रामदेवबाबांनी आपली 'अलोपॅथीविरुद्धची मोहीम' चालूच ठेवली आहे. " अलोपॅथी म्हणजे 'मूर्ख विज्ञान' आहे असे सांगताना रामदेवबाबा यांनी, ऍलोपॅथीच्या उपचारांनाच आव्हान दिले आहे. अलोपॅथीवर टीका करतांना त्यांनी कोरोनावरील उपचारासाठी वापरलेली रेमडिसीव्हरसहित अन्य औषधे कशी कुचकामी ठरली व त्यामुळे हजारो रुग्णांचे कसे बळी गेले त्याचा पाढा वाचला आहे. कोरोनामुळे अनेक डॉक्टरांचाही मृत्यू कसा झाला? असा सवालही त्यांनी केला आहे तसेच मधुमेहासारख्या रोगावर अलोपॅथीचे रामबाण औषध नाही उलट त्यावरील अलोपॅथीच्या औषधांनी साईड इफेक्ट होतात असाही त्यांनी दावा केला आहे. थोडक्यात यानिमित्ताने आयुर्वेदाच्या प्रचारासाठी त्यांनी ऍलोपॅथीच्या औषधांविरुद्ध जाणीवपूर्वक मोहीम उघडलेली दिसते. रामदेवबाबांच्या या विधानाचा तीव्र निषेध करताना इंडियन डॉक्टर्स फेडरेशनने एक जून रोजी संपूर्ण देशात 'काळा दिवस' पाळला. रामदेवबाबांच्या अलोपॅथीविरुद्धच्या अपप्रचाराला वेळीच आवर घालावा अशी मागणीही डॉक्टर्स फेडरेशनने केली आहे. रामदेवबाबांच्या या 'उठाठेवी'बद्दल बिहार प्रदेश भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. रामदेवबाबा 'योगा' मध्ये निश्चितच पारंगत आहेत परंतु त्यांनी 'योगा' चा 'कोकाकोला' सारखा 'स्वस्त प्रसार' केला. तसेच एक 'योगी' म्हणून त्यांच्यात खूप उणीवा आहेत असे संजय जयस्वाल यांनी म्हटले आहे. थोडक्यात रामदेवबाबा हे फक्त योगगुरू आहेत, 'योगी' नाहीत असे जयस्वाल यांचे स्पष्ट म्हणणे आहे. भाजपचे नेते असलेले जयस्वाल हे स्वतः उत्तम डॉक्टर आहेत. मात्र रामदेवबाबा यांच्यासारख्या वाचाळवीरांकडे 'इमा'ने दुर्लक्षच करावे असाही सल्ला त्यांनी दिलाआहे तसे पाहता रामदेवबाबा हे 'योगी' नाहीत हे यापूर्वीही सिद्ध झाले आहे. काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन चालू असताना या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले रामदेवबाबा व्यासपीठावर असतानाच पोलिसांनी लाठीमार व अटकसत्र सुरु केले त्यावेळी हेच रामदेवबाबा एका महिलेची ओढणी (दुपट्टा ) घेऊन त्याच्या सहाय्याने आपले तोंड झाकून तेथून पळून गेले होते. एखादा खराच 'योगी' पुरूष असता तर त्यांच्यावर अशी पाळी आली नसती. अशा प्रसंगाला त्यांनी धीराने तोंड दिले असते. 'योगा' च्या प्रसाराबरोबरच रामदेवबाबांनी स्वतःची आणि स्वतःच्या संस्थांची इतकी प्रसिद्धी आणि मार्केटिंग' करून घेतले की त्यांच्या हरिद्वार येथील 'पतंजली योगविद्यापीठ' आणि 'पतंजली आयुर्वेद लि.' या संस्था अल्पावधीतच भरभराटीला आल्या. देशात ठिकठिकाणी सशुल्क योगशिबिरे आयोजित करणे आणि त्यामध्ये 'पतंजली' ने उत्पादित केलेल्या मालाचा प्रसार करणे या दोन गोष्टींमुळे त्यांची आर्थिक भरभराटही खुप लवकर झाली. योगप्रसारासाठी त्यांनी स्वतःचे ''आस्था' हे चॅनेल सुरू केले. रामदेवबाबांना तसा प्रसिद्धीचा खूप हव्यास दिसतो. त्यासाठी ते वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करताना दिसून येतात. 'इंडियन आयडॉल', 'कपिल शर्मा शो' यासारख्या रिऍलिटी शो मध्ये देखील ते बिनधास्तपणे सहभागी होतात. एका रिऍलिटी शो मध्ये ते कुस्तीही खेळले आहेत. मध्यंतरी त्यांनी हत्तीवर बसून योगासने करण्याचा प्रयोग केला होता. अर्थात तो यशस्वी झाला नाही कारण तसा प्रयोग करणे त्या हत्तीलाच आवडले नसावे त्यामुळे त्या हत्तीनेच त्यांना आपल्या पाठीवरून सरळ खाली फेकून देऊन शीर्षासन करण्यास भाग पाडले. काहीजण 'उंटावरचे शहाणे' असतात मात्र रामदेवबाबा यांनी स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी 'हत्तीवरचे शहाणे' होण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळेच त्यांचा हा 'स्टंटबाजी'चा प्रयोग फसला असावा. कदाचित रामदेवबाबांची अलोपॅथीविरुद्धची वादग्रस्त विधाने हे देखील 'प्रसिद्धीसाठी केलेला स्टंटही असू शकतो. त्याचबरोबर आपला माल खपावा हाही त्यामागे एक प्रमुख उद्देश असू शकतो. आपल्याविरूद्ध देशातील सर्व अलोपॅथी डॉक्टरांनी तक्रार केली तरीही काहीच कारवाई होणार नाही याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे रामदेवबाबाचे हे प्रकरण म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळच ठरण्याची शक्यता आहे. कारण आपल्या योगशिबिरात राजकीय नेत्यांना आवर्जून बोलावून त्यांना आपल्या 'पाया' पडायला लावणारे रामदेवबाबा पक्के 'राजकारणी' आहेत. त्यामुळेच त्यांना 'योगगुरू' म्हणण्याऐवजी 'योगबाजारी' म्हणणे अधिक संयुक्तिक ठरणार आहे. --- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )

नितीन गडकरी : एक समंजस आणि कार्यक्षम नेता

नितीन गडकरी : एक समंजस आणि कार्यक्षम नेता ---------------------------------------- गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात वारे-वादळांना तोंड देत एक 'गड' मजबुतीने उभा आहे. हा 'गड' नित्य 'नितीन' आहे. नवनवीन कल्पना हा त्याचा श्वास आहे त्यामुळे विकासाचा गाडा सुंदर आणि गुळगुळीत रस्त्यावर चालविण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे हा 'गड' आता केवळ महाराष्ट्राच्या पातळीवर मर्यदित राहिला नाही तर केंद्रीय पातळीवर त्याची ख्याती झाली आहे. एक कार्यक्षम मंत्री म्हणून विरोधक देखील त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतात. हा 'गड' कोणता आणि 'गडकरी' कोण हे एव्हाना तुम्ही ओळखलेच असेल. विकासाच्या रस्त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारा हा 'गडकरी' केवळ महाराष्ट्रातील जनतेच्या नव्हे तर देशातील जनतेच्या आशेचा केंद्र बनला आहे. सत्ता असूनही तिच्यावर कायम तुळशीपत्र ठेवण्याच्या तयारीत असणारा आणि विकासासाठी 'सत्ता' कशी राबवावी याचे एक आदर्श उदाहरण असणारा हा 'गडकरी' राजकारणात तर विरळाच म्हणावा लागेल. पट्टीचा खवय्या असणारा हा गडकरी जे ओठातून पोटात जाते त्याचीच सदैव जाणीव ठेवणारा आहे आणि त्यामुळे राजकारणात असूनही 'जे पोटात तेच ओठात' असे बोलणारा आणि त्याप्रमाणे वागणाऱ्या या नेत्याने एक समंजस राजकारणी म्हणून लोकप्रियता मिळविली आहे. लोकसभेत नागपूर शहराचा 'गड' सांभाळणारे नितीन गडकरी मूळचेच चळवळ्या स्वभावाचे आहेत. लहानपणी रा. स्व. संघाचे संस्कार झालेले गडकरी कॉलेज जीवनात अ. भा. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. वैचारिक बैठक पक्की झाल्यावर ते नंतर जनसंघात आणि भाजपमध्ये गेले. निवडणुकीत कधी विजय तर अनेकदा पराजय याचा अनुभव घेत घेत त्यांनी राजकारणात आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली. पराजयामुळे ते कधी खचले नाहीत वा विजयानेही कधी हुरळून गेले नाहीत. १९८० मधील प्रसंग त्याची एक साक्ष आहे. जनता पक्षात विलीन झालेल्या जनसंघाने जनता पक्षातून बाहेर पडताना ''भारतीय जनता पक्ष '' या नावाने नव्या राजकीय पक्षाचे रूप धारण केले. नव्या पक्षाची उभारणी होत असतानाच १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला लोकसभेत अवघ्या दोनच जागा मिळाल्या. अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे दिग्गज नेते त्या निवडणुकीत पराभूत झाले कारण तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत सर्वच काँग्रेसविरोधी पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले होते. त्यामुळे भाजपमध्ये कमालीचे नैराश्य निर्माण झाले. स्वतः नितीन गडकरी यांना '' या पक्षात आता तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भवितव्य उरले नाही त्यामुळे तुम्ही दुसऱ्या पक्षाचा आश्रय घ्या असे सांगण्यात येऊ लागले परंतु वैचारिक बैठक पक्के असलेले गडकरी ठाम होते. पक्षाच्या दारुण पराभवातच त्यांनी पक्षाचे उज्ज्वल भवितव्य पाहिले आणि बाजपेयी-अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षकार्याला त्यांनी नव्या जोमाने बांधून घेतले. त्याची फलनिष्पत्ती म्हणून की काय, त्याच्या पुढील निवडणुकीत भाजपच्या खासदारांची संख्या दोनवरून एकदम ८४ वर गेली आणि नंतर वाढत वाढत जाऊन दहाच वर्षात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीए आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. सुरुवातीच्या काळात नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातच आपले लक्ष्य केंद्रित केले. नागपूरमधून भाजपचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेनेच्या आघाडी मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले. आपल्या आवडत्या खात्याचा त्यांनी पुरेपूर अभ्यास केला आणि त्याचा जनतेलाही लाभ करून दिला. त्याकाळात गडकरी यांनी मुंबई आणि नागपूर शहरात वाहतूक सुरळीत आणि जलद होण्यासाठी उड्डाण पुलांचे जे जाळे निर्माण केले त्याला खरोखरच तोड नव्हती. तसेच मुंबई-पुणे वाहतूक जलद आणि सुरळीत होण्यासाठी त्यांनी 'एक्स्प्रेस वे' चे काम झपाट्याने पूर्ण केले. भारतातील हा पहिल्या सहा पदरी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याचे सारे श्रेय गडकरी यांच्या आखीव-रेखीव नियोजनालाच जाते. या 'एक्सप्रेस-वे' मुळे जणू काही त्यांना रस्ते-विकासाचे वेडच लागले. म्हणूनच की काय, केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर असताना नितीन गडकरी यांची 'राष्ट्रीय ग्रामीण रस्ते विकास महामंडळा'च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामुळे गडकरी यांच्या रस्तेविकासाच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळाली. त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन, सखोल अभ्यास करून आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या असंख्य बैठका घेऊन प्रात्यक्षिकांसह आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. वाजपेयी सरकारने तो अहवाल लगेच आणि स्वीकारला आणि त्यातून 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना' हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. या योजनेमुळे देशात असंख्य गावे चांगल्या आणि पक्क्या रस्त्यांनी शहरास जोडल्या गेली. हे काम करीत असतानाच गडकरी यांनी पक्षवाढीसाठीही प्रयत्न केले. २००९ ते २०१३ या अत्यंत कठीण काळात ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षही झाले. कारण त्याच्या आधीच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाली होती. मात्र त्यानंतर २०१४ साली तसेच २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वेळा भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. पंतप्रधान मोदी यांनी नितीन गडकरी यांना त्यांचे आवडते 'रस्ते वाहतूक विकास' हेच खाते दिले आणि गडकरी यांनी ते अतिशय कार्यक्षमतेने सांभाळले. त्यामुळे आज देशात ठिकठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे तसेच ग्रामीण भागातील रस्ते जोडण्याचे काम अतिशय वेगात होताना दिसून येत आहे. 'कोरोना' सारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन असतानाही रस्त्यांची कामे चालूच आहेत त्याला गडकरी यांचा 'कामाचा धडाका'च कारणीभूत आहे.हे कोणीही मान्य करेलच. नितीन गडकरी हे विदर्भाचे असल्यामुळे जसे पट्टीचे खवय्ये आहेत तसेच बोलण्यातही 'बेधडक' आहेत. त्यामुळेच ''अकार्यक्षम अधिकाऱ्यांना तसेच भ्रष्टाचारी ठेकेदारांना वेळ आली तर चांगले 'ठोकून' काढा '' असे जाहीर विधान ते करू शकतात. २०१४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी गडकरी यांनी असेच केलेले बेधडक विधान चांगलेच गाजले होते. एका निवडणूक प्रचार सभेत मतदारांना उद्देश्यून बोलतांना गडकरी म्हणाले होते, '' तुम्हाला लवकरच 'लक्ष्मी दर्शन' होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच दिवसात अवैध मार्गाने मिळविलेला पैसा बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही 'लक्ष्मी' ला नाही म्हणू नका . मिळेल तेवढे घ्या मात्र मतदान करताना, महाराष्ट्राच्या विकासालाच मत द्या '' त्यांच्या या विधानाची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली होती. मात्र त्यासंदर्भात केलेल्या बिनतोड 'युक्तिवादानंतर' त्यातून ते सहीसलामत सुटले. राजकारणात राहूनही आणि विशिष्ट विचारसरणीचे असूनही गडकरी यांनी आपला 'उमदा स्वभाव' कधी सोडला नाही. लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान हे नेहमीच महत्वाचे असते यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच पक्षात चांगले मित्र आहेत. विरोधी पक्षाचे नेतेही त्यांच्या कुशल आणि धडाकेबाज कामाची प्रशंसा करतात. त्यामुळेच सध्याच्या 'कोरोना'च्या महामारीच्या काळात देशात 'लस' आणि इतर कारणावरून जे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून गडकरींच तारू शकतात असे काहीजणांना वाटते. त्यामुळेच भाजपचे खासदार डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी 'कोरोना' च्या संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी गडकरी यांच्याकडे नेतृत्वाची सूत्रे द्यावीत असे जे विधान केले आहे त्याला काही विरोधी पक्षनेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. एक समंजस आणि कार्यक्षम नेता म्हणून गडकरी यांनी देशात जे स्थान निर्माण केले आहे त्याचा हा ढळढळीत पुरावाच आहे असे म्हणावे लागेल. ---- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )

'देशमुखी' थाटात राजकारण करणारा 'रसिक' नेता

'' महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आडवा विस्तव जात नाही असे बोलले जाते. ठाकरे सरकारच्या प्रत्येक कृतीवर जोरदार टीका करताना हे सरकार कसे अकार्यक्षम आहे हे सांगण्याचाच विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचा खासा प्रयत्न असतो. परंतु एक काळ असा होता की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते हे एका ताटात जेवण करीत असल्यासारखे परस्परांशी वागत होते. राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात आहे की तोही सत्तारूढ आघाडीचा एक भाग झाला आहे तसेच मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांना खिशात घालून फिरताहेत का? अशी विचारणा होण्याइतपत त्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्याची घनिष्ठ मैत्री होती. ते मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि ते विरोधी पक्षनेते होते गोपीनाथराव मुंडे. दोघेही मराठवाड्याचे नेते होते. दुर्देवाने आज ते दोघेही हयात नाहीत. मात्र हा चमत्कार घडविला होता तो विलासराव देशमुख यांच्या सदैव हसतमुख, खेळकर आणि उमद्या स्वभावामुळे. त्यांच्या नेतृत्वगुणांचे तेच तर मुख्य वैशिष्ट्य होते. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील बाभळगाव सारख्या छोट्या गावच्या सरपंचपदापासून ते महाराष्ट्रासारख्या देशातील एका मोठ्या राज्याचा दोन वेळा मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. मूळचे लातूर तालुक्यातील बाभळगावचे असलेले विलासराव यांना त्यांच्या आजोबांपासून निजामाच्या राजवटीत 'जहागिरी' मिळाली होती. विलासरावांचे वडील दगडोजी देशमुख हेही बाभळगावचे सरपंच होते. लोकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी ते सतत घोड्यावरून फिरत असत. त्यामुळे त्यांना पंचक्रोशीत फार मान होता. विलासरावांनी हाच वारसा पुढे चालविला. प्रथम बाभळगावचे सरपंच, त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य होऊन राजकारणाचा श्रीगणेशा केला. काही काळ युवक काँग्रेसची पताकाही खांद्यावर घेऊन काँग्रेसचे निष्ठेने काम केले. लातूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ते वकिलीच्या शिक्षणासाठी म्हणून पुण्याला आले. आयएल एस लॉ कॉलेजमध्ये शिकताना पुण्यातच त्यांची वैचारिक बैठक आणखी पक्की झाली. पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचा आणि मराठवाड्याचे नेते शंकरराव चव्हाण यांचा परिचय झाला आणि पुढे राजकारणात विलासराव त्यांचे पट्टशिष्य झाले. मराठवाड्यातील या दोन्ही नेत्यांचे गुरू-शिष्याचे नाते शेवटपर्यंत कायम होते. लातूर शहराच्या सर्वांगीण विकासात विलासरावांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. आज लातूर शहराचा भव्य कायापालट पाहता त्याची प्रचिती येते. विलासरावांनी आपल्या 'देशमुखी' थाटातच सारे 'राजकारण' केले. नावाप्रमाणे ते 'विलासी' नव्हते तर खऱ्या अर्थाने 'रसिक' होते त्यामुळे सांस्कृतिक मंत्री असताना बड्या सेलेब्रिटीपासून ते सामान्य लोककलावंतांपर्यंत त्यांचा संपर्क होता. त्यांचा हसतमुख स्वभाव, बोलण्याची ढब, वक्तृत्वशैली, आणि विरोधकांना शालजोडीतून मारलेले जोडे हे जसे जनतेला आवडायचे तसेच त्यांच्या विरोधकांनाही त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. सुरुवातीला राज्यमंत्री नंतर कॅबिनेट मंत्री असा त्यांचा यशस्वी प्रवास होत गेला. त्यातच श्री शंकरराव चव्हाण केंद्रात गेल्यामुळे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला विलासरावांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व मिळाले. शरद पवार यांना 'आव्हान' देऊ शकणारा नेता अशीही त्यांची प्रतिमा झाल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा त्यांच्यावर लगेच विश्वास बसला आणि १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतर विलासराव महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले मात्र दुर्देवाने विलासराव मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करू शकले नाहीत. राजकारणातील शह-काटशहाचे परिणाम त्यांनाही भोगावे लागले. त्याच्याही आधी म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 'पवार-विरोध' नडला. त्या निवडणुकीत विलासराव लातूर मतदारसंघातून पराभूत झाले. असे म्हणतात की महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने त्यांच्या मतदारसंघात 'मामुली' ( मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत ) फॅक्टरचा वापर करून विलासरावांचा पत्ता ठरवून 'कट' करण्यात आला. त्यानंतर साधारण वर्षभराने झालेल्या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीतही विलासरावांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारले. त्यावेळी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे शिवाजीराव देशमुख, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले छगन भुजबळ आणि रामदास फुटाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी फुटाणे यांना कवी आणि साहित्यिक म्हणून काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. मात्र रामदास फुटाणे यांनी विलासराव बरोबर असलेली आपली मैत्री लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेण्याची तयारीही दर्शविली होती परंतु फुटाणे यांच्या उमेदवारीवर तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नरसिंह राव ठाम होते त्यामुळे विलासरावांनी त्यावेळी चक्क पक्षाविरूद्ध बंडखोरी केली आणि ते 'अपक्ष' म्हणून निवडणुकीत उभे राहिले. दुर्देवाने दुसऱ्या फेरीत त्यांचा एका मताने पराभव झाला. ( तेथेही त्यांना पवार-विरोधच नडला ) शिवाय बंडखोरी केल्याबद्दल त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. ( बंडखोरी केल्यानंतर साहजिकच पत्रकारांनी त्यांना '' तुम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ असताना अचानक बंडखोरी का केलीत ? '' असा प्रश्न विचारला होता त्यावेळी विलासरावांनी, मला राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे असे बाणेदार उत्तर दिले होते व नंतर ते त्यांनी खरे करून दाखविले ) अर्थात विलासरावांचा राजकारणातील हा बॅडपॅच फार काळ टिकला नाही त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यात आले आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत ते लातूर मतदारसंघातून तब्बल ९० हजार मतांनी निवडून आले आणि काँग्रेस श्रेष्ठींचा विश्वास संपादन करून मुख्यमंत्री झाले मात्र दोन्ही काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून ते पूर्ण पाच वर्षे काम करू शकले नाहीत. त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पुन्हा उचल खाल्ली आणि २००३ मध्ये पक्षश्रेष्ठींनी त्यांना अचानक राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यांच्या जागी शरद पवार यांच्या विश्वासातील म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यानंतर २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीला राज्यात पुन्हा बहुमत मिळाले. मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा थोड्या कमी जागा मिळाल्या त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीने दावा केला मात्र मुख्यमंत्रीपद काँग्रेसलाच मिळावे यासाठी काँग्रेस आग्रही राहिली त्याबदल्यात महत्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यास काँग्रेसने अनुकूलता दर्शविली. आणि पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विलासराव यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना मुख्यमंत्री केले आणि विलासरावांनी पुढे अत्यंत चतुराईने विधानसभेत काँग्रेस आमदारांची संख्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त करण्याची किमया साधली. परंतु याही वेळेला विलासराव मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करू शकले नाहीत, २००८ साली मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला ( २६/११ ) आणि त्याच्या अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र विलासराव त्या मागणीला बधले नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी फार मोठी खेळी केली. त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आर.आर.पाटील यांना त्यांनी, हल्ल्याप्रकरणी नैतिकता स्वीकारून राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विलासरावांना पर्यायच शिल्लक राहिला नाही त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र जाता जाता मराठवाड्यातीलच दुसरे नेते अशोकराव चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर २०११ साली विलासरावांची राज्यसभेवर वर्णी लावून त्यांना पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून घेण्यात आले आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरील आपला विश्वास पुन्हा सार्थ ठरविला. दुर्देवाने विलासरावांना जास्त आयुर्मान लाभू शकले नाही. २०११ सालीच त्यांची प्रकृती अचानक ढासळली. लिव्हर आणि किडनीच्या विकाराने त्यांना ग्रासले. पुढील उपचारासाठी त्यांना चेन्नईला हलविण्यात आले मात्र रुग्णालयात उपचार चालू असतानाच १४ ऑगस्ट २०१२ साली त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राने एक चांगला उमदा आणि कर्तृत्वान नेता गमावला. देशमुख परिवारात 'थोरले साहेब' म्हणून सर्वपरिचित असलेल्या विलासरावांना एकूण तीन मुलगे. त्यापैकी अमितजी आणि धीरज हे राजकारणात त्यांचा वारसा आज पुढे चालवित आहेत. अमितजी तर महाराष्ट्रातील सध्याच्या आघाडी सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री आहेत. तर धीरज हे लातूर (ग्रामीण) चे आमदार आहेत. तिसरे चिरंजीव रितेश देशमुख यांनीही अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आजही आणि यापुढेही जेंव्हा जेंव्हा लातूरचे नाव घेतले जाईल तेंव्हा तेंव्हा विलासराव देशमुख यांची आठवण निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही हीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची खरी पावती आहे. ----- श्रीकांत नारायण