Monday, December 23, 2019

'' कांदे -पुराण ''

'' कांदे -पुराण '' ---------------- " कांद्याच्या भाववाढीमुळे सध्या आपल्या देशात सर्वत्र 'कांदे -- पुराणा'ची चविष्टपणे चर्चा चालू आहे. कांद्यामुळे अनेक पदार्थ 'चविष्ट' होतात हे सर्वांनाच माहित असल्यामुळेच की काय या कांद्याची सगळीकडे चविष्टपणे चर्चा चालू झाली असावी. 'सोशल मेडिया' तर सध्या कांद्यावरच 'गुजराण' करीत आहे असे म्हणावे लागेल . अगदी 'टिकटॉक' पासून ते 'बिग-बी'च्या 'केबीसी' पर्यंत सर्वांचा वापर करून अनेकजणांनी आपल्या विलक्षण बुद्धिचातुर्याने ;(अर्थातच कांदा खाऊन ) कांदा-भाववाढीचे प्रकरण धसास लावले आहे. 'टिकटॉक' च्या माध्यमातून 'व्हाट्स ऍप' वर पाठविण्यात आलेल्या एका संदेशात ' एक माणूस जेवण करीत असताना प्रत्येक घासागणिक समोर टांगलेल्या कांद्याचा, टोमॅटोचा आणि लसणाचा हुंगून वास घेत आहे दृश्य दाखविण्यात आले आहे. कांद्याच्या भाववाढीची अशी छान खिल्ली हसायला भाग पाडत असेल हे खरे असले तरी कांद्याच्या भाववाढीमुळे निर्माण झालेया वांद्यामुळे सामान्य गृहिणीपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. एरवीही हा कांदा, इच्छा नसतानाही डोळ्यात पाणी आणतो आणि आता तर त्याचे गगनाला भिडलेले भाव पाहून अनेकांच्या डोळ्यातून खरेखुरे अश्रू येत आहेत. यामध्ये कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते मध्यमवर्गीय ग्राहकांपर्यंत सर्वांचाच सहभाग आहे. वास्तविक कांद्याचे पीक असे आहे की, ते उगवताना मूळ 'कांदा' दिसत नाही . कारण तो जमिनीखाली उगवतो आणि वरती असते फक्त त्याची 'पात'. थोडक्यात तो गुप्त असतो मात्र एकदा का तो प्रकटला आणि त्याचा वापर करायचे म्हटले की, तो भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. असा हा 'कांदा' बहुगुणी आहे. त्याच्या गुणांचे वर्णन किती म्हणून करायचे. तो प्रकृतीला पोषक तर आहेच शिवाय काही रोगांचा तो 'शोषक' आहे. पूर्वी प्रवासाला निघताना लोक आपल्या खिशात हमखास कांदा ठेवून जायचे असे म्हणतात कारण एक तर त्यामुळे भर उन्हामुळे 'उन्हाळी' लागायची नाही तसेच अतिश्रमामुळे व थकव्यामुळे भोवळ आल्यास हाच कांदा फोडून नाकाला लावल्यास शुद्धीवर यायला मदत होते असे. त्याशिवाय प्रवासातील मुक्कामात कोठे भोजन करायची वेळ आलीच तर तोच कांदा तोंडी लावायला कामी यायचा. कांद्याचा असा 'दुहेरी-तिहेरी ' उपयोग व्हायचा. कांदा तसे पहिल्यापासूनच गोरगरिबांचे खाद्य म्हणून ओळखला जातो. शेतकरीही आपल्या शेतात काम करून दुपारच्या वेळेला 'भाकरतुकडा' खायला बसला की, त्याच्या आसपासच जमिनीत लावलेला कांदा स्वतःच्या हातानेच तोडून भाकरी आणि कोरड्यासबरोबर तोंडी लावून खातो. त्यावेळी या कांद्यामुळे त्याच्या जेवणाला जी चव येते आणि  जी लज्जत वाढते तिच्यापुढे कोणतेही स्वर्गीय सुख फिके पडते हा सार्वत्रिक अनुभव आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच अनेक गोरगरिबांच्या भोजनात या कांद्यामुळेच 'ब्रम्हानंद' निर्माण केला आहे. आमच्या लहानपणी शाळेत असताना आमच्या वर्गातील काही मुले शेजारच्या खेडेगावातून शिकायला यायची. रोज चार-पाच मैलाचा रस्ता तुडवीत ती मुले शाळेत यायची आणि जायची.;एकदा मध्यंतरात त्यांच्याबरोबर डबा खाण्याची वेळ आली. त्या सर्वांनी एका फडक्यात आपापल्या भाकऱ्या बांधून आणल्या होत्या. ;त्या भाकऱ्यांपैकी सर्वात वरच्या भाकरीवर सात-आठ मिरच्या ठेचलेल्या होत्या. तेच त्यांचे मुख्य कालवण होते. मात्र त्याबरोबर त्यांनी भरपूर पातीचे ;कांदे आणले होते. भाकरी, तो मिरच्यांचा खर्डा आणि तोंडी लावायला कांदे हेच त्यांचे दररोजचे जेवण होते. असे जेवण रोज करून त्यापैकी काहीजण उच्च शिक्षित झाले. त्यामुळे त्यांच्या जीवनातील कांद्याचे महत्व ते तरी कधीच विसरणार नाहीत. कांद्याचा महिमा हा असा आहे. म्हणूनच की काय, या कांद्याला उतराई होण्यासाठी आजही ग्रामीण भागात 'कांदे-नवमी' मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यादिवशी जेवणात बहुतेक सर्व पदार्थ हे प्रामुख्याने कांद्याचे केले जातात. 'कांदा' एवढा लोकप्रिय का ? हे सांगण्यासाठी हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे. तुम्ही कोणाच्याही घरात गेलात आणि स्वयंपाकगृहात डोकावले तर दुरडीमध्ये 'कांदा' हमखास आढळून येतोच. खानावळी आणि हॉटेलमधील भटारखान्यात तर अनेक पोत्यांमध्ये हा कांदा दडून बसलेला असतो. त्यातील प्रत्येक कांद्यावर जणू काही प्रत्येक गिऱ्हाईकाचे नाव लिहिलेले असते आणि त्याप्रमाणे तो 'कांदा' पोटात गेल्यावर गिऱ्हाईक तृप्त मानाने बाहेर पडते. अशा या कांद्याला निषिद्ध मानणारेही काही लोक आहेत तसेच फक्त चातुर्मासात कांदा -लसूण न खाणारे लोक आहेत मात्र त्यांची संख्या नगण्य आहे त्यामुळे ते 'अल्पसंख्याक' गटात मोडतात आणि त्यामुळे त्यांची फारशी कोणी दखल घेत नाही.बहुसंख्याक लोकांचा कांद्यावर 'जीव' जडला असल्यामुळेच सध्या कांद्याच्या भाववाढीमुळे सगळेजण त्रस्त झाले आहेत आणि साहजिकच त्याचे राजकारणातही पडसाद उमटले आहेत. यापूर्वी काही राजकीय नेत्यांना याच कांद्याने चांगले रडविल्याची उदाहरणेही आहेत. काही वर्षांपूर्वी सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सत्तारूढ असलेले भाजपचे सरकार कांदा-भाववाढीमुळे निवडणुकीनंतर गडगडले होते. त्यामुळेच की काय विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'आपण कांदाच खात नसल्याचे सांगून कांदा-भाववाढीचे प्रकरण झटकून टाकण्याचा प्रयत्न केला खरा ;मात्र कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या सरकारला कांदा आयात करण्याचा निर्णय घ्यावाच लागला. यापूर्वीच्या सरकारने तर कांदा- भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानातून कांदा आयात केला होता आणि तेथून आलेला कांदाही भारतातील लोकांनी गोड मानून खाल्ला होता. थोडक्यात कांदा हा दोन राष्ट्रांच्या मैत्री मधील ( ते मित्र असोत की शत्रू ) महत्वाचा दुवा ठरू शकतो हेच यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. त्यामुळे कांद्याचे महत्व केवळ भोजनापुरते मर्यादित नसून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही किती महत्वाचे आहे हे लगेच लक्षात येईल. एका चित्रपटात नायिकेच्या तोंडी '' एक चुटकीभर सिंदूर की किंमत तुम क्या जानो बाबू? '' असे गाजलेले वाक्य आहे त्याच धर्तीवर एका कांद्याची किंमत रोज कांदा खाणाऱ्यालाच समजू शकते असे म्हणावे लागेल. अशा या बहुगुणी कांद्याचे हे 'कांदे-पुराण' सांगेल तेवढे कमीच म्हणावे लागेल. ----- श्रीकांत नारायण ( संपर्क ध्वनी -- ९४२२३ १९१४३ )

No comments:

Post a Comment