Tuesday, March 29, 2022
सुयोग्य नेतृत्वाअभावी काँग्रेस रसातळाला जाणार ?
" भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळजवळ सत्तर वर्षे संपूर्ण देशावर निरंकुश सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस पक्षाची आजची दयनीय अवस्था पाहता काँग्रेसच्या नेतृत्वानेच काँग्रेसला रसातळाला नेण्याचे ठरविले आहे की काय ? अशी भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. देशाच्या कोणत्याही भागात होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकसारखे पराभवाचे धक्के सहन करावे लागत आहेत मात्र त्याची जबाबदारी कोणीच घेत नाही आणि पराभवामुळे कोणीही शहाणे होऊन पक्ष संघटनेमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणले जात नाहीत असेच चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून काँग्रेससारख्या देशातील एका प्रमुख पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नाही हीच खरी म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे. आणि विशेष म्हणजे त्याचे सोयरसुतक कोणालाच वाटत नाही. आगामी काळात पक्षाचे काय होणार याचीही चिंता फारसे कोणी करताना दिसत नाही. वास्तविक गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात आणि देशाच्या अनेक राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव देशव्यापी पक्ष सक्षम होता. परंतु सध्याची काँग्रेसची स्थिती पाहता काँग्रेस हाच भाजपला पर्यायी पक्ष आहे असे म्हणणाऱ्यांची वेड्यात गणना होऊ शकते. संपूर्ण भारत देश 'काँग्रेसमुक्त' करण्याचे 'लक्ष्य' ठरवून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपची लढाई आता हळूहळू एकतर्फी होत चालली आहे. कारण काँग्रेसने स्वतःहूनच देशाला 'काँग्रेसमुक्त' करायचे ठरविले आहे की काय अशी दाट शंका येऊ लागली आहे. इतकी निष्क्रियता काँग्रेसमध्ये आज आलेली आहे.
२०१४ साली भाजपने नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पुढे करून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काँग्रेसची केंद्रातील सत्ता हस्तगत केली. परंतु त्यानंतर काँग्रेसने पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत असेच दिसून येते. मधल्या काळात मोदींविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळून पक्षात काहीसे चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यावर पराभवाची जबादारी घेऊन त्यांनीही काँग्रेस अध्यक्षपद सोडले आणि पक्षाची हंगामी सूत्रे पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडे आली. वास्तविक पाहता 'राहुल गांधी यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडून पक्षातील कार्यकर्त्यांच्या खूप अपेक्षा होत्या मात्र सातत्याचा अभाव, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी न घेतलेले कष्ट तसेच पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी कसलेच प्रयत्न न करण्याचा निर्धार आणि भाजपने निर्माण केलेली 'पप्पू' ही प्रतिमा पुसून टाकण्यात आलेले अपयश यामुळे राहुल गांधी यांचा कोणताही प्रभाव पडला नाही. राहुल गांधी यांच्याबरोबरच प्रियांका गांधी यांचेही नेतृत्व उदयास आले मात्र त्यांनी आपले कार्यक्षेत्र उत्तरप्रदेश या एकाच राज्यापुरते मर्यादित ठेवले, उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थाने कस लागला मात्र निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राहुल पाठोपाठ प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाबाबतीतही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे काँग्रेस आणि गांधी घराण्याचा वाद पुन्हा निर्माण झाला.
मधल्या काळात काँग्रेस पक्षाची सूत्रे गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीकडे सुपूर्द करावीत अशी मागणी काँग्रेसमधूनच करण्यात येऊ लागली होती त्यासाठी
काँग्रेसमधील काही असंतुष्ट नेत्यांनी ( जी-२३ गट) बैठकाही घेण्यास प्रारंभ केल्या होत्या मात्र पुढे कोठे घोडे अडले ? हे त्यांनाच माहित. त्यामुळे नेतृत्वबदलाचा प्रश्न फुसका बारच ठरला. नुकतेच महाराष्ट्राचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी, काँग्रेसने तरुणांच्या हातात नेतृत्व देणे पक्षाला महाग पडले असे विधान केले आहे. त्यांचा अप्रत्यक्ष रोख राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे होता हे उघडच आहे. हे दोघेही पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांना फारसे महत्व देत नाहीत असा त्यांचा आक्षेप असावा आणि तो खराही आहे. परंतु तरुण नेतृत्व आणि पक्षातील जुनेजाणते नेतृत्व यांच्यात समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी कोणी पार पाडावयाची हाच खरा यक्षप्रश्न आहे. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षापुढची एक प्रमुख समस्या सांगितली असली तरी त्यावर नजीकच्या काळात काही उपाययोजना होऊ शकेल याची सुतराम शक्यता नाही. थॊडक्यात रोग माहित झाला आहे मात्र त्यावर जालीम उपाय कोणी आणि कसे करायचे ? अशी काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था झाली आहे. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला आहे त्यामुळे फिनिक्स पक्षासारखा तो राखेतूनही पुन्हा वर येईल अशीच काही काँग्रेस नेत्यांचीआणि कार्यकर्त्यांची अजूनही समजूत आहे. वास्तविक या समजुतीला अनेकवेळा तडे गेले आहेत मात्र तरीही कसलीच उपाययोजना न करून 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याकडेच पक्षश्रेष्टींचा कल आहे. तसे झाल्यास काँग्रेस पक्षाचे भवितव्य अंधकारमय आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे भाजपसारखे तगडे आव्हान समोर उभे असताना सुयोग्य नेतृत्वाअभावी काँग्रेस स्वतःच रसातळाला जाणार की काय ? याचीच भीती वाटत आहे.
------ श्रीकांत नारायण
Monday, March 21, 2022
'' 'एमआयएम' ची काडी : भाजपाची कुरघोडी आणि शिवसेनेची कोंडी
'' भाजपला सत्तावंचित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीत बिकट पेचप्रसंग निर्माण करण्याची भाजपतर्फे एकही संधी सोडली जात नाही. याबाबतीत विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'माहीर' आहेत. आपण 'फडणवीस' आहोत आणि आपल्या अंगात 'नाना' कळा आहेत हे ते वारंवार दाखवून देत असतात. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे एक नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे एका खासगी कारणानिमित्त औरंगाबादचे 'एमआयएम'चे ( मुस्लिम इत्तेहादुल मजलिस ) खासदार इम्तियाज जलील यांना भेटावयास जातात काय आणि त्या भेटीत इम्तियाज जलील राजेश टोपे यांच्याजवळ महाविकास आघाडीत 'एमआयएम'ही येण्यास उत्सुक आहे अशी इच्छा व्यक्त करतात काय? आणि तसा प्रस्तावही देतात काय ? आणि याची 'कुणकुण' लागताच देवेंद्र फडणवीस लगेच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी आपला 'तोफखाना' सज्ज ठेवतात काय? हे सारेच अगम्य आणि अतर्क्य आहे. अर्थात हल्लीचे राजकारण एवढे 'गतिमान' झाले आहे की, काहीही घडू शकते यावर आता जनतेचा चांगलाच विश्वास बसत चालला आहे.
महाविकास आघाडीत येण्याचा 'एमआयएम' चा हा प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार का ? असा सवाल करीत देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच 'जनाब बाळासाहेब ठाकरे', शिवसेना म्हणजे 'मजलिस सेना' असा उल्लेख करीत शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले. अर्थात शिवसेनापक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी त्वरेने 'एमआयएम' चा हा प्रस्ताव आपण धुडकावत असल्याचे जाहीर केले हे जरे खरे असले तरी या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात जो गदारोळ उडणार होता तो उडालाच. 'एमआयएम'चा हा प्रस्ताव फेटाळताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या 'ठाकरी' भाषेतच समाचार घेतला. त्यांनीही, 'एमआयएम' ही भाजपाची 'बी टीम' आहे असे सांगताना भाजप म्हणजे 'हिजबुल सेना', सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामागे भाजप आता 'खान' लावणार का ? असा उलटा सवाल करीत देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिले आणि शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी देखील 'एमआयएम' चा हा प्रस्ताव निरर्थक असल्याचे सांगून यामुळे राजकारणात उठलेल्या वादळाला थोपवून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र पवार यांनी हा खुलासा करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनीच याबाबत उलटसुलट विधाने करून संभ्रम निर्माण केला होता. शरद पवार यांच्या खुलाशाने हा संभ्रम दूर झाला असला तरी 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी आपण यापुढेही महाविकास आघाडीत येण्याचे प्रयत्न चालूच ठेवणार असे सांगून हा संभ्रम कायम ठेवण्याचा प्रयास चालू केला आहे. त्यादृष्टीने आगामी काळात कोणत्या घडामोडी घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वास्तविक भाजप आणि 'एमआयएम' यांच्यात छुपी युती असल्यामुळे 'एमआयएम' ही भाजपची 'बी टीम' असल्याचा विरोधकांकडून आरोप केला जातो. त्यामध्ये बरचसे तथ्य आहे. नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतरही आले. समाजवादी पार्टीला मुस्लिमांची जास्त मते मिळू नयेत म्हणून भाजपच्या सांगण्यावरूनच 'एमआयएम' ने अनेक मुस्लिमबहुल मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला. सुमारे ऐंशी मतदारसंघात सपाच्या उमेदवारांचा अतिशय थोड्या मतांनी पराभव झाला. निवडणुकीदरम्यान 'एमआयएम'चे नेते ओवेसी यांच्यावर झालेला गोळीबार देखील असाच संशयास्पद होता असे बोलले जाते. मात्र गोळीबाराच्या घटनेमुळे अपेक्षित तो परिणाम साधला गेला हे मात्र सत्य आहे. दीड -दोन वर्षांपूर्वी बिहार विधानसभेच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील 'एमआयएम' ची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडून नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पुन्हा सत्तारूढ करण्यात भाजपाला यश आले. राजकारणात एरवी कट्टर शत्रू असलेला कसा 'मित्र' होऊ शकतो याचे हे ढळढळीत उदाहरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेचप्रसंग उभा करण्यासाठी 'एमआयएम' चा वापर करण्यात आला असावा आणि त्यानुसार 'एमआयएम'ने महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव दिला असावा असे दिसते. राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांच्यात औरंगाबाद येथे झालेल्या प्रस्तावासंदर्भातील चर्चा लगेच देवेंद्र फडणवीस यांना कशी कळते आणि त्यावर ते तातडीने आपली सविस्तर प्रतिक्रिया कशी काय देतात हाही संशोधनाचा विषय ठरावा.
थोडक्यात सांगायचे तर पाच राज्यांतील भाजपच्या नेत्रदीपक विजयानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याच्या हेतूने भाजपच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा जोर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांना आघाडी सरकार वाचविण्यासाठी कशा प्रकारच्या कसरती कराव्या लागणार आहेत हेही नजीकच्या काळात दिसून येणार आहे.
--- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी -- ९४२२३१९१४३ )
Friday, March 18, 2022
'शिमगा' संपला : राजकीय ' बोंबा ' चालूच राहणार
'' हिंदू धर्म परंपरेत होलिकादहन म्हणजे 'होळी' सणाला खूपच महत्व आहे. समाजातील अनिष्ट रुढी, कुप्रवृत्ती यांच्याविरुद्ध 'बोंबाबोंब' करून त्यांचे होळीत विसर्जन करायची चांगली प्रथा या सणानिमित्त पार पाडली जाते. पहिल्यादिवशी होलिकादहन आणि दुसऱ्या दिवशी 'धुळवड' (म्हणजेच रंगपंचमी) साजरी करून हा सण साजरा केला जातो. वातावरणातील बदलानुसार या सणाच्या काळात उन्हाळ्याचीही चाहूल लागलेली असते त्यामुळे 'रंगपंचमी' खेळायलाही आबालवृद्धांना मजा येते. गेले दोन-अडीच वर्षे 'कोरोना' महामारीचे सावंट असल्यामुळे 'होळी', 'धुळवड' आणि त्यानिमित्ताने केला जाणारा 'शिमगा' साजरा केला जात नव्हता. त्यामुळे यावर्षी 'शिमगा' साजरा करण्यासाठी साहजिकच लोकांमध्ये अतिउत्साह दिसून येत होता. 'कोरोना'मुळे असलेले निर्बंध झुगारून अनेक ठिकाणी हा 'शिमगा' पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
वास्तविक पाहता 'कोरोना'च्या काळात निर्बंधामुळे हा 'शिमगा' साजरा करता आला नाही ही वस्तुस्थिती असली तरी, राजकीय पक्षांनी त्याची कसर भरून काढली होती. राजकीय नेत्यांच्या सभा, राजकीय पक्षांचे मेळावे पाहता 'कोरोना' कोठे आहे असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडत होता. 'कोरोना' च्या काळात देखील विरोधकांवर वार करण्याची एकही संधी राजकीय नेत्यांनी सोडली नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी, न्यूज चॅनेल्सच्या सहकार्याने 'चावडीवरचे राजकारण' घराघरांत नेल्यामुळे जनतेला रोजच हा 'शिमगा' पाहायला मिळत होता. त्यामध्ये कधीच खंड पडला नाही. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून तर या राजकीय 'शिमगा' शिगेला पोहोचला आहे. सत्तारूढ आघाडी आणि विरोधी भाजप मध्ये दररोज होणारी ही 'धुळवड' पाहून जनतेचीही चांगलीच फुकट करमणूक होत आहे. राजकीय नेत्यांकडून परस्परांविरूद्ध केले जाणारे आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून दिले जाणारे आव्हाने-प्रतिआव्हाने पाहून हे राजकीय नेते फक्त 'शिमगा' करण्यासाठीच 'राजकारण' करीत आहेत असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही. अर्थात चोवीस तास राजकारणच करणाऱ्यांच्या हातातच देशाची सत्तासूत्रे आल्यामुळे हे असेच चालणार हे गृहीतच धरावे लागणार असे दिसते.
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील राजकारण हे निवडणूक आणि 'सत्ता' या दोनच गोष्टींभोवती केंद्रित झाल्याचे दिसून येते. येनकेनप्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि 'सत्ता' मिळवायची आणि ती 'सत्ता' पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी राबवायची या दुष्टचक्रात देशातील लोकशाही सध्या सापडली आहे. निकोप लोकशाहीच्या दृष्टीने ही अतिशय घातक गोष्ट ठरणार आहे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे सोयरसुतक नाही अशीच सध्याची परिस्थिती आहे. न्यूज चॅनेलवालयांना तर कसलाच धरबंद राहिलेला नाही. प्रत्येक बातमीचे 'राजकारण' करून त्यांनी या 'राजकीय शिमग्याला' हातभार लावण्याचा विडाच उचलला आहे असे वाटते. एका राजकीय नेत्याची 'आरोप' करणारी लाईव्ह पत्रकारपरिषद झाली की क्षणातच त्या आरोपांचे खंडन करणारी वा प्रतिआरोप करणारी प्रतिस्पर्धी नेत्याची लाईव्ह पत्रकारपरिषद दाखविली जाते. त्यामुळे या 'राजकीय बोंबा' जनतेला चोवीस तास ऐकायला मिळत आहेत. महाराष्ट्रात तर त्याचे प्रत्यंतर रोजच दिसून येते राजकारणाखेरीज जनतेच्या जीवन-मरणाचे असंख्य प्रश्न आहेत मात्र ते या 'राजकीय शिमग्यात' कोणालाच दिसत नाहीत वा ऐकू येत नाहीत ही एका दृष्टीने शोचनीय बाब म्हणावी लागेल.
दररोज होणाऱ्या या राजकीय 'शिमग्या'मुळे महाराष्ट्रातील राजकारणाने मात्र खालची पातळी गाठली आहे. राजकारण हे शेवटी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठीच असते हेच ही राजकीय नेतेमंडळी विसरली आहेत की काय अशी दाट शंका येऊ लागली आहे. राजकीय पक्षांनी आपल्या विचारसरणीला आधीच तिलांजली दिली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अथवा त्यानंतर सत्ता मिळविण्यासाठी कोणते पक्ष कोणत्या पक्षांशी युती करतील याचे 'ताळतंत्र' आता राहिलेले नाही. जनतेनेही त्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आता राजकारणात '' सत्ता मिळविण्यासाठी हपापलेले'' आणि '' सत्ता टिकविण्यासाठी आसुसलेले'' असे दोनच
'पक्ष' राहतात की काय अशी साधार भीती वाटत आहे. तसे झाल्यास या 'राजकीय बोंबा' आणखीनच वाढतील आणि जनतेलाही खरा शिमगा संपला तरी राजकारणातील 'शिमगा ' साजरा करताना होणारी 'बोंबाबोंब' रोजच पाहायला आणि ऐकायला मिळण्याची सवय लागेल.
---- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी -- ९४२२३ १९१४३ )
.
Monday, February 21, 2022
'तिसऱ्या आघाडी' च्या नावाखाली के. चंद्रशेखर राव यांना केंद्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची संधी ?
'' तेलंगणा चे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी नुकतीच मुंबईला भेट देऊन राज्यातील महाविकास आघाडीचे प्रणेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार तसेच मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी 'तिसऱ्या आघाडी'बाबत चर्चा केली. केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध विशेषतः पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष वगळता इतर सर्व राज्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन 'तिसरी आघाडी ' स्थापन करावी यासाठी के. चंद्रशेखर राव गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील काही दिवसापूर्वी पं. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना मुंबईत बोलावून तिसऱ्या आघाडीची संकल्पना मांडली होती. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीं देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घटल्यामुळे या तिसऱ्या आघाडीला चालना मिळू शकेल असे प्रथमदर्शनी तरी वाटते.
गेल्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांचा मोदी-विरोध हा जाहीरपणे प्रकट होतो आहे. ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय संस्थांचा मोदी सरकार विरोधकांविरुद्ध हेतुपुरस्सर दुरुपयोग करीत आहे असा त्यांचाही गंभीर आरोप आहे. याचा अर्थ त्यांनाही त्याचा अनुभव आलेला असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यायाने भाजपाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग नाही म्हटले तरी चांगलाच यशस्वी होताना दिसत आहे. हा प्रयोग तूर्तास महाराष्ट्रापुरताच असला तरी देशपातळीवर देखील अशीच महाआघाडी स्थापन करून भाजपाला विरोध करता येईल अशी कल्पना सर्वप्रथम शरद पवार यांनीच मांडली होती आता ती के. चंद्रशेखर राव यांनीही उचलून धरली असल्याचे त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या मुंबई भेटीवरून दिसून आले. अर्थात या 'तिसऱ्या आघाडी'त काँग्रेसनेही सामील व्हावे अशी शरद पवार यांची इच्छा आहे. त्यासंदर्भात त्यांनी ममता बॅनर्जी यांनाही त्यांच्या मुंबई भेटीत काँग्रेसचे महत्व पटवून दिल्याचे वृत्त होते. के. चंद्रशेखर राव यांना मात्र काँग्रेस वगळून भाजपाविरोधात इतर सर्व प्रादेशिक पक्षांची मोट बांधायची आहे. यासंदर्भात त्यांनी यापूर्वीच द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. स्टालिन यांच्याशीही चर्चा केली होती परंतु काँग्रेस आणि द्रमुक यांचे असलेले मैत्रीसंबंध लक्षात घेता स्टालिन यांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नसावा असे दिसते. तृणमूल काँग्रेस ( बंगाल) आणि समाजवादी पार्टी ( उत्तर प्रदेश ) या पक्षांशीही काँग्रेसचे तसे चांगले संबंध आहेत शिवाय सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनाही यापुढे काँग्रेसचे समर्थन करणार यात शंका नाही त्यामुळे के. चंद्रशेखर राव यांचा काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कसा यशस्वी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वास्तविक, के. चंद्रशेखर राव हे तसे मूळ काँग्रेसचेच. आंध्र प्रदेशचे विभाजन करून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्याचा जेंव्हा केंद्रातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने निर्णय घेतला होता त्याच्या आधी तेलंगणाच्या अस्मितेसाठी याच के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेस सोडून तेलंगणा राष्ट्र समिती नावाचा प्रादेशिक पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर स्वतंत्र तेलंगणा निर्माण झाल्यावर त्याच पक्षाच्या झेंड्याखाली त्यांनी निवडणूक लढविली आणि बहुमत मिळवून ते मुख्यमंत्री झाले. असे म्हणतात की, काँग्रेस श्रेष्ठी आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात आंध्र प्रदेशाच्या विभाजनाच्या आधी झालेल्या परस्पर सामंजस्यानुसार तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यावर तेलंगणा राष्ट्र समिती हा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येईल परंतु तेलंगणात सत्ता मिळाल्यानंतर मात्र के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा शब्द पाळला नाही आणि नंतर तर केंद्रातील काँग्रेसचे सरकार जाऊन काँग्रेस पक्षाचीही वाताहत झाली त्यामुळे के. चंद्रशेखर राव यांचे चांगलेच फावले. आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून तेलंगणावरील आपली पकड घट्ट केली आहे. मात्र त्यांना आता मोदी-विरोधाच्या निमित्ताने केंद्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची स्वप्ने पडू लागली आहेत त्यामुळेच त्यांनी 'तिसरी (महा) आघाडी ' स्थापन करण्यासाठी वेगाने हालचाल सुरु केली असावी असे दिसते. अर्थात काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाला वगळून ही तिसरी आघाडी कशा प्रकारे स्थापन होईल आणि तिला कितपत यश मिळेल याबाबत खुद्द या आघाडीचे नेतेच सांशक आहेत. काँग्रेसने देखील या तिसऱ्या आघाडीबाबत आतापर्यंत तरी फारसे स्वारस्य दाखविलेले नाही. काँग्रेसला 'एकला चलो रे' चेच धोरण स्वीकारायचे आहे असे दिसते. उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने आपल्या या धोरणाची अंमलबजावणी केली आहे.
देशात यापूर्वीही 'तिसऱ्या आघाडीचे प्रयोग झाले आहेत मात्र ते फार काळ टिकले नाहीत असा इतिहास आहे त्यामुळे २०२४ साली भाजपविरोधात देशपातळीवर काँग्रेस वगळून महा आघाडी स्थापन करण्याचा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद या ऐतिहासिक शहरात 'चारमिनार' नावाची जगप्रसिद्ध वास्तू आहे. त्याचा संदर्भ घेता तिसऱ्या आघाडीच्या नावाखाली तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे देशपातळीवर नेतृत्व करण्याच्या स्वप्नांचे 'मिनार' वास्तवात येतात का तेच आता पहावयाचे.
------ श्रीकांत नारायण
(संपर्कध्वनी -- ९४२२३ १९१४३)
Tuesday, February 8, 2022
'लता' नावाचा 'अमर स्वर'
'' सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसापासून टी.व्ही. चॅनेल्सवरून सांगितले जात होते. रविवारी सकाळपासूनच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नेत्यांची वर्दळ वाढत असल्याचे वृत्त ऐकायला मिळत होते. त्याचवेळी मनात शंकेची पाल चुकचुकली आणि ती थोड्या वेळाने खरी ठरली. आठ वाजून १२ मिनिटांनी 'लता' नावाचा 'अमर स्वर' अनंतात विलीन झाला. एका दैवी स्वराच्या युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनाने संगीत सृष्टी स्तब्ध झाली आहे. 'सप्त-स्वर' देखील काही काळापुरते का होईना शांत झाले असतील. गानकोकीळेच्या निधनाच्या वृत्ताने कोकिळेने देखील ऐन वसंत ऋतूमध्ये आज आपले मधुर कूजन केले नसेल. कालच सरस्वती पूजनाचा सोहळा सर्वत्र उत्साहाने साजरा झाला. आणि आज दुर्देवाने 'गानसरस्वती'चा स्वर कायमचा निमाला.
लता मंगेशकर यांच्या स्वरांना खरे तर उपमाच नाही. त्यांनी गायलेले कोणतेही गाणे हे परीस स्पर्श लाभल्याप्रमाणे अद्भुत असायचे त्यामुळे त्यांची हजारो गाणी अजरामर झाली आणि रसिकांच्या ओठांवर ती सहजपणे रुळलेली असायची. मग ते गाणे 'बरसात' मधील असो वा 'सिलसिला' मधील असो. जवळपास तरुणांच्या चार पिढ्या त्यांच्या गाण्यावर पोसल्या गेल्या असे म्हटले तर ते फार अतिशयोक्तीचे ठरणार नाही. अनेक संगीतकार, वादक आले आणि गेले मात्र त्यांच्या सुरात माधुर्य शेवटपर्यंत कायम राहिले. विविध भाषांमध्ये गाणी गाण्याचा त्यांचा विक्रम तर गिनीज बुकमध्ये नोंदला गेला आहे. विशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा जो स्वर होता तोच स्वर वयाच्या अमृतमहोत्सवापर्यंत कायम होता हेच त्यांच्या आवाजाचे अद्भुत रहस्य होते. केवळ भारतातच नाही त्यांचा स्वर सातासमुद्रापलीकडे जाऊन लोकप्रिय झाला. त्यामुळेच परदेशात झालेल्या त्यांच्या कार्यक्रमांना रसिकांची प्रचंड गर्दी असायची.
निसर्गरम्य गोव्यातील मंगेशी हे लता मंगेशकर यांचे मूळ गाव. '' मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे...'' या गाण्यातील उक्तीप्रमाणे साऱ्या मंगेशकर कुटुंबावरच श्री मंगेशाची कृपा होती. वडील दीनानाथ मंगेशकर हे तर संगीत रंगभूमीवरील प्रख्यात गायक-अभिनेते होते. त्यांच्याकडूनच लता मंगेशकर यांना गायनकलेचा वारसा मिळाला आणि त्यांनी तो समर्थपणे शेवटपर्यंत सांभाळला. वडिलांच्या अकाली निधनाने वयाच्या तेराव्या वर्षीच लता मंगेशकर यांच्यावर कुटुंबाचा भार पडला. पाच भावंडांच्या त्या 'लतादीदी' बनल्या. एकीकडे संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करीत लतादीदींनी आपली गायनकला विकसित केली. एवढेच नव्हे तर आपल्या आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ या बहीण-भावंडाना देखील संगीत क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज संपूर्ण मंगेशकर कुटुंब गायन क्षेत्रात अव्वल नंबर आहे त्याचे सारे श्रेय लतादिदींनाच द्यावे लागेल.
सुरुवातीच्या काळात लतादीदी कोल्हापुरात असताना त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्यासारखे गुरू मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीशी त्यांची नाळ तेथेच जोडल्या गेली. 'पहिली मंगळागौर' हा त्यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट मात्र अभिनयापेक्षा गायनकलेलाच त्यांनी प्राधान्य दिले आणि मुंबईला गेल्यानंतर हळूहळू त्या हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून स्थिरावल्या. कालांतराने हिंदी चित्रपटसृष्टीत गायिका म्हणून नंबर एक चे स्थान मिळवून देखील त्यांनी मराठी अस्मितेचा कधीच विसर पडून दिला नाही. वेळोवेळी त्यांनी मराठी भावगीते, अभंग आणि मराठी चित्रपट गीते गाऊन मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करण्यास हातभार लावला. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर ही तर त्यांची दैवते होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची '' जयोस्तुते, महन्मंगले .. ' आणि '' सागरा प्राण तळमळला .... '' या गीतांना तर त्यांनी स्वर देऊन आणि संगीताचा साज चढवून ती गाणी अजरामर केली. या गाण्यांबद्दल मराठी जनता मंगेशकर कुटुंबांचे कायमचे ऋण मानील यात शंका नाही. लतादीदी या प्रखर राष्ट्राभिमानी होत्या. सीमेवरील जवानांसाठी त्या नेहमीच कळकळ आणि तळमळ व्यक्त करायच्या. जे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातून अश्रू आले ते '' ए मेरे वतन के लोगो ....' हे आर्त स्वरातील त्यांचे गाणे म्हणजे त्यांच्या देशप्रेमाचे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल.
अशा या स्वरलतेबद्दल जेवढे लिहिले जाईल तेवढे ते कमीच आहे. आज लतादीदी आपल्यात नाहीत मात्र त्यांनी गायलेली हजारो अजरामर गाणी आपल्याबरोबर आहेत. त्यांच्यामुळेच 'लता नावाचा अमर स्वर ' हा असंख्य रसिकांच्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे. हा स्वर पृथ्वीतलावरून कधीच नष्ट होणार नाही याची लाखो रसिकांना नक्कीच खात्री आहे.
--- श्रीकांत नारायण
(संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३)
Saturday, February 5, 2022
'' आमी ( बि )' घडलो तुमी ( बि ) घडाना ''
" महाराष्ट्रातील 'वाईन' प्रकरण वरचेवर 'कडवट' होताना दिसत आहे. राज्यातील सुपर मार्केट दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर सर्व बाजूने गदारोळ उठलेला असताना त्यामध्ये आता वारकरी संप्रदायही सामील झालेला दिसतो. वारकरी संप्रदायाचे एक नेते बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या धोरणावर टीका करताना अतिशय 'बेताल' वक्तव्य केले. वाईन विक्रीच्या धोरणावरून सत्तारूढ आघाडी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये 'कोण किती पितो, कोठे कोठे घेतो ' अशी परस्परांविरुद्ध आव्हानात्मक भाषा सुरू झाल्यावर बंडातात्यांचाही 'तोल' सुटला असेल. त्यामुळे त्यांनी थेट सुप्रियाताई आणि पंकजाताईं यांचेच 'दारूकाम' काढले. एवढेच नव्हे तर ते सिद्ध करण्याचे 'आव्हान'ही स्वीकारले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा 'वाईन' विक्री वरून गहजब झाला. वास्तविक बंडातात्या हे स्वतःला वारकरी संप्रदायाचे म्हणवितात खरे मात्र यासंदर्भात बोलताना त्यांचीही जीभ घसरली आणि ते नको ते 'बरळले'. असे बोलताना आपण 'वारकरी' आहोत हेही ते विसरले. कोणाच्या विशेषतः महिलांबाबत बोलताना त्यांच्या खासगी जीवनातील काही गोष्टी अशा चव्हाट्यावर आणायच्या नसतात याचेही त्यांना भान राहिले नाही. त्यामुळे बंडातात्यांच्या त्या वक्तव्याचे लगेच तीव्र पडसाद उमटले. त्यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी काय 'घेतले' होते याचा शोध घेण्याची गरज आहे ( नेमके कोण दारू पिऊन बोलले? ) अशा स्वरूपाची प्रतिक्रिया लगेच सत्तारूढ पक्षाची आली. बंडातात्यांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून आपण नावाप्रमाणेच 'बंडखोर' असल्याचे सिद्ध केले आहे.
बंडातात्यांनी वाईन च्या प्रश्नावर टीका करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही सोडले नाही. '' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरेच चांगले आहेत परंतु ते अजितदादामुळे बिघडले '' असे सांगताना त्यांनी 'ढवळ्या शेजारी पवळा बांधला ..... ' या म्हणीचा पुनरुच्चार केला. याचा अर्थ बंडातात्यांचे पवार कुटुंबियांवर 'विशेष प्रेम' दिसते. त्यामुळे बंडातात्यांच्या 'त्या' वक्तव्याची 'राष्ट्रवादी' ने लगेच गंभीर दखल घेतली. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यापासून ते त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यापर्यंत मागणी करण्यात आली. महिला आयोगामार्फतही त्यांच्याविरूद्ध मोहीम उघडण्यात आली. त्यामुळे सातारा पोलिसांनी बंडातात्यांना बोलावून घेऊन त्यांची चौकशी केली आणि त्यांना चांगलीच 'समज' देऊन सोडले . त्यानंतर मात्र बारा तासाच्या आतच बंडातात्यांना 'उपरती' झाली असावी. त्यांनी लगेच आपल्या वक्तव्याबद्दल सर्व संबंधितांची माफी मागितली. त्यामुळे बंडातात्यांची अटक तरी टळली, नाही तर त्यांच्या अटकेवरून सरकार विरोधकांना पुन्हा हातात कोलीत मिळाले असते आणि त्यावरून पुन्हा कोणतेतरी 'महाभारत' घडले असते. बंडातात्यांनी माफी मागितली असली तरी त्याला खूप उशीर झाला होता. त्यामुळे ''बुंद जो गयी वो हौदसे नही आती .... '' असेच त्यांच्याबाबतीत म्हणावे लागेल. बंडातात्या हे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत परंतु त्यांनी कीर्तनाच्या नावाखाली हा जो 'तमाशा' केला तो नक्कीच निषेधार्ह तर आहेच मात्र त्यांच्या हेतूंबद्दलही शंका निर्माण करणारा आहे. त्यांच्या वक्तव्यामागचा 'बोलविता धनी' वेगळाच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यातील 'वाईन प्रकरण' आता कोणत्या स्तराला जाणार आहे हे सांगणे अवघड होत चालले आहे. वाईन विक्री प्रकरणावरून महाविकास आघाडीचे नेते इतर भाजपशासित राज्यांची उदाहरणे देत आहेत. त्या राज्यात कशी सर्रास दारू विक्री होत आहे हे सांगताना नबाब मलिक यांनी ' सर्वात जास्त दारू भाजप नेतेच पितात' असेही विधान केले. 'वाईन विक्रीचा फक्त निर्णय झाला आहे. त्याची अजून अंमलबजावणी होण्यास अवधी असतानाच अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करून सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांचे वस्त्रहरण करीत आहेत. त्यामुळे या निर्णयाची जर अम्मलबजावणी झाली तर मग काय होईल? याची कल्पनाच न केलेली बरी. थोडक्यात सांगायचे तर वाईन विक्री प्रकरणावरून राज्यात ''आमी ( बि )' घडलो तुमी ( बि ) घडाना '' असे 'तमाशा'प्रधान वगनाट्य चालू झाले आहे. दुर्देवाने त्यामध्ये स्वतःला कीर्तनकार म्हणवले जाणारे बंडातात्या कराडकरही सामील झाले. बंडातात्यांना ही 'नसती उठाठेव करायला कोणी सांगितले होते हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहणार आहे.
---- श्रीकांत नारायण
(संपर्कध्वनी - ९४२२३ १९१४३ )
Wednesday, February 2, 2022
'' हे 'षडयंत्र' कोणाचे आहे रे 'भाऊ' ?
''दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा 'ऑफलाईन' घेण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सोमवारी असंख्य विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आतापर्यंत सर्व अभ्यास 'ऑनलाईन' पद्धतीने झाला मग परीक्षाच का 'ऑफलाईन' पद्धतीने घेता? अशी त्यांची मागणी होती. मुंबईतील धारावी भागात शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांच्या घरासमोर निदर्शने करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी वर तर चक्क लाठीमार करण्यात आला. नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जळगाव, नांदेड आणि इतर शहरातही विद्यार्थ्यांनी एकाचवेळी आंदोलन केले. याचा अर्थ हे आंदोलन पूर्वनियोजित होते मात्र या आंदोलनाबाबत राज्य सरकार पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले त्यामुळे अचानक झालेले हे विद्यार्थी-आंदोलन चांगलेच गाजले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तारूढ आघाडीतील पक्ष आणि विरोधी बाकावर बसलेला भाजप यांच्यात परस्परांवर मात करण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवरून जी चिखलफेक सुरू आहे. त्यामुळे महत्वाच्या प्रश्नांबाबत आघाडी सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा हा एक सबळ पुरावा आहे. अलीकडे आघाडी सरकारचा कोणताही निर्णय 'वादग्रस्त' ठरत असून भाजप त्याचे चांगलेच भांडवल करीत आहे असे दृष्टोत्पत्तीस येत आहे. आघाडी सरकारने 'वाईन' बाबत घेतलेल्या निर्णयावरून तर सर्वांचेच 'ताळतंत्र' सुटलेले दिसते जणू काही तोच राज्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे अशा पद्धतीने त्या निर्णयावर 'खल' सुरु झाला आहे. राज्यसरकारच्या निर्णयांवर आतापर्यंत प्रामुख्याने केवळ विरोधी पक्षाचं टीका करीत होते मात्र आता 'समाजमाध्यम' देखील एक प्रमुख 'टीकाकार' बनले आहे हे सरकारने आता लक्षात घेण्याची गरज आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी एकाचवेळी कसे रस्त्यावर उतरले याचे गूढ आघाडी सरकारला वेळीच उमगले नाही. गृहमंत्री वळसे पाटील यांनी त्यामागे पूर्वनियोजित 'षडयंत्र' असल्याचा आरोप केला आहे. मात्र दोन-तीन दिवसापासून या आंदोलनाबाबत समाज-माध्यमांतून संदेश फिरत होते असे आता कळून आले आहे. मग असे असताना सरकारची गुप्तचर यंत्रणा काय काम करीत होती असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. राज्यातील प्रमुख शहरात एकाचवेळी शेकडो विद्यार्थी निदर्शने करतात आणि त्याची माहिती कोणालाच नसते हे गुप्तचर यंत्रणेचे अपयशच म्हणावे लागेल. गृहमंत्री म्हणतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे 'षडयंत्र' असल्याचा आता तपास केला जाईलच. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे कोणीतरी 'हिंदुस्थानी भाऊ' आहे असे आता कळून आले आहे. असंख्य विद्यार्थी ज्याचे ऐकून रस्त्यावर उतरतात तो हा 'हिंदुस्थानी भाऊ' एका दिवसात कसा प्रकाशात आला ? तसे असल्यास तो चमत्कारच म्हटला पाहिजे. आता या 'हिंदुस्थानी भाऊ' उर्फ विकास पाठक यांच्याशी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. याचा अर्थ दहावी-बारावीची परीक्षा 'ऑफलाईन' घेण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी सर्व संबधितांशी विचारविनिमय केलेला दिसत नाही. एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला विरोध होताच पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शविणे म्हणजे आधीच्या निर्णयात खूपच कमतरता असल्याचे सिद्ध करण्यासारखे आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वात जास्त नुकसान झाले ते शिक्षणक्षेत्राचे. 'कोरोना' च्या दहशतीमुळे कोणत्याच निर्णयात ठामपणा नसल्यामुळे '' कधी शाळा सुरू तर कधी बंद '' तर परीक्षा कधी ऑनलाईन तर कधी 'ऑफलाईन' यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कायम संभ्रमावस्थेत राहिले. परीक्षांबाबतही अनेकवेळा गोंधळाचेच वातावरण निर्माण झाले. अर्थात या गोंधळाचे खापर 'कोरोना' च्या वेगवेगळया लाटांवर सोपवून चालणार नाही. विशेष म्हणजे महत्वाच्या निर्णयांबाबत आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये कसलाही समन्वय नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय आहे की एकट्या त्या मंत्र्याने घेतला आहे असाही संभ्रम निर्माण होऊ शकतो.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी आता त्या 'हिंदुस्थानी भाऊ'ला अटक केली आहे. त्यामुळे या आंदोलनामागे नक्की कोणाचे 'षडयंत्र' आहे हे कळून येईल. मात्र या सर्व प्रकरणात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड चांगल्याच तोंडघशी पडल्याचे दिसून आले. शिक्षण खात्यात कोणाचा पायपोस कोणात नाही हेही सिद्ध झाले. यापुढे कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घेतले जावेत आणि त्यामध्ये मंत्रिमंडळाचा सामूहिक चेहरा दिसण्याची गरज आहे. त्यामध्येच महाविकास आघाडी सरकारचे हित आहे.
---- श्रीकांत नारायण
(संपर्कध्वनी - ९४२२३ १९१४३)
Subscribe to:
Posts (Atom)