अक्षर श्री
Tuesday, August 22, 2023
ऐश्वर्याचे 'मासे-पुराण'
सध्या महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे एक 'विनोद'च झाला आहे. आणि मंत्र्यांनी तर या 'विनोदा'त भरच घालायची असे ठरविलेले दिसते. त्याशिवाय सरकार 'टिकणार' नाही असे त्यांना सांगण्यात आले असावे त्यामुळे मंत्री आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार असे 'विनोद' करीत असावेत. नुकतेच राज्याचे डॉक्टर असलेले एक मंत्री विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणात, नागरिकांना रोज मासे खाण्याचे आवाहन केले. मासे खाल्ल्याने आपले डोळे चांगले आणि आकर्षक होतात त्यामुळे कोणालाही 'पटविणे' सहज शक्य होते असे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी दाखला म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचे उदाहरण दिले. ऐश्वर्या रॉय ही मंगलोरची राहणारी असल्यामुळे ती दररोज मासे खाते त्यामुळे तिचे डोळे छान आणि खूपच आकर्षक असल्याचे त्यांनी सांगितले.
ऐश्वर्या रॉय ही एकेकाळची 'जागतिक सुंदरी'. साहजिकच जागतिक सुंदरीचा 'मान' पटकावण्यासाठी तिने अनेकांना 'पटविले' असावे कारण ती रोज मासे खात असल्यामुळे तिचे डोळे आकर्षक होते त्यामुळे जागतिक सुंदरीचा किताब मिळायला तिला फारशी अडचण पडली नसेल. ( याबाबतीत गावित यांनी 'पटविण्याचे' जे तंत्र सांगितले आहे ते खरे ठरले आहे ) . ऐश्वर्यासारखी 'मासोळी' कोणाच्याही नजरेत भरणे सहज शक्य आहे. बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते तर अशा 'मासोळी' च्या शोधात असतातच त्यामुळे ऐश्वर्या लगेचच 'बॉलिवूड' ची नंबर एकची हिरॉईन झाली. आणि त्यानंतर लगेचच ती 'बॉलिवूड'चा 'शहेनशहा' असलेल्या अमिताभ बच्चन यांची सूनही झाली. अर्थात बच्चन कुटुंबात प्रवेश करण्यापूर्वी तिने आधी अमिताभला 'पटविले' होते की, अभिषेकला 'पटविले' होते हा खरे तर संशोधनाचा विषय होऊ शकतो. परंतु 'बंटी और बबली ' या चित्रपटातील 'कजरा रे कजरा ... ' या गाण्यात दोघेही बापलेक ऐश्वर्याच्या "... कारे कारे 'नयना' वर भाळले होते हे मात्र तेवढेच खरयावेळी उभयतांनी केलेले नृत्य त्याला साक्षी आहे. केवळ मासे खाल्ल्यामुळे 'पाणीदार' झालेल्या ऐश्वर्याच्या डोळ्यांवर केवळ अभिषेक बच्चन नव्हे तर तिचे असंख्य चाहतेही भाळले असल्यास नवल नाही.
मात्र बच्चन यांच्या घरांत जेवताना जर अभिषेकने 'टोमॅटो'सह कांदा आणखी मागितला तर ऐश्वर्याचे हेच 'पाणीदार' डोळे कसे रिऍक्ट होतील ते नक्कीच पाहण्यासारखे आहे. आपण रोज मासे खाल्ल्याचे विसरून त्यावेळी ऐश्वर्या जो काही 'अभिनय' करेल तो पाहून कदाचित विजयकुमार गावित आपले विधान मागेही घेतील आणि '' दररोज मासे खाल्ले तर डोळे वटारल्यासारखे दिसतात " असेही आपल्या पुढील भाषणात सांगू शकतील.
एकूण काय तर मंत्र्यांची ही 'मासेमारी' सध्याच्या महागाईच्या काळात जनतेला तेवढाच विरंगुळा म्हणून लाभदायक ठरली आहे. हेही नसे थोडके.
------ श्रीकांत ना. कुलकर्णी
( ९४२२३ १९१४३ )
Wednesday, April 12, 2023
बाबरी मशीद 'कारसेवकांनी' पाडली
'' बाबरी मशीद पाडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक नव्हते " असे वादग्रस्त विधान नुकतेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अपेक्षेप्रमाणे गदारोळ उडाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या आणि त्यानंतर शिवसैनिकांबाबत केलेले आपले हे विधान अंगलट येणार असे लक्षात आल्यानंतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'समज' दिल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी नेहमीप्रमाणे सारवासारव केली आणि बाबरी मशीद पाडणारे सर्व हिंदू होते अशी मखलाशी केली. वास्तविक बाबरी मशीद पाडण्याचा 'तो' घटनाक्रम पाहण्यासाठी जरा मागे वळून पाहिले तर असे लक्षात येईल की, बाबरी मशीद ही तेथे जमलेल्या हजारो कारसेवकांनी पाडली. या कारसेवकांमध्ये प्रामुख्याने रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, राष्ट्र सेविका समिती, या संघ परिवारातील संस्थांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून गेलेले असंख्य शिवसैनिकही होते. थोडक्यात हे सर्व 'कारसेवक' वेगवेगळ्या हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते होते.
'रामजन्मभूमी आंदोलना' च्या निमित्ताने दक्षिण भारतातून निघालेली 'रथयात्रा' बिहारमध्ये तत्कालीन लालूप्रसाद यादव यांच्या सरकारने अडविली आणि त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलन आणखी तीव्र झाले. या रथयात्रेचे नेतृत्व भाजपचे तत्कालीन नेते लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांनी केले होते. बिहारमध्ये रथयात्रा अडविल्यानंतर आंदोलनाला अधिक गती देण्यासाठी 'कारसेवा' करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून सहा डिसेंबर १९९२ रोजी हजारो 'कारसेवक' बाबरी मशिदीसमोर जमले. या आंदोलनाचे नेतृत्वही लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्याकडे होते. त्यावेळी श्री अडवाणी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते होते तसेच त्यावेळी उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर होते त्यामुळे साहजिकच कोणत्याही अडथळ्याशिवाय हजारो कारसेवक बाबरी मशिदीच्या परिसरात येऊ शकले. मात्र दुपारनंतर या 'कारसेवकांचा' जमाव अनावर झाला आणि नेत्यांच्या आवाहनांकडे दुर्लक्ष करून हा जमाव बाबरी मशिदीत घुसला यातील काही कारसेवकांकडे बाबरी मशिदीचा 'ढाचा' पाडण्याचे साहित्य ( पहारी, टिकाव , कुदळी आदी ) होते असे म्हणतात. त्यामुळे ही जुनी मशीद ( खंडहर ) पाडायला फारसा वेळ लागला नाही. यातील काही कारसेवक तर मशिदीच्या घुमटावर चढले आणि त्यांनी त्या घुमटांवर आधी 'भगवा' फडकविला. आणि नंतर तो घुमटही कोसळविण्यात त्यांना फारसा वेळ लागला नाही. जमाव अनावर झाल्याने तेथे उपस्थित असलेले परंतु हतबल झालेले अडवाणी, महाजन प्रभृर्ती नेते काहीच करू शकले नाहीत.
विशेष म्हणजे त्यावेळी केंद्रात पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. श्री नरसिंहराव अतिशय धूर्त आणि मुत्सद्दी पंतप्रधान होते त्यांना बाबरी मशीदीच्या आंदोलनाच्या निमित्ताने एका दगडात अनेक पक्षी मारायचे होते. त्यामुळे असे म्हणतात की, बाबरी मशीद पाडत असताना ते शांतपणे टी. व्ही. समोर बसून त्यासंबंधीची दृश्ये पाहत होते. यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बाबरी मशीद पाडण्याचा धोका आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याशी अनेकवेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र नरसिंहराव यांनी हेतूंता त्यांचा दूरध्वनी घेण्याचे टाळले. काँग्रेसमध्ये असूनही विचाराने हिंदुत्ववादी असलेले नरसिंहराव यांनी, बाबरी मशीद पाडल्यास देशातील कट्टरपंथी मुस्लिमांनाही चांगला 'धडा' शिकविल्यासारखे होईल असा विचार केला असावा त्याप्रमाणे त्यांनी बाबरी मशीद पाडण्यास 'मूक' संमती दिली असावी असे वाटते. मात्र त्याचबरोबर यानिमित्ताने हिंदुत्ववादी भाजपलाही 'धडा' शिकविण्यासाठी त्यांनी त्याचदिवशी सायंकाळी राष्ट्रपतींना शिफारस करून एकाच वेळी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, आणि हिमाचल प्रदेश ही भाजपच्या ताब्यात असलेली चार राज्ये एका मिनिटांत बरखास्त केली. विशेष म्हणजे या चारही राज्यात त्यावेळी भाजपाला तीन चतुर्थांश एवढे बहुमत प्राप्त होते. त्यापैकी उत्तरप्रदेश या राज्यात त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षानंतर भाजपचे सरकार ( योगी सरकार ) सत्तेवर आले. बाबरी प्रकरणी श्री लालकृष्ण अडवाणी यांनाही जाहीर माफी लागावी लागली. तसेच त्यांना एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे बाबरी मशीद पाडल्यानंतर ठिकठिकाणी दंगली सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरसिंहराव यांनी, बाबरी मशीद पाडणाऱ्या कारसेवकांना आपापल्या गावी जाण्यासाठी योग्य ते संरक्षण देण्याच्या संबधितांना सूचना दिल्या त्यामुळे सर्व कारसेवक आपापल्या गावी सुखरूप पोहोंचले. नंतरही त्यांच्यावर फारसे कोठे गंभीर गुन्हे दाखल केल्याची नोंद नाही.
बाबरी मशीद उध्वस्त झाल्यामुळे एकीकडे भाजपची बदनामी होऊन या पक्षाला रामजन्मभूमी प्रकरणात सपशेल माघार घ्यावी लागली. त्याचवेळी तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, ''बाबरी मशीद जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे '' अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे ते हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने एकदम 'हिरो' झाले. अर्थात या सर्व प्रकरणात 'बाबरी' ने भाजपला 'मारले' असले तरी पुढे चालून 'रामाने' भाजपाला 'तारले' आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. आणि आता तर काय भाजपच्या दृष्टीने 'राममंदिर' हा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने भाजपचा परवलीचा शब्द झाला आहे. 'बाबरी' चे 'रामायण' हे असे आहे.
-- श्रीकांत ना. कुलकर्णी
Monday, October 10, 2022
महाराष्ट्रातील दिशाहीन सत्तासंघर्षाचे नाट्य
"महाराष्ट्रात सध्या सत्तासंघर्षाचे जे दिशाहीन नाट्य चालू आहे ते निकोप लोकशाहीच्या दृष्टीने निश्चितच घातक आहे. राजकीय पक्षांनी केवळ सत्ताप्राप्तीसाठी आपापल्या विचारसरणीला तिलांजली देण्यास केंव्हाच सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील सध्याचा सत्तासंघर्ष हा त्याचाच परिपाक आहे असे म्हणावे लागेल. २०१९ साली झालेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळाले होते. त्यामुळे राज्यात युतीचे सरकार सत्तेवर येणे अपेक्षित होते. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारणावरून भाजपशी असलेली युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. हे आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तेच या आघाडी सरकारचे शिल्पकार होते. भाजपविरोधात विरोधी पक्षांची एकत्र आघाडी करून भाजपला पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सक्षम पर्याय देण्याचा हेतू पवार यांनी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविला होता. देशपातळीवरच्या या पहिल्या प्रयोगामध्ये ते यशस्वी झाले होते. भाजपचे प्रादेशिक पक्ष संपविण्याचे धोरण शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या गळी उतरविले आणि त्यावर विश्वास ठेवून उद्धवजींनी भाजपशी काडीमोड घेऊन महाविकास आघाडीत येण्याचे निश्चित केले. त्यामुळे भाजपशी सत्ता गेली आणि महाराष्ट्रात भाजपाला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागले. भारतातील सर्व प्रमुख राज्यात भाजपची सत्ता असताना आणि काही राज्यातील सत्ता तर काँग्रेस आमदार फोडून हस्तगत केलेली असताना महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात पुन्हा एकदा मिळणारी सत्ता शिवसेनेमुळे हातातून गेल्याचे शल्य भाजपच्या राज्यातील तसेच दिल्लीतील नेत्यांना सारखे टोचत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचण्यासाठी सुरुवातीपासूनच 'साम-दाम-दंड-भेद' आदी नाना प्रकार अवलंबण्यात आले.
सरतेशेवटी अडीच वर्षानंतर ज्या शिवसेनेमुळे आपली सत्ता गेली तिला कायमचा 'धडा' शिकविण्यासाठी भाजपने शिवसेनेतच उभी फूट पाडली. ठाणे येथील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड पुकारले. आणि स्वतःची वेगळी 'शिवसेना' स्थापन करून पुन्हा भाजपशी युती केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार एकाएकी कोसळले. आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. भाजपने आपला हा डाव इतक्या नियोजनपद्धतीने आखला होता की, पक्षप्रमुख म्हणून गाफील राहिलेल्या उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत या बंडाची कल्पनाच आली नाही. जेंव्हा आली त्यावेळी वेळ निघून गेली होती. भाजपने केवळ शिवसेनेला दणका दिला नाही तर मोदी यांच्याविरोधात विरोधकांची आघाडी करू पाहणाऱ्या शरद पवार यांनाही यानिमित्ताने चांगलाच शह दिला. विशेष म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट अभेद्य राहावा म्हणून त्यांच्या गटातील आमदार कमी असतानाही भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांची इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री केले. महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' अशा पद्धतीने यशस्वी करताना दिल्लीतील भाजपच्या श्रेष्ठींनी एकाच दगडात तीन-चार पक्षी मारले. भाजपची ही जबरदस्त खेळी इतकी यशस्वी झाली की, एक तर महाराष्ट्रात पुन्हा सत्ता तर मिळालीच शिवाय शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. कारण भाजपच्या मदतीने शिंदे गटाने दिलेले आव्हान फार मोठे आहे. यानिमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचे तरुण, परिपक्व आणि समंजस नेतृत्व पुढे आले आहे ही त्यातल्या त्यात समाधानकारक गोष्ट मानावी लागेल.
महाराष्ट्रातील या सत्तांतराच्या संदर्भात काही गोष्टींबाबत न्यायालयाने त्वरित निर्णय घेणे अपेक्षित होते. बंडखोर आमदारांवर केलेली कारवाई ग्राह्य होती का? तसेच बंडखोर आमदारांचा नेमका पक्ष कोणता ? हे तातडीने सांगण्याची गरज होती. निकोप लोकशाहीच्या दृष्टीने ते आवश्यक होते मात्र तसे झाले नाही. या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्वतंत्र घटनापीठ स्थापन करण्यातच फार वेळ गेला आणि नंतरही घटनापीठापुढील सुनावणी लांबतच गेली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून राज्यात सत्तेवर आलेले हे शिंदे सरकार 'वैध' की 'अवैध' हे प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे. ( हा लेख लिहून पूर्ण होईपर्यँत न्यायालयाचा त्यासंबंधीचा अंतिम निर्णय लागलेला नव्हता ) याउलट निवडणूक आयोगाने मात्र अंधेरी येथील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने तातडीने निर्णय घेऊन शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले तसेच 'शिवसेना' या पक्षाचे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना तूर्तास बंदी घातली आहे. त्यामुळे उद्धव तसेच शिंदे गटाला शिवसेनेचे नवे नाव तसेच नवे निवडणूक चिन्ह घ्यावे लागणार आहे. दोन्ही गटांना तसा हा धक्काच म्हणावा लागेल. '' दोघांचे भांडण .... " किंवा " तुला न मला घाल ..... " अशी शिवसेनेच्या दोन्ही गटाची अवस्था झाली आहे. यामध्ये विजय झाला आहे तो खरा भाजपचा. युती तोडणाऱ्या शिवसेनेला संपविण्याचा त्यांचा मुख्य हेतू यानिमित्ताने साध्य झाला आहे. कारण निवडणूक चिन्हासह शिवसेनेच्या नावातही आता बदल करावा लागणार आहे. प्राप्त परिस्थितीला तोंड देताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या नव्या शिवसेनेसाठी 'त्रिशूळ', 'उगवता सूर्य' आणि 'मशाल' ही तीन निवडणूक चिन्हे प्राधान्यक्रमाने निवडणूक आयोगाकडे पाठविली आहेत परंतु शिंदे गट येथेही उद्धवजींचा पिच्छा सोडायला तयार नाही असे दिसून आले. शिंदे गटानेही निवडणूक आयोगाकडे 'त्रिशूळ', 'उगवता सूर्य' आणि 'तुतारी' अशी तीन चिन्हे सुचविली आहेत. थोडक्यात, उद्धव गटाला हवे ते नवे निवडणूक चिन्हही मिळू नये अशा पद्धतीचे प्रयत्न जाणूनबुजून केले जात आहेत असे दिसून येते. त्यामुळे नजीकच्या काळात उद्धव ठाकरे यांना आपली शिवसेना वाचविण्यासाठी फार मोठ्या अग्निपरीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासूनच सत्तारूढ आणि विरोधक (भाजप) यांच्यात अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यामुळे राजकारणाची पातळी वरचेवर खाली जात होती. आता राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून तर आरोप-प्रत्यारोपाची ही पातळी आणखीनच खालावली आहे. पक्षफुटीनंतर शिंदे गटातील सर्व आमदार भाजपच्या कृपेने 'सुरत', 'गुवाहाटी' 'गोवा' अशी 'सफर' करून आले. 'काय झाडी?, काय डोंगार?, काय हाटील? ', अशी कौतुकाची वर्णनेही त्यांच्याकडून ऐकायला मिळाली. त्यामुळे शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून राजकारणात, 'गद्दार', 'ईडी-सरकार' तसेच 'खोके-सरकार' या नव्या संकल्पना अस्तित्वात आल्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर साथीदारांनी शिवसेनेतून 'उठाव' करण्याचे जे कारण दिले आहे ते सारासार विचार करता हास्यास्पदच ठरले आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून शिवसेना दूर गेली म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो असे सांगताना आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा त्यांनी दावा केला आहे. सत्तेसाठी राजकारणात आपली पक्षीय विचारसरणी सर्रास दावणीला टांगण्याची विविध राजकीय पक्षांची स्पर्धाच लागलेली असताना अशा वेळी 'बाळासाहेबांच्या विचारसरणी'चे कारण देऊन शिवसेना फोडणे हे प्रमुख कारण म्हणूनच हास्यास्पद ठरते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी एकत्र येऊन स्थापन केलेले औट घटकेचे सरकार असेच हास्यास्पद ठरले होते. त्याप्रकरणात तर भाजपाची चांगलीच 'छी-थू' झाली होती. हा सारा सत्तेचा खेळ होता. त्यामुळे सारे काही आता सत्तेसाठीच चालते याची जाणीव आता जनतेलाही झाली आहे. या सत्तासंघर्षात एकाही आमदाराची राजीनामा देऊन पक्षांतर करण्याची हिम्मत झाली नाही. तसेच पक्षांतर बंदी कायदा असूनही त्याचा या प्रकरणात फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधी लोकशाहीची बूज राखायला तयारच नाहीत हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विद्यमान स्थितीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आहे मात्र विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेताही शिवसेनेचाच ( श्री अंबादास दानवे ) आहे. म्हणजे ज्या पक्षाचे सरकार त्याच पक्षाचा विरोधीपक्ष नेता. लोकशाहीची एवढी क्रूर थट्टा यापूर्वी कधीच झाली नसेल. मात्र कोणालाच त्याचे सोयरसुतक नाही. 'तोतयाच्या बंडा' बरोबरच 'राजकीय सुडाचे' नाट्यही पाहायला मिळत आहे. संभ्रमित झालेली जनता मात्र लोकशाहीचे हे धिंडवडे निमूटपणे पाहत आहे. हीच जनता निरोगी लोकशाही टिकण्यासाठी २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणता निर्णय घेते हेच आता पाहावे लागेल. .
------ श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
Sunday, May 22, 2022
'सापळा' : नेमका कोणाचा ?
" पण ठरल्याप्रमाणे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर गेलो असतो तर मला आणि माझ्या मनसे कार्यकर्त्यांना विविध गुन्ह्यात अडकविण्याचा 'सापळा' रचण्यात आला होता. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला ते परवडणारे नव्हते म्हणून मी नियोजित अयोध्या दौरा स्थगित केला असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी रविवारी पुण्याच्या सभेत सांगितले. त्यांचा ५ जूनचा बहुचर्चित अयोध्या दौरा स्थगित का करण्यात आला त्याचे त्यांनी अशा प्रकारे समर्थन केले. हा 'सापळा' कोणी रचला हे मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. ते 'राझ' त्यांनी कायमच ठेवले. परंतु हा सापळा रचण्यासाठी मुंबई आणि दिल्लीतून 'रसद' पुरविण्यात आली असे सांगून त्यांनी तर्क-वितर्कांना जागा ठेवली. त्याप्रमाणे मनसे विरोधकांकडून लगेच तर्क-वितर्क सुरूही झाले. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, भाजपनेच हा 'सापळा' रचला होता असे स्पष्टपणे सांगून भाजपनेच राज ठाकरे यांना याप्रकरणात तोंडघशी पाडल्याचे सांगितले. तर काही जणांना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला सातत्याने विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार यांची 'घट्ट मैत्री कारणीभूत असल्याचा असल्याचा साक्षात्कार झाला.
भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केल्यामुळे राज ठाकरे पुण्याच्या सभेत त्यांचा आपल्या खास 'ठाकरी भाषेतील शैलीत' समाचार घेणार असे बऱ्याच जणांना वाटले होते. मात्र त्यांनी बृजभूषण सिंह यांचे नावही घेणे टाळले. 'एक खासदार' एवढाच त्यांनी त्यांचा उल्लेख केला. यावरून, बोलतांना त्यांनी किती सावधगिरी बाळगली होती याची कल्पना येते. याशिवाय भाजपकडे ते अधिक झुकल्याचे यामुळे प्रत्यंतर आले. राज्यातील अन्य प्रश्नांचा उल्लेख करीत राज ठाकरे यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते श्री शरद पवार यांच्यावर केलेली टीका देखील नेहमीची आणि गुळगुळीत स्वरूपाची होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह अनेकांची निराशा झाली हे नक्कीच. नाही म्हणायला स्वतःच्या प्रकृतीबाबत बोलताना त्यांनी शस्त्रक्रियेचे कारण सांगून पुढील काळात विश्रांती घ्यावी लागेल असेही स्पष्ट केले. नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्याची वेळ आल्यामुळे झालेली मानहानी भरून काढण्यासाठी सहानुभूती मिळविण्याचा हा उतारा निश्चितच चांगला म्हणावा लागेल.
पुण्याच्या या सभेचा समारोप करताना राज ठाकरे यांनी. भोंग्याविषयीचे आंदोलन यापुढेही चालूच राहील असे स्पष्टपणे सांगितले. वास्तविक राज ठाकरे यांच्या आदेशानंतर भोंग्यांच्या प्रश्नांबाबत मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभर केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी राज्यात सर्वत्र कायद्याची कडक अंमलबजावणी केल्यानंतर भोंग्याच्या प्रश्नातील हवा तशी केंव्हाच निघून गेली आहे. त्यामुळे आता पुन्हा हे आंदोलन सुरू करायला लावून राज ठाकरे यांना काय मिळणार आहे ? हा प्रश्नच आहे. उलट या भोंग्याच्या आंदोलनामुळे पक्षातील बरेच कार्यकर्ते -- विशेषतः पुण्यातील --- नाराज असल्याची त्यांना जाणीव करून आल्यानंतर देखील त्यांनी हेच आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेऊन काय साध्य केले हे कळायला मार्ग नाही. एकीकडे पक्षवाढीसाठी कसलेही प्रयत्न केले जात नसताना घेतलेल्या काही निर्णयामुळे पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी वाढत असेल तर पक्षगळती होऊ शकते एवढी साधी कल्पना पक्ष नेतृत्वाला येत नसेल तर त्याला काय म्हणावे ? पुणे शहरातील वसंत मोरे यांच्यासारखे निष्ठावंत आणि लढवय्ये कार्यकर्ते पक्षाच्या भूमिकेवर नाराज आहेत मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या नाराजीत भर घालण्याचेच काम केले जात आहे. अशाने पक्ष बळकट होणार कसा ? पक्ष नेतृत्वाच्या वैचारिक गोंधळामुळे पुन्हा एकदा पक्षाची हानी होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांचा वेळीच 'मनसे' विचार करण्याची गरज आहे. नाही तर नजिकच्या काळात' पक्षाला पुन्हा एकदा मर्यादित स्वरूप प्राप्त होऊ शकते.
--- श्रीकांत नारायण
Thursday, May 19, 2022
अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीमागचे 'राझ' कोणते ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचा ५ जूनचा बहुचर्चित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. स्वतः श्री राज ठाकरे यांनीच एक ट्विट करून माहिती दिली आहे. यासंदर्भात आपण पुण्यात २२ मे रोजी होणाऱ्या सभेत आपली भूमिका अधिक स्पष्ट करणार आहोत असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे याप्रकरणात काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला सातत्याने विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध राज ठाकरे आक्रमक भूमिका घेतात की नरमाईची भूमिका घेतात ते पाहावे लागणार आहे. उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केल्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. श्री राज ठाकरे यांनी मध्यंतरी औरंगाबादच्या ऐतिहासिक सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रात 'वादळ' निर्माण झाले होते. ते शमण्याच्या आतच राज ठाकरे यांनी पाच जूनच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. मात्र लगेचच राज यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचेच खासदार बृजभूषण यांनी तीव्र विरोध केल्यामुळे तो केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वत्र चर्चेचा विषय झाला. कारण भाजपकडून 'सुपारी' घेऊनच राज ठाकरे यांनी 'भोंग्या'चा' प्रश्न उकरून काढला असा सर्वत्र मतप्रवाह वाहत असताना त्यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपच्याच खासदाराकडून तीव्र विरोध होत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही बृजभूषण यांच्या विरोधामुळे तोंडघशी पडले होते. त्यामुळे हा दौरा स्वतः राज ठाकरे यांनीच स्थगित केल्यामुळे त्यांना आता हायसे वाटले असेल.
भाजपचे खासदार बृजभूषण सिंह हे उत्तरप्रदेशातील एक 'बाहुबली' नेते म्हणून समजले जातात. त्यांची काम करण्याची, बोलण्याची 'स्टाईल' सर्वपरिचित असल्यामुळे त्यांच्या 'वाट्याला' सहसा कोणी जात नाही. राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर करताच बृजभूषण सिंह यांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या दौऱयाला विरोध केला एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशातील जनतेची आधी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊलही टाकू दिले जाणार नाही अशी घोषणाही केली. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही 'तयार' राहण्यास सांगितले होते . आपल्या या अटीवर अजूनही ते ठाम आहेत एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी त्यांनी आता भाजपमधील इतर नेत्यांची 'जमवाजमव'ही करायला सुरुवात केली. बृजभूषण यांच्या मागणीला पाठिंबा देत गिरीराज किशोर सिंग आणि मनोज तिवारी यांनी राज ठाकरे यांनी उत्तरप्रदेशच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली होती. राज ठाकरे अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत मात्र काही वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर प्रदेशातील तरुणांना जी मारहाण झाली त्यासंदर्भात बृजभूषण यांनी, राज ठाकरे यांना 'रावणा'ची उपमा दिली आहे. थोडक्यात खा. बृजभूषण यांनी यांनी राज ठाकरे यांच्या विरोधाचा आपला हेका अजूनही कायम ठेवला आहे. यासंदर्भात कांचन गिरी या साध्वीजींनी राज ठाकरे यांच्यावतीने बृजभूषण यांच्याजवळ रदबदली करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र बृजभूषण यांनी त्यांनाही जुमानले नाही. राज यांच्या माफीनाम्याबत ते अजूनही ठाम आहेत. कांचन गिरी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही पाठविले असून बृजभूषण यांना समज देण्याची विनंती केली मात्र नरेंद्र मोदी यांची याबाबतची भूमिका अदयाप तरी समजू शकलेली नाही. थोडक्यात हे प्रकरण आता पंतप्रधानांपर्यंत पोहोंचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बृजभूषण यांची कानउघाडणी करतील का हा प्रश्नच आहे. मात्र तूर्तास तरी राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौराच स्थगित केल्यामुळे बृजभूषण यांचा 'विजय' झाला आहे असेच म्हणावे लागेल.
आपल्या नियोजित अयोध्या दौऱ्याला भाजपकडूनच अनपेक्षितपणे विरोध होत असल्यामुळे मनातून अस्वस्थ झालेले राज ठाकरे यांनी आतापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती. नुकताच त्यांनी पुण्याचा घाईघाईने दौराही केला आणि २२ मे रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिरात एक सभाही घेण्याचे निश्चित केले. मात्र मुंबईला जाताच त्यांनी आपल्या नियोजित अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीची अचानक घोषणा केली. त्यामुळे पुण्याच्या सभेत राज ठाकरे , आपल्या अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीमागचे खरे 'राझ ' जाहीर करणार की त्यांची तोफ नेहमीप्रमाणे शरद पवार आणि आघाडी सरकारविरूद्ध धडाडणार यावरच मनसेच्या भावी वाटचालीचे दिशादर्शन होणार आहे.
-- श्रीकांत नारायण
(संपर्कध्वनी--९४२२३ १९१४३)
Sunday, May 15, 2022
" 'केतकी'च्या बनी हे 'जहर' आणले कोणी ? "
महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी वरचेवर इतक्या खालच्या स्तराला जात आहे की , विवेकबुद्धीने काम करणाऱ्यांना अक्षरशः त्याची शिसारी यावी. एकीकडे सामान्य जनता महागाई आणि इतर प्रश्नांमुळे मेटाकुटीस आलेली असताना राजकीय नेते मात्र रोजच्या रोज आज 'धुळवड' कशी रंगवायची यामध्येच मश्गुल असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून ते पाडण्याचा सतत प्रयत्न करणारे विरोधक आणि सत्तारूढ आघाडीचे नेते यांच्यात एकही दिवस असा गेला नाही की, ज्यादिवशी त्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा 'कलगी-तुरा' रंगला नाही. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी आणि सत्त्तारुद्ध पक्षाच्या आघाडीतील नेत्यांनी एकमेकांना तुरुंगात डांबण्याचा जणू विडाच उचलला असून त्यासाठी उभय बाजूंनी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेचा सोयीस्कर वापर करून घेण्याचे ठरविलेले दिसते. परस्परांवर दररोज केल्या जाणाऱ्या खालच्या पातळीवरील आरोपांमुळे राजकारणाने हीन पातळी केंव्हाच गाठली आहे. त्यातच सोशल मेडिया नावाच्या नव्या ब्रह्मराक्षचाचा यासाठी वापर करण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्रात झपाट्याने राजकीय विद्वेषाचे आणि विखाराचे गडद वातावरण निर्माण झालेआहे. मात्र दुर्देवाने उभय बाजूंतर्फे कोणीही या प्रश्नाचा सारासार विचार करताना दिसत नाही.
पुण्यात राहणाऱ्या कोण्या केतकी चितळे या अभिनेत्रीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्याबद्दल अशीच एक अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करून राजकीय विद्वेषाचे वातावरण आणखी तापविण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक कोणत्याही माणसाच्या व्यंगावर बोट ठेवून त्याची क्रूर थट्टा करणे किंवा कोणत्याही माणसाच्या मरणाची इच्छा व्यक्त करणे हे कोणत्याच संस्कृतीत बसत मात्र केतकी चितळे हिने, शरद पवार यांच्या वयाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचा कसलाही सारासार विचार न करता नितीन भावे नामक एका वकिलाची आक्षेपार्ह भाषेतील शरद पवार यांच्यावरील एक कविता रिपोस्ट केली आणि आपल्या मानसिक विकृतीचे दर्शन घडविले.
'' केतकीने दाखविली मानसिक विकृती
'चितळे' असूनही विसरली संस्कृती '
" 'केतकी'च्या बनी हे 'जहर' आणले कोणी ? "
असेच तिच्या या विकृत पोस्टबाबत म्हणावे लागेल. पुण्यातील ब्राम्हण महासंघाने देखील केतकीच्या या 'पोस्ट'चा निषेध केला यावरून केतकीची 'ती पोस्ट' किती खालच्या दर्जाची आणि हीन पातळीची असेल याची कल्पना येते.
केतकीच्या या पोस्टचे महाराष्ट्रात लगेचच तीव्र पडसाद उमटले नसते तरच नवल. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून केतकी चितळे हिचा निषेध केला. पुणे, कळवा आदी ठिकाणी तिच्याविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी तातडीची कारवाई म्हणून तिला अटकही केली आणि न्यायालयाने तिची पोलीस कोठडीत रवानगीही केली. कळवा पोलीस ठाण्यात केतकीला आणले जात असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्यावर शाई आणि अंडीफेकही केली. तर पुण्यात विनायक आंबेकर नावाच्या भाजपच्या प्रवक्त्याला मारहाणही करण्यात आली. या प्रकरणाला आता उघडपणे जातीयवादाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे हे प्रकरण नजीकच्या काळात आणखी चिघळण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे यानिमित्ताने माननीय शरद पवार साहेबांना एकच विनंती करावीशी वाटते की, पोलीस त्यांच्यापद्धतीने केतकीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करतीलच मात्र त्यांनी तिला उदार अंत:करणाने माफ करावे. तिला माफ करणे ही केवळ तिलाच नव्हे तर राजकीय विद्वेषाचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या अनेकांना मारलेली सणसणीत चपराक असेल. कारण शस्त्राला शस्त्रानेच उत्तर दिल्यास खणखणाट आणखी वाढतो,, राजकीय विद्वेषाला विद्वेषानेच उत्तर दिल्यास विद्वेष आणखीनच वाढणार आणि महाराष्ट्रातील वातावरण आणखी गढूळ होणार. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत कोणीतरी विवेकबुद्धी वापरण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात माननीय शरद पवार यांनीच करावी एवढेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.
----- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी -- ९४२२३ १९१४३ )
Friday, April 8, 2022
एसटी संपाचे वादळ पवारांच्या घरात
"संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार श्री शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या घरावर चप्पलफेक तसेच दगडफेकही केली. खा. सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना वारंवार हात जोडून विनंती करूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसले नाहीत. पोलिसांनी नंतर या कर्मचाऱ्यांना अटकाव करून त्यांना रोखले नाहीतर या कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या घरात घुसुन आणखी 'राडा' केला असता. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले नसते तरच नवल होते. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांची 'वकिली' करणारे गुणवंत सदावर्ते यांना रात्री लगेच अटक करण्यात आली. त्यावरूनही 'वादळ' उठले असून सत्तारूढ आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीची देवाणघेवाण सुरु झाली आहे. सध्या महाराष्ट्रात कोणत्याही गोष्टीचे लगेच 'राजकारण'' केले जाते आणि महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेते एकमेकांवर तुटून पडतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील जनता दररोज याचा अनुभव घेत आहे.
वास्तविक आदल्याच दिवशी म्हणजे गुरूवारी उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाखेरीज इतर सर्व मागण्या मान्य करून तसे राज्यसरकारला आदेश दिले होते आणि राज्यसरकारनेही न्यायालयाचा आदेश स्वीकारून त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. न्यायालयाच्या या निर्णयावर एसटी कर्मचाऱ्यांनी 'जल्लोषही केला होता. असे असताना शरद पवार यांच्या घरांवर दुसऱ्या दिवशी मोर्चा काढून हिंसक प्रकार घडवून खळबळ माजविण्याचे षडयंत्र कोणाचे होते आणि त्यामागचा 'मास्टरमाइंड' कोण होता याचे गूढ अद्याप कायम आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करतीलच मात्र हा मोर्चा आधी जाहीर झाला असतानाही पवारांच्या घरावरील हल्ला रोखण्यास पोलीस यंत्रणा कमी पडली हेही तेवढेच खरे आहे.
या घटनेमुळे गेल्या पाच महिन्यापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप समाप्त होण्याच्या मार्गावर असताना पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पवारांच्या घरावरील हल्ल्याचे निमित्त साधून पोलिसांनी आंदोलनकारी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गुणवंत सदावर्ते यांना तातडीने अटक तर केलीच शिवाय गेल्या काही महिन्यापासून आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेल्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनाही तेथून हुसकावून काढले. आता या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आश्रय घेतला आहे. परंतु तेथेही त्यांना फार काळ राहता येणार नाही अशी परिस्थिती दिसते.
वास्तविक एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्याचे यापूर्वीही राज्यसरकारकडून बरेच प्रयत्न झाले मात्र त्यामध्ये सरकारला सपशेल अपयश आले. संपकरी नेत्यांचा आडमुठेपणाही त्याला कारणीभूत होता. एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. या दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्याही केल्या त्यामुळे संप चिघळण्यास मदत झाली आणि संप ताणला गेला. सुरुवातीला सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या भाजप नेत्यांनाही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता मात्र त्यांनी नंतर माघार घेतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील गुणवंत सदावर्ते यांनीच आपण या आंदोलनाचे तारणहार आहोत हे असे दाखवून आंदोलनाची सूत्रे हाती घेतली. आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आपली 'नेता'गिरीची हौस भागवून घेतली. आणि उठसुठ बेलगाम विधाने करून संप चिघळविण्याचे महत्कार्य केले. सदावर्ते वकील असूनही आणि उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ( विलीनीकरणाचा मुद्दा वगळता ) अनुकूल निर्णय देऊनही ते संप मिटविण्याची भाषा करीत नाहीत याचा अर्थच त्यांचा बोलविता धनी वेगळाच कोणीतरी असावा अशी शंका येते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा खरा वाली कोण ? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यासंदर्भात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चुकीच्या नेतृत्वाकडून केले जात आहे अशी शरद पवार यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी वाटते.
राज्याच्या ग्रामीण भागात एसटी ही जीवनवाहिनी समजली जाते. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून चालू असलेल्या एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील शाळकरी मुले तसेच सर्वसामान्य प्रवासी यांचे अतोनात हाल होत आहेत मात्र त्याचा सर्वांनाच विसर पडलेला दिसून येत आहे. त्यातच एसटी संपाचे वादळ आता खुद्द पवारांच्या घरातच शिरल्यामुळे हा संप चिघळण्यास आणखी मदत झाली आहे. त्यामुळे आता कोणताही मुद्दा प्रतिष्ठेचा न करता सर्व बाजूने सारासार विचार करूनच एसटीचा संप मिटविण्यासाठी या प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यातच राज्यातील जनतेचे हित आहे.
---- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
-----
Subscribe to:
Posts (Atom)