Wednesday, January 13, 2021

'' दवंडी '' चा अस्त

'' दवंडी '' चा अस्त ------------------------- आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही गेली कित्येक वर्षे डफ किंवा हलगीच्या आवाजासह खेडोपाडी ऐकू येणारी '' ऐका हो ऐका '' ची 'दवंडी' आता इतिहासजमा झाली आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असलेल्या 'आघाडी' सरकारनेच एका खास निर्णय घेऊन ही 'दवंडीची प्रथा' इतिहासजमा केली आहे. एरव्ही 'दवंडी' द्वारे दिली जाणारी ग्रामसभेची सूचना किंवा गावकऱ्यांना दिली जाणारी काही महत्वाची माहिती यापुढे मोबाईलमधून 'एसएमएस' द्वारे दिली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. सध्याच्या संगणकयुगात 'हायटेक' होऊ पाहणाऱ्या राज्य प्रशासनाने 'दवंडी' ला कायमची रजा देण्याचा निर्णय घेणे केंव्हा तरी अपेक्षितच होते. त्यानुसार आता कोणत्याही गावात 'दवंडी' ऐकू येत नाही. खरे तर 'दवंडी' ची प्रथा खूप प्राचीन आहे. आपल्याकडे राजा-महाराजांच्या काळापासून या 'दवंडी' चा 'डिंगोरा' पिटला जात असे. एखाद्या राजाला प्रजेला काही महत्वाची सूचना अथवा माहिती द्यायची असेल तर अशावेळी प्रामुख्याने 'दवंडी' चाच वापर केला जाई. तीच प्रथा पुढे चालत आली आणि अगदी अलिकडच्या काळापर्यंत पंचायतीच्या कारभारात 'दवंडी' चा सर्रास वापर होत असे. 'दवंडी' देण्याचे काम प्रामुख्याने गावातील 'वेसकरा'कडे असायचे. हा 'वेसकर' गावाच्या 'रखवाली' चेही काम करीत असे. 'दवंडी' देण्याची वेसकराची खास पद्धत असे. तो 'दवंडी' द्यायला निघे तोच मुळी हातात 'डफ' किंवा 'हलगी' घेवून. हा 'डफ' किंवा 'हलगी' वाजवीत तो चौका-चौकात जाई आणि गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेई. त्याच्या भोवती गावकरी जमा झाले की हा वेसकर सुरुवातीलाच आपल्या भरदार आवाजात 'ऐका हो ऐका' अशी आरोळी ठोकून ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहिती सांगायचा. त्याची माहिती देवून झाले की, जमलेले लोक आपापसात चर्चा करीत तेथून पांगत असतं. 'दवंडी' द्वारे 'ऐका हो ऐका' करीत हा वेसकर गावाची पूर्ण फेरी करी आणि पुन्हा चावडीवर ( ग्रामपंचायतीची कचेरी ) येत असे. 'दवंडी' देणाऱ्या वेसकराचे गावातील लहान मुलांना विशेष आकर्षण असे. 'दवंडी' देत तो आला की, अनेक लहान मुले त्याच्याबरोबर पळत, नाचत जात असतं. अशावेळी आपल्या अंगावर पुरेसे कपडे आहेत की नाहीत याचेही त्यांना पुरेसे भान राहत नसे. काही मुले तर या वेसकराबरोबर संपूर्ण गावाची 'फेरी' मारण्याचा आनंद लुटत असतं. ही 'दवंडी' देताना आपण आज गावकऱ्यांना काहीतरी खास सांगणार आहोत याचा सार्थ अभिमान वेसकराच्या चेहऱ्यावर झळकायचा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत टिकायचा. काही वेसकर तर 'दवंडी' देण्यासाठी खास ठेवणीतले कपडे घालून यायचे. आमच्या लहानपणी तुळजापूर गावात हरिबा नावाचा वेसकर 'दवंडी' द्यायचा. 'दवंडी' देतानाचा त्याचा तो 'रुबाब' पहायलाही लोक गर्दी करायचे. 'दवंडी' वाल्याचे हे रूप आता यापुढे पाहायला मिळणार नाही. कारण हा 'दवंडी' वाला आता इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे यापुढे सहसा 'ऐका हो ऐका' ची आरोळी ऐकू येणार नाही. कारण राज्य शासनानेच '' 'ऐका हो ऐका' यापुढे कोठेही 'दवंडी' पिटली जाणार नाही'' असे जाहीर केले आहे. काळाच्या ओघात अनेक गावेच नव्हे तर 'राजवटी'ही नष्ट झाल्या तेथे एका दीड दमडी 'दवंडी' ची ती काय कथा? 'कालाय तस्मे नम:' म्हणतात ते यालाच. ---- श्रीकांत ना. कुलकर्णी (मोबा. --- ९४२२३१९१४३)