Tuesday, January 18, 2022

भाषा आणि संस्कृतीवर मनस्वी प्रेम करणारा प्रकाशक

      " मकरसंक्रांतीनंतर लगेचच असलेला रविवार उजाडला तोच एका अत्यंत धक्कादायक बातमीने. माझे सन्मित्र आणि 'पद्मगंधा' प्रकाशनाचे संचालक  अरूण जाखडे यांच्या निधनाची ती बातमी होती. एका सुहृद मित्राने सकाळीच फेसबुकवरच ती दुःखद बातमी टाकली होती त्यामुळे ती वाचून मला सुरुवातीला  धक्काच बसला. कारण अरुण जाखडे असे एकाएकी सर्वांना सोडून जातील असे कोणालाही स्वप्नातही वाटले नव्हते. ती बातमी खोटी ठरावी असेच मनोमन वाटत होते मात्र नंतर लगेचच एका मित्राचा फोन आला. बातमी खरीच होती त्यामुळे घाईघाईतच जाखडे यांचे घर गाठले. त्यांच्या घरातील हॉलमध्ये ठेवलेला जाखडे यांचा अचेतन देह पाहून गलबलून आले. त्यांच्या परिवाराचे कसे सांत्वन करावे हेच कळत नव्हते. विमनस्क अवस्थेत बसून राहिलो. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या आमच्या कौटुंबिक मैत्रीच्या कितीतरी गोष्टी आठवत राहिल्या.       अरूण जाखडे हे तसे पाहता सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले. नगर जिल्ह्यातील पेडगाव सारख्या छोट्या खेडेगावात ते लहानाचे मोठे झाले. घरची शेतीवाडी. निसर्गाच्या सानिध्यात बालपण गेल्यामुळे ग्रामीण संस्कृतीशी त्यांची नाळ लहानपणापासूनच जोडलेली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत कधीच तुटू दिली नाही कारण ग्रामीण संस्कृतीचे महत्व आणि तिचे मोठेपण त्यांना कधीच उमगले होते. ही  ग्रामीण संस्कृती टिकविण्यासाठी त्यांनी साहित्याच्या रूपाने 'इर्जिक' घालण्याचे सातत्याने प्रयत्न केले. म्हणूनच त्यांचे 'पद्मगंधा' प्रकाशन कायमस्वरूपी दर्जेदार ठरले.       विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी म्हणून अरुण जाखडे पुण्यासारख्या मोठ्या शहरात आले. सुरुवातीला काही छोट्या कंपन्यात काम केल्यानंतर ते 'बजाज टेम्पो ' सारख्या नामांकित कंपनीत कामाला लागले.  तांत्रिक कामगार म्हणून काम करीत असतानाही त्यांनी आपले 'साहित्यिक मन' कधीच करपू दिले नाही. त्यांनी आपल्या कंपनीतीलच कामगारांच्या साहित्याला प्राधान्य देऊन  पहिला 'पद्मगंधा' दिवाळी अंक प्रकाशित केला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. ग्रामीण संस्कृतीवर जोपासलेला त्यांचा साहित्यिक पिंड त्यानंतर सतत बहरतच गेला. 'पद्मगंधा' दिवाळी अंकाबरोबरच जाखडे यांनी 'पद्मगंधा' प्रकाशनही सुरू केले. प्रकाशनक्षेत्रात आगळेवेगळे आणि दर्जेदार साहित्य देण्याचा त्यांनी पहिल्यापासूनच संकल्प केला होता आणि आणि तो शेवटपर्यंत निर्धाराने पाळला. दर्जेदार साहित्यासाठी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. याबाबतीत त्यांनी दाखविलेला स्पष्टपणा आणि परखडपणा अनेकांना कदाचित रुचला नसेल मात्र आपल्या निष्ठेपासून ते कधीही ढळले नाहीत. जाखडे यांचे लोकसंस्कृतीवर मनापासून प्रेम होते त्यामुळे सुरूवातीच्या काळात ज्येष्ठ संशोधक आणि लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाबाबत त्यांना कमालीचा आदर होता आणि वेळोवेळी तो ते प्रकट करायचे. डॉ. ढेरे यांच्यामुळेच मी प्रकाशनक्षेत्रात उतरलो असे ते चर्चेत अभिमानाने सांगायचे.       अरुण जाखडे  केवळ प्रकाशक नव्हते तर स्वतः उत्तम लेखक होते. त्यामुळे त्यांना साहित्याची उत्कृष्ट जाण होती त्यामुळेच 'पद्मगंधा' च्या प्रकाशित पुस्तकांमध्ये लेखन साहित्याची विविधता असे. डॉ. रा. चिं. ढेरे यांच्याशिवाय,  डॉ. अरूणा ढेरे, डॉ. रामचंद्र देखणे, गणेश देवी,  नीलम गोऱ्हे, जयदेव गायकवाड आदी मान्यवरांची त्यांनी विविध विषयांवरील ग्रंथ प्रकाशित केले. याशिवाय बालसाहित्यापासून 'छंद' विषयाला वाहिलेली पुस्तकेही प्रकाशित करून त्यांनी अनेक नव्या लेखकांना प्रोत्साहित केले.  भाषा आणि संस्कृती यांच्यावर त्यांचे विलक्षण प्रेम होते त्यातूनच त्यांनी सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ्  श्री गणेश देवी यांच्या साहाय्याने भारतीय सर्वेक्षण हा मोठा प्रकल्प हाती घेऊन तो मार्गी लावला होता त्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीतील एका खास कार्यक्रमात त्यांचा गौरवही करण्यात आला होता.  परकीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट साहित्याचा 'उत्तम अनुवाद' करून तो मराठी वाचकांपर्यंत नेण्याचा स्तुत्य उपक्रमही त्यांनी केला. प्रख्यात लेखक आणि नाटककार मधुकर तोरडमल यांच्याकडून त्यांनी 'अगाथा ख्रिस्ती' च्या रहस्यमय कथांची मालिकाच ग्रंथरूपाने प्रकाशित केली होती. तसेच जेन पॉल सार्त्र यांचे अनुवादित आत्मचरित्र, त्यांनी मराठीत आणले. त्यांची स्वतःची 'पाचरूट', 'इर्जिक', 'गावमोहोर', 'हुसेनभाई बाताड्या' आदी पुस्तके म्हणजे उत्कृष्ट ग्रामीण साहित्याचा नमुना होता.          अरुण जाखडे यांचे आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले चिरंजीव अभिषेक जाखडे यांनाही इंग्रजी साहित्याची उत्तम जाण आहे तेही चांगला अनुवाद करतात. परकीय भाषांमधील उत्तमोत्तम  कथा मराठी भाषेत आणण्यासाठी त्यांनीही पुढाकार घेतला आणि त्यामधून ''उत्तम अनुवाद'' या दिवाळी अंकाचा जन्म झाला. यानिमित्ताने 'पद्मगंधा' दिवाळी अंकाला एक चांगले भावंड मिळाले. या दोन्ही दिवाळी अंकांनी दर्जेदार साहित्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून कायम टिकविली आहे. स्वभावात परखडपणा असूनही जाखडे गप्पावेल्हाळ होते. माणसांमध्ये रमण्यात त्यांना विलक्षण आनंद मिळत असे. त्यामुळेच त्यांचे सर्व क्षेत्रात असंख्य मित्र होते. अनेक मित्रांशी तर त्यांनी कौटुंबिक मैत्रीचे नाते जोडले होते. अर्थात या कामात त्यांना त्यांच्या सहधर्मचारिणीचा फार मोठा वाटा होता. श्रीमती जाखडे यांनी बँकेत नोकरी असतानासुद्धा घरातील कुळधर्म- कुळाचारांसह घरची सर्व जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळली. त्यांच्या बळावरच जाखडे यांनी नोकरी सोडून पूर्णपणे प्रकाशन व्यवसायाला वाहून घेतले आणि मराठी प्रकाशन विश्वात 'पद्मगंधा' प्रकाशनाच्या नावाने एक मानदंड प्रस्थापित केला. त्यांच्यासारखा भाषा आणि संस्कृतीवर मनस्वी प्रेम करणारा लेखक-प्रकाशक अचानक गेल्यामुळे मराठी प्रकाशनविश्वाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे हे कोणीही मान्यच करेल. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.                 ---- श्रीकांत ना. कुलकर्णी                ( संपर्क ध्वनी -- ९४२२३ १९१४३ )

No comments:

Post a Comment