Tuesday, February 8, 2022

'लता' नावाचा 'अमर स्वर'

'' सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसापासून टी.व्ही. चॅनेल्सवरून सांगितले जात होते. रविवारी सकाळपासूनच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नेत्यांची वर्दळ वाढत असल्याचे वृत्त ऐकायला मिळत होते. त्याचवेळी मनात शंकेची पाल चुकचुकली आणि ती थोड्या वेळाने खरी ठरली. आठ वाजून १२ मिनिटांनी 'लता' नावाचा 'अमर स्वर' अनंतात विलीन झाला. एका दैवी स्वराच्या युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनाने संगीत सृष्टी स्तब्ध झाली आहे. 'सप्त-स्वर' देखील काही काळापुरते का होईना शांत झाले असतील. गानकोकीळेच्या निधनाच्या वृत्ताने कोकिळेने देखील ऐन वसंत ऋतूमध्ये आज आपले मधुर कूजन केले नसेल. कालच सरस्वती पूजनाचा सोहळा सर्वत्र उत्साहाने साजरा झाला. आणि आज दुर्देवाने 'गानसरस्वती'चा स्वर कायमचा निमाला. लता मंगेशकर यांच्या स्वरांना खरे तर उपमाच नाही. त्यांनी गायलेले कोणतेही गाणे हे परीस स्पर्श लाभल्याप्रमाणे अद्भुत असायचे त्यामुळे त्यांची हजारो गाणी अजरामर झाली आणि रसिकांच्या ओठांवर ती सहजपणे रुळलेली असायची. मग ते गाणे 'बरसात' मधील असो वा 'सिलसिला' मधील असो. जवळपास तरुणांच्या चार पिढ्या त्यांच्या गाण्यावर पोसल्या गेल्या असे म्हटले तर ते फार अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अनेक संगीतकार, वादक आले आणि गेले मात्र त्यांच्या सुरात माधुर्य शेवटपर्यंत कायम राहिले. विविध भाषांमध्ये गाणी गाण्याचा त्यांचा विक्रम तर गिनीज बुकमध्ये नोंदला गेला आहे. विशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा जो स्वर होता तोच स्वर वयाच्या अमृतमहोत्सवापर्यंत कायम होता हेच त्यांच्या आवाजाचे अद्भुत रहस्य होते. केवळ भारतातच नाही त्यांचा स्वर सातासमुद्रापलीकडे जाऊन लोकप्रिय झाला. त्यामुळेच परदेशात झालेल्या त्यांच्या कार्यक्रमांना रसिकांची प्रचंड गर्दी असायची. निसर्गरम्य गोव्यातील मंगेशी हे लता मंगेशकर यांचे मूळ गाव. '' मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...'' या गाण्यातील उक्तीप्रमाणे साऱ्या मंगेशकर कुटुंबावरच श्री मंगेशाची कृपा होती. वडील दीनानाथ मंगेशकर हे तर संगीत रंगभूमीवरील प्रख्यात गायक-अभिनेते होते. त्यांच्याकडूनच लता मंगेशकर यांना गायनकलेचा वारसा मिळाला आणि त्यांनी तो समर्थपणे शेवटपर्यंत सांभाळला. वडिलांच्या अकाली निधनाने वयाच्या तेराव्या वर्षीच लता मंगेशकर यांच्यावर कुटुंबाचा भार पडला. पाच भावंडांच्या त्या 'लतादीदी' बनल्या. एकीकडे संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करीत लतादीदींनी आपली गायनकला विकसित केली. एवढेच नव्हे तर आपल्या आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ या बहीण-भावंडाना देखील संगीत क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज संपूर्ण मंगेशकर कुटुंब गायन क्षेत्रात अव्वल नंबर आहे त्याचे सारे श्रेय लतादिदींनाच द्यावे लागेल. सुरुवातीच्या काळात लतादीदी कोल्हापुरात असताना त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यासारखे गुरू मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीशी त्यांची नाळ तेथेच जोडल्या गेली. 'पहिली मंगळागौर' हा त्यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट मात्र अभिनयापेक्षा गायनकलेलाच त्यांनी प्राधान्य दिले आणि मुंबईला गेल्यानंतर हळूहळू त्या हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून स्थिरावल्या. कालांतराने हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून नंबर एक चे स्थान मिळवून देखील त्यांनी मराठी अस्मितेचा कधीच विसर पडून दिला नाही. वेळोवेळी त्यांनी मराठी भावगीते, अभंग आणि मराठी चित्रपट गीते गाऊन मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यास हातभार लावला. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर ही तर त्यांची दैवते होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची '' जयोस्तुते, महन्मंगले .. ' आणि '' सागरा प्राण तळमळला .... '' या गीतांना तर त्यांनी स्वर देऊन आणि संगीताचा साज चढवून ती गाणी अजरामर केली. या गाण्यांबद्दल मराठी जनता मंगेशकर कुटुंबांचे कायमचे ऋण मानील यात शंका नाही. लतादीदी या प्रखर राष्ट्राभिमानी होत्या. सीमेवरील जवानांसाठी त्या नेहमीच कळकळ आणि तळमळ व्यक्त करायच्या. जे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातून अश्रू आले ते '' ए मेरे वतन के लोगो ....' हे आर्त स्वरातील त्यांचे गाणे म्हणजे त्यांच्या देशप्रेमाचे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल. अशा या स्वरलतेबद्दल जेवढे लिहिले जाईल तेवढे ते कमीच आहे. आज लतादीदी आपल्यात नाहीत मात्र त्यांनी गायलेली हजारो अजरामर गाणी आपल्याबरोबर आहेत. त्यांच्यामुळेच 'लता नावाचा अमर स्वर ' हा असंख्य रसिकांच्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे. हा स्वर पृथ्वीतलावरून कधीच नष्ट होणार नाही याची लाखो रसिकांना नक्कीच खात्री आहे. --- श्रीकांत नारायण (संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३)

No comments:

Post a Comment