Wednesday, June 2, 2021

'देशमुखी' थाटात राजकारण करणारा 'रसिक' नेता

'' महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आडवा विस्तव जात नाही असे बोलले जाते. ठाकरे सरकारच्या प्रत्येक कृतीवर जोरदार टीका करताना हे सरकार कसे अकार्यक्षम आहे हे सांगण्याचाच विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचा खासा प्रयत्न असतो. परंतु एक काळ असा होता की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते हे एका ताटात जेवण करीत असल्यासारखे परस्परांशी वागत होते. राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात आहे की तोही सत्तारूढ आघाडीचा एक भाग झाला आहे तसेच मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांना खिशात घालून फिरताहेत का? अशी विचारणा होण्याइतपत त्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्याची घनिष्ठ मैत्री होती. ते मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि ते विरोधी पक्षनेते होते गोपीनाथराव मुंडे. दोघेही मराठवाड्याचे नेते होते. दुर्देवाने आज ते दोघेही हयात नाहीत. मात्र हा चमत्कार घडविला होता तो विलासराव देशमुख यांच्या सदैव हसतमुख, खेळकर आणि उमद्या स्वभावामुळे. त्यांच्या नेतृत्वगुणांचे तेच तर मुख्य वैशिष्ट्य होते. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील बाभळगाव सारख्या छोट्या गावच्या सरपंचपदापासून ते महाराष्ट्रासारख्या देशातील एका मोठ्या राज्याचा दोन वेळा मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. मूळचे लातूर तालुक्यातील बाभळगावचे असलेले विलासराव यांना त्यांच्या आजोबांपासून निजामाच्या राजवटीत 'जहागिरी' मिळाली होती. विलासरावांचे वडील दगडोजी देशमुख हेही बाभळगावचे सरपंच होते. लोकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी ते सतत घोड्यावरून फिरत असत. त्यामुळे त्यांना पंचक्रोशीत फार मान होता. विलासरावांनी हाच वारसा पुढे चालविला. प्रथम बाभळगावचे सरपंच, त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य होऊन राजकारणाचा श्रीगणेशा केला. काही काळ युवक काँग्रेसची पताकाही खांद्यावर घेऊन काँग्रेसचे निष्ठेने काम केले. लातूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ते वकिलीच्या शिक्षणासाठी म्हणून पुण्याला आले. आयएल एस लॉ कॉलेजमध्ये शिकताना पुण्यातच त्यांची वैचारिक बैठक आणखी पक्की झाली. पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचा आणि मराठवाड्याचे नेते शंकरराव चव्हाण यांचा परिचय झाला आणि पुढे राजकारणात विलासराव त्यांचे पट्टशिष्य झाले. मराठवाड्यातील या दोन्ही नेत्यांचे गुरू-शिष्याचे नाते शेवटपर्यंत कायम होते. लातूर शहराच्या सर्वांगीण विकासात विलासरावांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. आज लातूर शहराचा भव्य कायापालट पाहता त्याची प्रचिती येते. विलासरावांनी आपल्या 'देशमुखी' थाटातच सारे 'राजकारण' केले. नावाप्रमाणे ते 'विलासी' नव्हते तर खऱ्या अर्थाने 'रसिक' होते त्यामुळे सांस्कृतिक मंत्री असताना बड्या सेलेब्रिटीपासून ते सामान्य लोककलावंतांपर्यंत त्यांचा संपर्क होता. त्यांचा हसतमुख स्वभाव, बोलण्याची ढब, वक्तृत्वशैली, आणि विरोधकांना शालजोडीतून मारलेले जोडे हे जसे जनतेला आवडायचे तसेच त्यांच्या विरोधकांनाही त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. सुरुवातीला राज्यमंत्री नंतर कॅबिनेट मंत्री असा त्यांचा यशस्वी प्रवास होत गेला. त्यातच श्री शंकरराव चव्हाण केंद्रात गेल्यामुळे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला विलासरावांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व मिळाले. शरद पवार यांना 'आव्हान' देऊ शकणारा नेता अशीही त्यांची प्रतिमा झाल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा त्यांच्यावर लगेच विश्वास बसला आणि १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतर विलासराव महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले मात्र दुर्देवाने विलासराव मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करू शकले नाहीत. राजकारणातील शह-काटशहाचे परिणाम त्यांनाही भोगावे लागले. त्याच्याही आधी म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 'पवार-विरोध' नडला. त्या निवडणुकीत विलासराव लातूर मतदारसंघातून पराभूत झाले. असे म्हणतात की महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने त्यांच्या मतदारसंघात 'मामुली' ( मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत ) फॅक्टरचा वापर करून विलासरावांचा पत्ता ठरवून 'कट' करण्यात आला. त्यानंतर साधारण वर्षभराने झालेल्या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीतही विलासरावांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारले. त्यावेळी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे शिवाजीराव देशमुख, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले छगन भुजबळ आणि रामदास फुटाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी फुटाणे यांना कवी आणि साहित्यिक म्हणून काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. मात्र रामदास फुटाणे यांनी विलासराव बरोबर असलेली आपली मैत्री लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेण्याची तयारीही दर्शविली होती परंतु फुटाणे यांच्या उमेदवारीवर तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नरसिंह राव ठाम होते त्यामुळे विलासरावांनी त्यावेळी चक्क पक्षाविरूद्ध बंडखोरी केली आणि ते 'अपक्ष' म्हणून निवडणुकीत उभे राहिले. दुर्देवाने दुसऱ्या फेरीत त्यांचा एका मताने पराभव झाला. ( तेथेही त्यांना पवार-विरोधच नडला ) शिवाय बंडखोरी केल्याबद्दल त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. ( बंडखोरी केल्यानंतर साहजिकच पत्रकारांनी त्यांना '' तुम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ असताना अचानक बंडखोरी का केलीत ? '' असा प्रश्न विचारला होता त्यावेळी विलासरावांनी, मला राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे असे बाणेदार उत्तर दिले होते व नंतर ते त्यांनी खरे करून दाखविले ) अर्थात विलासरावांचा राजकारणातील हा बॅडपॅच फार काळ टिकला नाही त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यात आले आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत ते लातूर मतदारसंघातून तब्बल ९० हजार मतांनी निवडून आले आणि काँग्रेस श्रेष्ठींचा विश्वास संपादन करून मुख्यमंत्री झाले मात्र दोन्ही काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून ते पूर्ण पाच वर्षे काम करू शकले नाहीत. त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पुन्हा उचल खाल्ली आणि २००३ मध्ये पक्षश्रेष्ठींनी त्यांना अचानक राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यांच्या जागी शरद पवार यांच्या विश्वासातील म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यानंतर २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीला राज्यात पुन्हा बहुमत मिळाले. मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा थोड्या कमी जागा मिळाल्या त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीने दावा केला मात्र मुख्यमंत्रीपद काँग्रेसलाच मिळावे यासाठी काँग्रेस आग्रही राहिली त्याबदल्यात महत्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यास काँग्रेसने अनुकूलता दर्शविली. आणि पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विलासराव यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना मुख्यमंत्री केले आणि विलासरावांनी पुढे अत्यंत चतुराईने विधानसभेत काँग्रेस आमदारांची संख्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त करण्याची किमया साधली. परंतु याही वेळेला विलासराव मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करू शकले नाहीत, २००८ साली मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला ( २६/११ ) आणि त्याच्या अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र विलासराव त्या मागणीला बधले नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी फार मोठी खेळी केली. त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आर.आर.पाटील यांना त्यांनी, हल्ल्याप्रकरणी नैतिकता स्वीकारून राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विलासरावांना पर्यायच शिल्लक राहिला नाही त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र जाता जाता मराठवाड्यातीलच दुसरे नेते अशोकराव चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर २०११ साली विलासरावांची राज्यसभेवर वर्णी लावून त्यांना पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून घेण्यात आले आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरील आपला विश्वास पुन्हा सार्थ ठरविला. दुर्देवाने विलासरावांना जास्त आयुर्मान लाभू शकले नाही. २०११ सालीच त्यांची प्रकृती अचानक ढासळली. लिव्हर आणि किडनीच्या विकाराने त्यांना ग्रासले. पुढील उपचारासाठी त्यांना चेन्नईला हलविण्यात आले मात्र रुग्णालयात उपचार चालू असतानाच १४ ऑगस्ट २०१२ साली त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राने एक चांगला उमदा आणि कर्तृत्वान नेता गमावला. देशमुख परिवारात 'थोरले साहेब' म्हणून सर्वपरिचित असलेल्या विलासरावांना एकूण तीन मुलगे. त्यापैकी अमितजी आणि धीरज हे राजकारणात त्यांचा वारसा आज पुढे चालवित आहेत. अमितजी तर महाराष्ट्रातील सध्याच्या आघाडी सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री आहेत. तर धीरज हे लातूर (ग्रामीण) चे आमदार आहेत. तिसरे चिरंजीव रितेश देशमुख यांनीही अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आजही आणि यापुढेही जेंव्हा जेंव्हा लातूरचे नाव घेतले जाईल तेंव्हा तेंव्हा विलासराव देशमुख यांची आठवण निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही हीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची खरी पावती आहे. ----- श्रीकांत नारायण

Tuesday, April 6, 2021

खडतर वाटचालीनंतर भाजपची यशस्वी घौडदौड

खडतर वाटचालीनंतर भाजपची यशस्वी घौडदौड ------------------------------------- " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार २०१४ सालापासून केंद्रात सत्तेवर आहे. २०१४ साली भाजपला लोकसभेत २८३ जागा मिळाल्या होत्या तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपने तब्बल ३०३ जागा मिळवून काँग्रेससह इतर सर्व विरोधी पक्षांची धूळधाण केली होती. विद्यमान लोकसभेत तीनशेहून जास्त जागा मिळविणाऱ्या भाजपला १९८४ साली लोकसभेत अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते यावर आता कोणाचा विश्वास बसणार नाही परंतु ती वस्तुस्थिती होती. केंद्रात तसेच राजस्थान आणि महाराष्ट्र वगळता देशातील बहुतेक सर्व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपने आज भारतात नंबर एकचा राजकीय पक्ष म्हणून महत्वाचे स्थान पटकावले आहे. मागे वळून पाहिल्यास ‘जनसंघ’ ते ‘भाजप’ असा प्रवास करणाऱ्या आणि एकेकाळी ‘शेटजी-भटजींचा’ पक्ष म्हणून हिणविल्या गेलेल्या भाजपने गेल्या सत्तर वर्षात स्थित्यंतराबरोबरच अनेक महत्वाचे चढउतार पाहिले आहेत. भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janata Party) स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत झाली. मात्र त्यामागे ‘भारतीय जनसंघ’ हाच मूळ चेहरा होता. रा. स्व. संघाने विविध क्षेत्राप्रमाणे राजकीय क्षेत्रातही आपली संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर १९५१ साली श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. अर्थातच हिंदुत्वाचा अंगीकार हेच या पक्षाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या पक्षाला फारसा जनाधार नव्हता. जनसंघाचे त्यावेळी ‘दिवा’ हे चिन्ह होते. हा ‘दिवा’ त्याकाळात तसा मिणमिणताच होता. तरीही हळूहळू जनसंघाने राजकारणात आपले पाय रोवायला चांगली सुरुवात केली होती. त्याकाळात जनसंघाचे किमान दहा-बारा खासदार लोकसभेवर निवडून यायचे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात ही राज्ये तर कालांतराने या पक्षाचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जाऊ लागले होते. महाराष्ट्रातही रामभाऊ म्हाळगी, उत्तमराव पाटील, हशू अडवाणी यांच्यासारखे जनसंघाचे किमान सात-आठ आमदार त्याकाळी विधानसभेवर हमखास निवडून यायचे. १९७३ साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशात ‘संपूर्ण क्रांती’चे वारे वाहायला सुरुवात झाली. त्या आंदोलनाला तरुण वर्गाचा पाठिंबा मिळू लागला. सर्व विरोधी पक्षांसह जनसंघानेही या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. हे आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ साली देशात आणीबाणी जारी केली. सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले. १९७७ साली इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणूक घेण्याची घोषणा केली. इंदिरा काँग्रेसला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे ठरविले आणि तुरुंगातच जनता पक्षाची स्थापना झाली. जनसंघही या नव्या पक्षात विलीन झाला होता. त्या निवडणुकीत जनतेने ‘आणीबाणी’च्या विरोधात जनता पक्षाला प्रचंड विजय प्राप्त करून दिला. इंदिरा गांधींचाही पराभव झाला. आणि पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. निवडून आलेल्या जनता पक्षाच्या खासदारांमध्ये ९३ खासदार मूळ जनसंघाचे होते. मात्र दुर्देवाने जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासूनच त्या पक्षात सुंदोपसुंदी सुरु झाली होती त्यामुळे दोन वर्षानंतर मोरारजी देसाई यांचे सरकार गडगडले. त्यानंतरही जनता पक्षात लाथाळ्या चालूच होत्या. रा. स्व. संघाशी (Rashtriya Swayamsevak Sangh) असणाऱ्या संबंधावरून समाजवादी नेत्यांनी जनसंघाच्या नेत्यांना ‘टार्गेट’ करायला सुरुवात केली. त्यामुळे या पक्षात राहायचे असल्यास हिंदुत्वाला तिलांजली देणे शहाणपणाचे ठरणार नाही हे ओळखून अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी आदी प्रमुख नेत्यांनी आपला नवीन पक्ष स्थापन करण्याचे ठरविले आणि भारतीय जनता पक्षाचा १९८० साली जन्म झाला. दरम्यान जनता पक्षाचे पतन झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी केंद्रात पुन्हा सत्ता हस्तगत केली होती .दुर्देवाने १९८४ साली त्यांची भीषण हत्या झाली. त्याच साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि राजीव गांधी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर आले. या निवडणुकीत वाजपेयी, अडवाणी, आदी नेत्यांचा दारुण पराभव झाला आणि भाजपचे अवघे दोनच खासदार लोकसभेवर निवडून आले. पक्षाची पीछेहाट लक्षात घेऊन नेत्यांनी पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्णय घेतला. राजीव गांधींच्या राजवटीतच अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शिलान्यास त्यांच्याच हस्ते झाला होता. मात्र यामुळे काँग्रेसची खात्रीशीर असलेली मुस्लिम व्होट बँक नाराज होईल या भीतीने नंतर त्यांनीच न्यायालयात जाऊन मंदिर उभारणीच्या कामाला स्थगिती आणली. भाजपने या परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरविले. विश्व हिंदू परिषदेने आधीच याप्रकरणी आंदोलनाची तयारी सुरु केली होती. अयोध्यातेतील श्रीराम मंदिराच्या प्रश्नाच्या निमित्ताने भाजपने आपले हिंदुत्वाचे धोरण अधिक आक्रमक आणि व्यापक करण्यासाठी जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ‘रथयात्रे’ची कल्पना पुढे आली. श्री लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) हे या रथयात्रेचे ”प्रणेते” होते. सोमनाथ मंदिरापासून अयोध्येपर्यंत काढण्यात यावयाच्या या रथयात्रेला सर्वत्र सामान्य जनतेचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकीय पक्ष म्हणून भाजपचा जनाधार वाढत गेला. त्याचा परिणाम म्हणून १९८९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकदम ८६ जागा मिळाल्या तर काँग्रेसचा पराभव होऊन केंद्रात व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सत्तेवर आले. तेही भाजपच्या पाठिंब्यावर. मात्र बिहारमध्ये अडवानींची रथयात्रा रोखण्यात आल्यानंतर भाजपने सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि हे आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर १९९१ साली लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होऊन भाजपाला ११७ जागा मिळाल्या. याशिवाय उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश या प्रमुख राज्यात भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाले आणि या चारही राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीतच राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये प्रचार सभेत हत्या झाली त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसला लोकसभेत सर्वात जास्त जागा मिळाल्या आणि पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यानंतरही भाजपने श्रीराम मंदिर – बाबरी मशिदीचा प्रश्न लावूनच धरला होता. १९९२ च्या डिसेंबरमध्ये कारसेवेच्या नावाखाली असंख्य कारसेवक बाबरी मशिदीत घुसले आणि बाबरी मस्जिद जमीनदोस्त झाली. मात्र त्याचा परिणाम म्हणून देशात ठिकठिकाणी जातीय दंगली सुरु झाल्या. धूर्त नरसिंह राव यांनी हेच निमित्त साधून भाजपची सत्ता असलेली चारही राज्ये एका क्षणात बरखास्त केली. शिवाय त्यावेळी विरोधीपक्षनेते असलेले लालकृष्ण अडवाणी यांनाही बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी माफी मागावी लागली तसेच विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला. अशा प्रकारे बाबरी मशीद जमीनदोस्त करण्याच्या घटनेमुळे भाजपची बदनामी होऊन पक्षाची जबरदस्त पीछेहाट झाली. मात्र ‘वाईटातून चांगले होते’ या उक्तीप्रमाणे त्यानंतर १९९६ साली झालेल्या निवडणूकीत भाजपला लोकसभेत सर्वात जास्त म्हणजे तब्बल १६१ जागा मिळाल्या आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारही केंद्रात सत्तारूढ झाले. मात्र ते १३ दिवसच टिकले कारण अपेक्षित बहुमत वाजपेयी सरकारला प्राप्त करता येऊ शकले नाही. त्यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत मात्र भाजपप्रणित ‘एनडीए’ने एकत्रित निवडणूक लढविली आणि वाजपेयींच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा सत्ता हस्तगत केली मात्र एका वर्षातच एनडीए मधील जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने पाठिंबा काढून घेतल्यामुळे वाजपेयी सरकार अल्पममतात आले आणि पुन्हा १९९९ साली मध्यावधी निवडणुका झाल्या त्यावेळी भाजपने तब्बल १८३ जागा जिंकल्या आणि वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा एनडीए चे सरकार सत्तारूढ झाले. लालकृष्ण अडवाणी हे त्यावेळी उपपंतप्रधान होते. हे सरकार साडेचार वर्षे टिकले मात्र त्यानंतर २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘शायनिंग इंडिया’ हा नारा कामी आला नाही. या निवडणुकीत भाजपचा अनपेक्षितपणे पराभव झाला आणि केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणित युपीए आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होऊन पुन्हा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसप्रणित युपीए आघाडीचे सरकार सत्तेवर आले. १९९९ साली केंद्रात वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तारूढ होण्यापूर्वीपासूनच गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाने चांगला जम बसविला होता. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हॅटट्रिक केली होती. गुजरातबाहेरही त्यांच्या खंबीर नेतृत्वाची प्रशंसा होत होती. भाजपने याचा लाभ घेण्याचे ठरविले आणि २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचाच चेहरा पुढे करून लोकसभा निवडणुका लढविल्या आणि या निवडणुकीत भाजपाला तब्बल २८३ जागा मिळून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए चे सरकार केंद्रात पुन्हा सत्तेवर आले. त्यानंतर मोदी यांच्याच आग्रहावरून त्यांचेच गुजरातमधील निकटचे सहकारी अमित शहा भाजपचे अध्यक्ष बनले आणि मोदी – शहा यांनी मिळून पुढच्या निवडणुकीत (२०१९) भाजपला तीनशेहून अधिक जागा मिळविण्यात यश मिळविले. या बहुमताच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील एक प्रमुख वचन पूर्ण केले आहे. तसेच मुस्लिम धर्मातील ‘तिहेरी तलाक’ पद्धत रद्द करून मुस्लिम समाजाच्या सुधारणेसाठीही पाऊल टाकले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचा मार्गही आता मोकळा झाला आहे. गेल्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडला. समान नागरी कायदा हे भाजपचे आणखी एक प्रमुख उद्दिष्ट असून बहुमत कायम राहिल्यास तेही उद्दिष्ट एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आज नरेंद्र मोदी – अमित शहा तसेच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू चौफेर घौडदौड करीत आहे. केंद्रासह देशातील सर्व प्रमुख राज्यात भाजपाची निर्विवाद सत्ता आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशांनीही भारत एक शक्तिशाली देश बनला असल्याची ग्वाही दिली आहे. मुख्य म्हणजे भाजपच्या पाठीशी रा. स्व. संघासारखी बळकट सांस्कृतिक संघटना आहे. त्यामुळे पुढील पंधरा वर्षे तरी भाजपच्या सत्तेला ग्रहण लागणार नाही अशी सध्याची एकूण परिस्थिती आहे. – श्रीकांत नारायण

Wednesday, January 13, 2021

'' दवंडी '' चा अस्त

'' दवंडी '' चा अस्त ------------------------- आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही गेली कित्येक वर्षे डफ किंवा हलगीच्या आवाजासह खेडोपाडी ऐकू येणारी '' ऐका हो ऐका '' ची 'दवंडी' आता इतिहासजमा झाली आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असलेल्या 'आघाडी' सरकारनेच एका खास निर्णय घेऊन ही 'दवंडीची प्रथा' इतिहासजमा केली आहे. एरव्ही 'दवंडी' द्वारे दिली जाणारी ग्रामसभेची सूचना किंवा गावकऱ्यांना दिली जाणारी काही महत्वाची माहिती यापुढे मोबाईलमधून 'एसएमएस' द्वारे दिली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. सध्याच्या संगणकयुगात 'हायटेक' होऊ पाहणाऱ्या राज्य प्रशासनाने 'दवंडी' ला कायमची रजा देण्याचा निर्णय घेणे केंव्हा तरी अपेक्षितच होते. त्यानुसार आता कोणत्याही गावात 'दवंडी' ऐकू येत नाही. खरे तर 'दवंडी' ची प्रथा खूप प्राचीन आहे. आपल्याकडे राजा-महाराजांच्या काळापासून या 'दवंडी' चा 'डिंगोरा' पिटला जात असे. एखाद्या राजाला प्रजेला काही महत्वाची सूचना अथवा माहिती द्यायची असेल तर अशावेळी प्रामुख्याने 'दवंडी' चाच वापर केला जाई. तीच प्रथा पुढे चालत आली आणि अगदी अलिकडच्या काळापर्यंत पंचायतीच्या कारभारात 'दवंडी' चा सर्रास वापर होत असे. 'दवंडी' देण्याचे काम प्रामुख्याने गावातील 'वेसकरा'कडे असायचे. हा 'वेसकर' गावाच्या 'रखवाली' चेही काम करीत असे. 'दवंडी' देण्याची वेसकराची खास पद्धत असे. तो 'दवंडी' द्यायला निघे तोच मुळी हातात 'डफ' किंवा 'हलगी' घेवून. हा 'डफ' किंवा 'हलगी' वाजवीत तो चौका-चौकात जाई आणि गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेई. त्याच्या भोवती गावकरी जमा झाले की हा वेसकर सुरुवातीलाच आपल्या भरदार आवाजात 'ऐका हो ऐका' अशी आरोळी ठोकून ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतीने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहिती सांगायचा. त्याची माहिती देवून झाले की, जमलेले लोक आपापसात चर्चा करीत तेथून पांगत असतं. 'दवंडी' द्वारे 'ऐका हो ऐका' करीत हा वेसकर गावाची पूर्ण फेरी करी आणि पुन्हा चावडीवर ( ग्रामपंचायतीची कचेरी ) येत असे. 'दवंडी' देणाऱ्या वेसकराचे गावातील लहान मुलांना विशेष आकर्षण असे. 'दवंडी' देत तो आला की, अनेक लहान मुले त्याच्याबरोबर पळत, नाचत जात असतं. अशावेळी आपल्या अंगावर पुरेसे कपडे आहेत की नाहीत याचेही त्यांना पुरेसे भान राहत नसे. काही मुले तर या वेसकराबरोबर संपूर्ण गावाची 'फेरी' मारण्याचा आनंद लुटत असतं. ही 'दवंडी' देताना आपण आज गावकऱ्यांना काहीतरी खास सांगणार आहोत याचा सार्थ अभिमान वेसकराच्या चेहऱ्यावर झळकायचा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत टिकायचा. काही वेसकर तर 'दवंडी' देण्यासाठी खास ठेवणीतले कपडे घालून यायचे. आमच्या लहानपणी तुळजापूर गावात हरिबा नावाचा वेसकर 'दवंडी' द्यायचा. 'दवंडी' देतानाचा त्याचा तो 'रुबाब' पहायलाही लोक गर्दी करायचे. 'दवंडी' वाल्याचे हे रूप आता यापुढे पाहायला मिळणार नाही. कारण हा 'दवंडी' वाला आता इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे यापुढे सहसा 'ऐका हो ऐका' ची आरोळी ऐकू येणार नाही. कारण राज्य शासनानेच '' 'ऐका हो ऐका' यापुढे कोठेही 'दवंडी' पिटली जाणार नाही'' असे जाहीर केले आहे. काळाच्या ओघात अनेक गावेच नव्हे तर 'राजवटी'ही नष्ट झाल्या तेथे एका दीड दमडी 'दवंडी' ची ती काय कथा? 'कालाय तस्मे नम:' म्हणतात ते यालाच. ---- श्रीकांत ना. कुलकर्णी (मोबा. --- ९४२२३१९१४३)

Wednesday, September 9, 2020

शंकरराव सरदेशपांडे : एका समर्पित जीवनाचा अस्त

शंकरराव सरदेशपांडे : एका समर्पित जीवनाचा अस्त ----------------------------------------- माणसाचा मृत्यू अटळ असतो असे म्हणतात. असे असले तरी प्रत्येक माणसाची आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची 'मृत्यू तू येऊ नकोस ... ' अशीच धारणा असते. मात्र अनेकदा नियती आपल्या क्रूर खेळाचे दर्शन घडविते आणि अशा काही परिस्थितीत माणसाला मृत्यू येतो की, त्या परिस्थितीपुढे सर्वचजण हतबल ठरतात. आमच्या अप्पांच्या ( शंकरराव सरदेशपांडे ) बाबतीत नेमके हेच घडले असे म्हणावे लागेल. वास्तविक पाहता आप्पांचे वय (८८ वर्षे ) उतरणीला लागले होते. वृद्धापकाळाने त्यांना जवळ केले असले तरी सुखी आणि आनंदी जीवनाचा मंत्र स्वतः जपून तो इतरांना देण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू असायचा. नातवंडा-पतवंडांमध्ये रमलेला त्यांचा खेळकर आणि बोलका स्वभाव त्याचीच सर्वांना साक्ष देत होता. त्यांच्या निधनाच्या आधी पंधरा दिवस आधी त्याची प्रचिती माझ्यासह अनेकांनी घेतली होती. आपल्या जवळच्या आप्तस्वकीयांना मोबाईलवरून प्रत्यक्ष बोलतांना त्यांचा जीवन जगण्याचा दुर्दम्य उत्साह जाणवत होता. असे असतानाच त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे आणि नंतर थोड्याच दिवसात त्यांच्या निधनाचे दुःखद वर्तमान ऐकायला मिळते काय ? हे सारे खरोखरच अनाकलनीय होते. त्यांच्या निधनानंतर साहजिकच त्यांच्याविषयीच्या अनेक स्मृती जाग्या झाल्या. खरे तर आप्पांचा जन्म एका खानदानी, वतनदार घराण्यातला. नांदेडच्या होळी भागातील सरदेशपांडे घराणे तसे साऱ्या मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. त्याच घराण्यात जन्म घेतलेल्या आप्पांनी मात्र संघाच्या संस्कारामुळे साधेपणाने जीवन जगण्याचा मंत्र स्वीकारला. राज-घराण्यात जन्म घेऊनही संघ-प्रचारक म्हणून काम करताना झालेली पोटाची आबाळ, अनेकांच्या कडून झालेली अवहेलना त्यांनी केवळ संघ-कार्यासाठी आनंदाने स्वीकारली. लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या आप्पांनी अखेरपर्यंत संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक म्हणून कार्य केले. भूतपूर्व सरसंघचालक श्री गोळवलकर गुरूजी यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या घरात केलेला मुक्काम हा त्यांच्या संघ-निष्ठेची प्रचिती देतो. आप्पांनी त्याकाळात पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यांचे अक्षरही चांगले होते. शिवाय त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्वही होते. त्यामुळे त्याकाळात त्यांना बँकेत किंवा इतर कोठेही चांगली नोकरी मिळाली असती. मात्र केवळ रा. स्व. संघाचे काम करायला वेळ मिळावा म्हणून त्यांनी उस्मानशाही मिल मधील नोकरी पत्करली. त्या मिलमध्ये रात्रपाळीची ड्युटी करून त्यांनी आपला संपूर्ण दिवस संघाच्या कामासाठी दिला होता. मिलमध्येही काम करताना ते तळागाळातील कामगारांच्या मध्ये अधिकाधिक रमायचे. त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायचे. त्यामुळे सर्व स्तरातील असंख्य कामगार त्यांचे मित्र होते. कॉम्रेड असलेले अनंतराव नागापूरकर तर त्यांचे खास मित्र होते. वास्तविक विचारसरणीच्या दृष्टीने रा. स्व. संघ आणि कम्युनिस्ट हे तसे हाडवैरी मात्र मैत्रीच्या बाबतीत आप्पांनी आपली विचारसरणी कधीच आड येऊ दिली नाही. त्यामुळे सर्वच पक्षात त्यांचे घनिष्ठ मित्र होते. तरीही संघाची तत्वनिष्ठता त्यांनी राजकारणातही पाळली. आणीबाणीच्या काळात नांदेडमध्ये अटक झालेले ते पहिले संघ-स्वयंसेवक होते. तब्बल १९ महिने नाशिकच्या कारागृहात राहिल्यानंतर आणीबाणी शिथिल झाल्यानंतरच त्यांची सुटका झाली. आणीबाणीनंतर देशाच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र आप्पांची संघ-निष्ठता कायम राहिली. सामाजिक कार्य करताना जनहिताच्या कामासाठी त्यांनी नेहमीच इतर पक्षातील लोकांना सहकार्य केले. संघ-जनसंघ आणि नंतर भाजप असा आपला राजकीय प्रवास निष्ठेने चालविताना आप्पांनी राजकारणात देखील पक्षातीत मैत्री कायम ठेवली. नांदेड नगरपालिकेत जनसंघाचे नगरसेवक म्हणून काम करताना स्व. रामनारायण काबरा, स्व. सुधाकरराव डोईफोडे, विनायकराव नांदेडकर, नंदीपाल बरारा, सूर्यकांता पाटील, मकबूल सलीम, नुरुल्ला खान, कॉ. नागापूरकर, आदी विविध पक्षातील दिग्गज नगरसेवकांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. जनहिताच्या कामांना कोठेही अडथळा येऊ नये यासाठीच आप्पांनी या मैत्रीला प्राधान्य दिले. त्यासाठी प्रसंगी स्वकीयांकडून त्यांच्यावर टीकाही झाली परंतु त्यांची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांचा जनसंपर्क खूपच मोठा होता. अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत विविध स्तरांतील नागरिकांशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. त्यांच्या या घनिष्ट मैत्रीचे नमुन्यादाखल एकच उदाहरण देता येईल. आप्पा संघ-प्रचारक म्हणून काम करीत असताना त्यांचा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांचा परिचय झाला होता आणि त्यानंतर त्यांची हरिभाऊ बागडे यांच्याशी चांगली मैत्रीही झाली. मात्र त्यानंतर मधल्या काळात उभयतांचा संपर्क कमी झाला असला तरी जेंव्हा हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष होते तेंव्हा ते एका कार्यक्रमानिमित्त नांदेडला आले असताना त्यांना आप्पांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली तेंव्हा कोणतीही पूर्वकल्पना न देता ते स्वतःहून आप्पांचे लोकमित्रनगरमधील घर शोधत शोधत आप्पांच्या घरी गेले आणि त्यांची त्यांनी भेट घेतली आणि उभयतांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. राजकारण आणि त्याचबरोबर समाजकारण करताना आप्पांनी साहित्य-संस्कृतीच्या समृद्धीकडेही तेवढेच लक्ष दिले. मग तो त्यांच्या होळीवरच्या घरातील राममंदिराचा उत्सव असो, संस्कृत पाठशाळेचा कार्यक्रम असो, संघाचा उत्सव असो, किंवा नगरपालिकेचा सांस्कृतिक महोत्सव असो प्रत्येक ठिकाणी आप्पांचा उत्स्फूर्त सहभाग असे. वाचनाची त्यांना आवड असल्यामुळे अनेक मान्यवर साहित्यिकांशी त्यांचा चांगला परिचय होता. आप्पांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले मात्र ते कधीही डगमगले नाहीत. उस्मानशाही मिल अचानक बंद पडली. त्यामुळे बेकारीचे संकट कोसळले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे 'धनंजय पुस्तक भांडार' काढून ग्रंथविक्रीचा व्यवसाय सुरु केला. स्वतः अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी ग्रंथविक्री केली. विशिष्ट ध्येयाने पछाडलेल्या कार्यकर्त्याला आपले सामाजिक कार्य करताना महत्वाची साथ लागते ती म्हणजे आपल्या सहधर्मचारिणीची. त्याबाबतीत आप्पा खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजेत. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती यांनी आप्पांची नेहमीच पाठराखण केली. संघाचे कार्यकर्ते म्हणून आप्पांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या अर्थातच खूप मोठी होती. त्यांचे आदरातिथ्य करताना प्रभाताईनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. हाच अनुभव माझ्यासह आप्पांच्या अनेक नातेवाईकांना नेहमीच आलेला आहे. आणीबाणीच्या काळात आप्पा नाशिकच्या कारागृहात असताना आणि सर्व मुले लहान असताना जवळजवळ दोन वर्षे प्रभाताईंनी ज्या धीरोदात्तपणे आपला परिवार सांभाळला त्याला खरोखरच तोड नव्हती. एक कर्तव्यदक्ष गृहिणीच हे करू शकते. प्रभाताईंच्या सहकार्यामुळेच आप्पांचे सामाजिक कार्य विस्तारित होत गेले हे कोणीही नाकबूल करणार नाही. आप्पांच्या प्रकृतीची तर त्या नियमितपणे खूपच काळजी घेत होत्या. मात्र नियतीच्या मनात काही तरी वेगळेच असावे. आप्पांनी इहलोकाचा अचानक निरोप घेताना त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला चकविले. त्याचीच सर्वांना जास्त हळहळ वाटत आहे. शेवटी 'ईश्वरेच्छा बलियेसी' म्हणतात ते काही खोटे नाही. त्यांच्या निधनामुळे एका समर्पित जीवनाचा अस्त झाला आहे. आप्पांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. ---- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )

Monday, March 9, 2020

'कोरोना' ची दहशत

'कोरोना' ची दहशत ----------------- ''कोरोना'' च्या विषाणूमुळे सर्व जगात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र 'कोरोना' चीच चर्चा चालू आहे. सुरुवातीला चीनमध्ये आढळून आलेला हा 'विषाणू' चिनी मालासारखाच सर्वव्यापी होत आहे. पुण्यामध्येही 'करोना' चे रुग्ण आढळून आल्यामुळे नागिरकांमध्ये  नाहक घबराट निर्माण झाली आहे. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा अल्पावधीतच इतका अतिरेक होतो की, त्याबाबत नको त्या अफवांचे पीक येते आणि त्यामुळे गोंधळ निर्माण व्हायला फारसा वेळ लागत नाही. अशा वेळी पुन्हा एकदा 'सरकार' च्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण अशा बाबतीत सरकार नेहमीच उशीरा जाग आल्याप्रमाणे निर्णय घेत असल्याची जाणीव होते शिवाय आपल्याकडे लोकशाही असल्याने सरकारी निर्णयाचे पालन करण्याची जबाबदारी आपली नाही अशाच थाटात नागरिक वावरत असतात. त्यामुळे हा गोंधळ वाढतच जातो. त्यातच या ''कोरोना'' चा ताबा हल्ली सोशल मीडियाने घेतला असल्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडत चालली आहे. सोशल मीडियावर, कोणत्याही गोष्टींची सत्यता पडताळून न पाहता मेसेजेस 'व्हायरल' होत असल्याने 'कोरोना' चा हा 'व्हायरस' अफवांच्या माध्यमांतून सर्वत्र फैलावला आहे. या अफवांचा दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे त्यामुळे 'भीक नको पण कुत्रा आवर' या धर्तीवर एकवेळ 'करोना' झाला तरी चालेल मात्र 'कोरोना' वरची चर्चा नको अशी काहीजणांची मानसिक अवस्था झाली आहे. सोशल मीडियाला 'कोरोना विषाणू' ची एवढी लागण झाली आहे की 'कोरोना' वर त्याच्या उत्पत्तीपासून ते 'टिकटॉक' पर्यंत सर्व प्रकारचे 'टॉक' चालू आहेत. ' कोरोना' चा उगम चीनमध्ये झाल्यामुळे आणि तेथेच त्याची झपाट्याने लागण होत असल्यामुळे या संसर्गजन्य रोगाला त्वरित आळा घालण्यासाठी चीन सरकारने म्हणे ' कोरोना' झालेल्या सर्व रुग्णांना ठार मारण्याचा घाट घातला आणि त्यासाठी न्यायालयाचीही परवानगी मागितली असे वृत्त मध्यंतरी सोशल मीडियावर आले होते. ( चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे तेथे अशा घटना घडूही शकतात ) त्याचा भारतीय जनमानसावर कसा विपरीत परिणाम झाला त्याचीही एक झलक सोशल मीडियावरच पाहायला मिळाली. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये, '' 'कोरोना' च्या अफवांमुळे घाबरलेली ग्रामीण भागात राहणारी एक अशिक्षित आई शहरात नोकरी करीत असलेल्या आपल्या मुलाला फोनवर बोलताना शहरातील नोकरी सोडून गावाकडे त्वरित येण्याची विनवणी करीत आहे.'' 'कोरोना' झालेल्या रुग्णांना ठार मारण्यात येत आहे असे तिला कोठून तरी कळले होते म्हणून ती आपल्या मुलाला सर्व काही सोडून गावाकडे येण्याची सूचना करीत होती. 'नोकरी गेली तर किती नुकसान होईल हे त्या मुलाने तिला सांगण्याचा प्रयत्न करताच आपण मीठभाकर खाऊन काही दिवस राहूत असे आर्जवंही त्याची आई करत होती. थोडक्यात 'कोरोना'मुळे जनमानसावर कशी दहशत निर्माण झाली आहे त्याचे हे नमुनेदार उदाहरण म्हणता येईल. याशिवाय 'चिकन' मुळे 'कोरोना' होऊ शकतो या अफवेमुळे 'चिकन खाण्यावर स्वयंघोषित निर्बंध आल्यामुळे राज्यातील 'पोल्ट्री' व्यवसाय संकटात आला असून पोल्ट्री व्यावसायिकांच्या डोळ्यात 'कोरोना'ने पाणी आणले आहे. 'कोरोना' मुळे आणखी किती व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी येणार आहे हे 'कोरोना'च जाणो. एकीकडे भारतासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात 'कोरोनो' चा विषाणू फार काळ जिवंत राहू शकत नाही असा वस्तुस्थितीदर्शक प्रचार होत असताना 'कोरोना' बाबत एवढी दहशत निर्माण कशी होऊ शकते हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार, नागरिक ( आणि सोशल मीडिया ) यांनी परस्परांना विश्वासात घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना केल्यास 'कोरोना' च्या धोक्याला योग्य मार्गाने उत्तर देता येईल. कदाचित 'चिकनगुनिया', 'स्वाईनफ्ल्यू' सारखा 'कोरोना'ही अल्पकाळ टिकेल आणि नंतर नाहीसाही होईल मात्र त्याच्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीचा समाजजीवनावर गंभीर परिणाम होत आहे. मूळ रोगापेक्षाही हा रोग भयानक आहे. तो नष्ट करण्यासाठी समाजजीवनातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन साकल्याने विचार करण्याची गरज आहे. ----- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी ---- ९४२२३ १९१४३ )

Thursday, January 30, 2020

'' चहा --पुराण ''

'' चहा - पुराण '' ------------------- '' मावळत्या वर्षातील अखेरच्या म्हणजे डिसेंबर महिन्यातील एका रविवारी जागतिक 'चहा- दिन' साजरा करण्यात आला. या जगात अनेक 'दिन' साजरे करण्यात येतात त्यामध्ये आता 'चहा-दिना'ची ची भर पडली आहे. अनेकांनी चहाचे घुटके घेत घेत त्यादिवशी 'चहा-दिन' साजरा केला असेल. तसे पाहता चहा म्हणजे जगातील असंख्य लोकांचे आवडते पेय. त्यामुळे हा 'टी-डे' 'टी-टाईम' न घेताच साजरा झाला असेल. वास्तविक भारतात ब्रिटिश लोक येण्यापूर्वी हा 'चहा' औषधालाही सापडत नव्हता, परंतु ब्रिटिश लोक भारतात आले ते 'चहा' घेऊनच आणि नंतर त्यांनी भारतीयांना या चहाचे असे जबरदस्त व्यसन लावले की, आज जगात इंग्लंड किंवा इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात जास्त लोक चहा पिणारे आहेत. असंख्य भारतीयांची रोजची सकाळच चहाने सुरुवात होते. ज्यादिवशी ज्यांना सकाळी चहा मिळाला नाही त्यादिवशी त्यांना ती सकाळच नव्हे तर अख्खा दिवस सुनासुना वाटून राहतो.अनेकजण तर सकाळी चहा पिल्याशिवाय अन्य कोणत्याही कामाला हात लावत नाहीत. काहीजणांचे ते 'स्फूर्तिपेय' आहे. चहाशिवाय त्यांना 'तरतरी' येत नाही त्यामुळे चहा हा अनेकांना 'अमृता' समान वाटतो. जणू काही पृथ्वीवरचे ते 'अमृत'च आहे अशा थाटात असंख्य लोक या चहाचा आस्वाद घेत असतात. म्हणूनच कदाचित पुण्यात केवळ 'अमृततुल्य चहा' मिळणारी कितीतरी दुकाने आहेत. 'अमृता' समान वाटणाऱ्या या चहाचे प्रकार तरी किती म्हणून वर्णावेत. 'साधा चहा', 'कटिंग चहा', 'स्पेशल चहा', 'मसाला चहा', 'मलई चहा', 'बासुंदी चहा', 'रबडी चहा', 'कडक चहा', 'कडक स्पेशल चहा', 'गोल्डन चहा' वगैरे वगैरे. त्यामध्ये आता नव्याने सांगायचे तर 'प्रेमाच्या चहा' चीही भर पडली आहे. अस्मादिक औरंगाबादला शिकत असताना तेथे चहाच्या टपरीवर 'मारामारी' नावाचा चहा मिळायचा. तो फारच 'चवप्रिय' आणि त्यामुळे 'लोकप्रिय' होता. ही 'मारामारी' म्हणजे 'साधा चहा' आणि 'स्पेशल चहा' यांचे मिश्रण असायचे. हे दोन्ही चहा पहिल्यांदाच मिसळताना या दोन्ही चहांची 'मारामारी' झालेली बहुधा त्या चहा दुकानदाराला दिसली असावी म्हणून त्याने त्या मिश्रणातून झालेल्या चहाला 'मारामारी' हे गोंडस नाव दिले असावे आणि 'मारामारी' करायला जरी नसली तरी 'पाहायला' कोणाला आवडत नाही त्यामुळेच 'ही 'मारामारी' लोकप्रिय झाली असावी.चहाच्या या प्रकारची यादी करायची म्हटले तर 'चहाच्या मळ्यातील चहाची 'पाने' अपुरी पडतील. 'तरुणाई' आणि चहा यांचे तर अतूट नाते आहे.कारण अनेक तरुणांना केवळ चहामुळे 'जिवाभावाचे मित्र भेटतात. केवळ मित्रच नाहीत तर मैत्रिणीही मिळतात आणि हो ! त्यातील एखादी नंतर जीवनाची साथीदारही झालेली असते. केवळ चहाच्या निमित्ताने एखाद्या सुंदर तरुणीची ओळख व्हावी म्हणून अनेक कॉलेज तरुण चहाचे 'व्यसनी' झाले आहेत. त्यामुळे निदान कॉलेजमधला तरुण तरी कोणी चहाची ऑफर दिली तर ती बहुधा नाकारीत नाही. कॉलेजचे पिरियड बुडवून कॉलेज कॅंटीनमध्ये (इकडे-तिकडे पाहत) चहाचे घुटके घेत घेत मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा यासारखे दुसरे सुख ते कोणते असेल. जवळजवळ प्रत्येक कॉलेज युवक अशा सुखात रममाण होऊनच आपल्या आयुष्याची पहिली पदवी घेत असतो. आमच्या कॉलेजमधील माझ्या एका वर्गमित्राचे कँटीन हेच 'कॉलेज' होते. कॉलेजचे तास 'बंक' करून तो सदासर्वदा कँटिनमध्येच चहा पिणाऱ्या मित्रांच्या गराड्यात असे. घरचा चांगला असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्याला चहा पाजणे हाच त्याने आपला 'स्वधर्म' मानला होता. अर्थात त्याचा हा 'स्वधर्म' त्याच्या चांगलाच फळाला आला. चहा पिता पिता त्याचे इतके मित्र झाले की तो एकेवर्षी कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून आरामात निवडून आला. आपल्या भावी काळातील राजकारण प्रवेशाचा श्रीगणेशा त्याने केवळ चहामुळे झालेल्या मित्रांच्या जोरावर केला होता. त्यामुळे कॉलेज कँटीन असो, कॉलेजजवळ असलेली कोण्या 'अण्णां'ची टपरी असो वा मोठे हॉटेल असो तेथे चहा पिणाऱ्या तरुणांची गर्दी ठरलेली असते. बदलता काळ लक्षात घेता 'चहाचा कट्टा' हा अनेक तरुणांचा 'माईलस्टोन' असतो असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. अशा या चहाचे व्यसन हे आरोग्याला घातक (विशेषतः तरुणाईच्या) आहे असे अनेक डॉक्टर्स सांगत असले तरी सहजासहजी हे व्यसन सोडायला कोणी तयार होत नाही कारण चहा हा आपल्या आदरातिथ्याचा अविभाज्य भाग बनला आहे. तुम्ही कोठेही जा तुमचे स्वागत या चहानेच होणार. चहाच्या जागी 'बासुंदी' जरी दिली तरी काहीजणांना ते 'स्वागत' अपुरेच वाटते. म्हणूनच 'बाईने कुंकूवाला आणि पुरुषाने घोटभर चहाला नाही म्हणू नये ' अशी नवी म्हण प्रचलित झाली असावी. एरवी घोटभर चहा औषधालाही न घेणारे काहीजण असतीलही मात्र या चहावर जगणारीही माणसे आहेत. दिवसाला २५-२५ कप चहा पिऊन ताजेतवाने राहणारे लोक जसे आहेत तसेच अन्न म्हणून केवळ चहाचे सेवन करणारे काहीजण सापडतील. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात चौकटीत आलेली बातमी मला चांगली आठवते. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेडेगावातील 'चतुरा' नावाची महिला ही केवळ चहा पिऊन जगत होती. दररोज ती न जेवता केवळ चहाच घ्यायची. कारण तिला चहा इतका अंगवळणी पडला होता की, चहा हेच तिचे 'भोजन' होते. दिवसातून ३०-४० कप चहा पिऊन ती शेतात राबायची. चहाशिवाय तिला खायला-प्यायला लागत नसे. तिचा संसार असा 'चहामय' झाला होता आणि केवळ तिच्या घरात नव्हे तर अख्ख्या पंचक्रोशीत 'चहावाली चतुरा' म्हणून ती प्रसिद्ध होती. चहाप्रेमींच्या अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. लातूरला आमच्या महाविद्यालयात सामान्य प्रशासन विभागात काम करणाऱ्या एका कारकुनाला चहा पिण्याचं इतके जबरदस्त वेड होते की, त्याचा ऑफिसमधील निम्म्याहून अधिक वेळ कॅंटीनमध्ये जात असे. कोणताही विद्यार्थी त्याच्या कामासाठी ऑफिसमध्ये गेला तेंव्हा हा कारकून कधीच जागेवर सापडायचा नाही. आणि जरी तो जागेवर सापडलाच तरी तो त्या विद्यार्थ्याला हमखास म्हणणारच, ''पाच मिनिटांनी या, तोपर्यंत मी चहा पिऊन आलोच. अशा या कारकुनाला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील 'फिशपॉन्ड' च्या कार्यक्रमात 'चला च्या प्यायला' असा शेलका आहेर मिळाला होता. परंतु तो त्याने 'लाईट-चहा' इतकाच लाईटने घेतला त्यामुळे त्याच्या चहा पिण्याच्या कार्यक्रमात मुळीच बदल झाला नाही. अलिकडच्या काळात तर भारतात 'चहा'चा गौरवाने उल्लेख होतो आहे. कारण एक सामान्य 'चहावाला' पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे टपरीवाल्या चहावाल्यालाही हल्ली फार महत्व प्राप्त झाले. त्याच्याकडे कधी नव्हे ते आदराने पाहिले जात आहे. 'चहावाला' पंतप्रधान होऊ शकतो यापासून प्रेरणा घेऊन आमच्या पुण्यातील एका इंजिनिअर झालेल्या मित्राने नोकरीच्या मागे न लागता चक्क चहाचे दुकान थाटले आहे.अर्थात आपल्याला मिळालेली इंजिनिअरिंगची डिग्री फ्रेम करून आणि त्याला हार घालून आपल्या चहाच्या दुकानात लावायला तो विसरला नाही. त्याचा 'कडक' चाय आता अनेकांची तल्लफ भागवितो आणि आमचा मित्र 'कडक' मध्ये ऐटीत फिरतो. खरे तर चहापानाच्या निमंत्रणाचे सर्वत्र स्वागतच होते. मात्र राजकारणात मात्र हे 'चहापान' नाकारले जाते असा नेहमीचाच अनुभव आहे राज्यविधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सरकारने आयोजित केलेल्या 'चहापान' कार्यक्रमावर विरोधी पक्षांतर्फे बहिष्कारच घातला जातो असा जणू इतिहास झाला आहे. अनेकदा सत्तारूढ असलेला पक्ष कधीकाळी विरोधी पक्षात असतो तर विरोधी पक्ष सत्तारूढ झालेला असतो तरीही या 'चहापाना'वर बहिष्कार हा ठरलेलाच असतो. निदान 'चहा' वरून तरी त्यांनी राजकारण करू नये. चहा पिऊन झाल्यानंतर उर्वरित कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार घालावा अशीच तमाम चहाप्रेमींची इच्छा असेल. असे हे 'चहा-पुराण' कितीही सांगायला गेले तरी अपुरेच पडेल. चहाचे घुटके घेत घेत ते ऐकायला अनेकांना आवडेल याबद्दल कोणाच्याही मनात शंका राहणार नाही हे मात्र खरे. ---- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )

Monday, December 23, 2019

'' कांदे -पुराण ''

'' कांदे -पुराण '' ---------------- " कांद्याच्या भाववाढीमुळे सध्या आपल्या देशात सर्वत्र 'कांदे -- पुराणा'ची चविष्टपणे चर्चा चालू आहे. कांद्यामुळे अनेक पदार्थ 'चविष्ट' होतात हे सर्वांनाच माहित असल्यामुळेच की काय या कांद्याची सगळीकडे चविष्टपणे चर्चा चालू झाली असावी. 'सोशल मेडिया' तर सध्या कांद्यावरच 'गुजराण' करीत आहे असे म्हणावे लागेल . अगदी 'टिकटॉक' पासून ते 'बिग-बी'च्या 'केबीसी' पर्यंत सर्वांचा वापर करून अनेकजणांनी आपल्या विलक्षण बुद्धिचातुर्याने ;(अर्थातच कांदा खाऊन ) कांदा-भाववाढीचे प्रकरण धसास लावले आहे. 'टिकटॉक' च्या माध्यमातून 'व्हाट्स ऍप' वर पाठविण्यात आलेल्या एका संदेशात ' एक माणूस जेवण करीत असताना प्रत्येक घासागणिक समोर टांगलेल्या कांद्याचा, टोमॅटोचा आणि लसणाचा हुंगून वास घेत आहे दृश्य दाखविण्यात आले आहे. कांद्याच्या भाववाढीची अशी छान खिल्ली हसायला भाग पाडत असेल हे खरे असले तरी कांद्याच्या भाववाढीमुळे निर्माण झालेया वांद्यामुळे सामान्य गृहिणीपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. एरवीही हा कांदा, इच्छा नसतानाही डोळ्यात पाणी आणतो आणि आता तर त्याचे गगनाला भिडलेले भाव पाहून अनेकांच्या डोळ्यातून खरेखुरे अश्रू येत आहेत. यामध्ये कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते मध्यमवर्गीय ग्राहकांपर्यंत सर्वांचाच सहभाग आहे. वास्तविक कांद्याचे पीक असे आहे की, ते उगवताना मूळ 'कांदा' दिसत नाही . कारण तो जमिनीखाली उगवतो आणि वरती असते फक्त त्याची 'पात'. थोडक्यात तो गुप्त असतो मात्र एकदा का तो प्रकटला आणि त्याचा वापर करायचे म्हटले की, तो भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. असा हा 'कांदा' बहुगुणी आहे. त्याच्या गुणांचे वर्णन किती म्हणून करायचे. तो प्रकृतीला पोषक तर आहेच शिवाय काही रोगांचा तो 'शोषक' आहे. पूर्वी प्रवासाला निघताना लोक आपल्या खिशात हमखास कांदा ठेवून जायचे असे म्हणतात कारण एक तर त्यामुळे भर उन्हामुळे 'उन्हाळी' लागायची नाही तसेच अतिश्रमामुळे व थकव्यामुळे भोवळ आल्यास हाच कांदा फोडून नाकाला लावल्यास शुद्धीवर यायला मदत होते असे. त्याशिवाय प्रवासातील मुक्कामात कोठे भोजन करायची वेळ आलीच तर तोच कांदा तोंडी लावायला कामी यायचा. कांद्याचा असा 'दुहेरी-तिहेरी ' उपयोग व्हायचा. कांदा तसे पहिल्यापासूनच गोरगरिबांचे खाद्य म्हणून ओळखला जातो. शेतकरीही आपल्या शेतात काम करून दुपारच्या वेळेला 'भाकरतुकडा' खायला बसला की, त्याच्या आसपासच जमिनीत लावलेला कांदा स्वतःच्या हातानेच तोडून भाकरी आणि कोरड्यासबरोबर तोंडी लावून खातो. त्यावेळी या कांद्यामुळे त्याच्या जेवणाला जी चव येते आणि  जी लज्जत वाढते तिच्यापुढे कोणतेही स्वर्गीय सुख फिके पडते हा सार्वत्रिक अनुभव आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच अनेक गोरगरिबांच्या भोजनात या कांद्यामुळेच 'ब्रम्हानंद' निर्माण केला आहे. आमच्या लहानपणी शाळेत असताना आमच्या वर्गातील काही मुले शेजारच्या खेडेगावातून शिकायला यायची. रोज चार-पाच मैलाचा रस्ता तुडवीत ती मुले शाळेत यायची आणि जायची.;एकदा मध्यंतरात त्यांच्याबरोबर डबा खाण्याची वेळ आली. त्या सर्वांनी एका फडक्यात आपापल्या भाकऱ्या बांधून आणल्या होत्या. ;त्या भाकऱ्यांपैकी सर्वात वरच्या भाकरीवर सात-आठ मिरच्या ठेचलेल्या होत्या. तेच त्यांचे मुख्य कालवण होते. मात्र त्याबरोबर त्यांनी भरपूर पातीचे ;कांदे आणले होते. भाकरी, तो मिरच्यांचा खर्डा आणि तोंडी लावायला कांदे हेच त्यांचे दररोजचे जेवण होते. असे जेवण रोज करून त्यापैकी काहीजण उच्च शिक्षित झाले. त्यामुळे त्यांच्या जीवनातील कांद्याचे महत्व ते तरी कधीच विसरणार नाहीत. कांद्याचा महिमा हा असा आहे. म्हणूनच की काय, या कांद्याला उतराई होण्यासाठी आजही ग्रामीण भागात 'कांदे-नवमी' मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यादिवशी जेवणात बहुतेक सर्व पदार्थ हे प्रामुख्याने कांद्याचे केले जातात. 'कांदा' एवढा लोकप्रिय का ? हे सांगण्यासाठी हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे. तुम्ही कोणाच्याही घरात गेलात आणि स्वयंपाकगृहात डोकावले तर दुरडीमध्ये 'कांदा' हमखास आढळून येतोच. खानावळी आणि हॉटेलमधील भटारखान्यात तर अनेक पोत्यांमध्ये हा कांदा दडून बसलेला असतो. त्यातील प्रत्येक कांद्यावर जणू काही प्रत्येक गिऱ्हाईकाचे नाव लिहिलेले असते आणि त्याप्रमाणे तो 'कांदा' पोटात गेल्यावर गिऱ्हाईक तृप्त मानाने बाहेर पडते. अशा या कांद्याला निषिद्ध मानणारेही काही लोक आहेत तसेच फक्त चातुर्मासात कांदा -लसूण न खाणारे लोक आहेत मात्र त्यांची संख्या नगण्य आहे त्यामुळे ते 'अल्पसंख्याक' गटात मोडतात आणि त्यामुळे त्यांची फारशी कोणी दखल घेत नाही.बहुसंख्याक लोकांचा कांद्यावर 'जीव' जडला असल्यामुळेच सध्या कांद्याच्या भाववाढीमुळे सगळेजण त्रस्त झाले आहेत आणि साहजिकच त्याचे राजकारणातही पडसाद उमटले आहेत. यापूर्वी काही राजकीय नेत्यांना याच कांद्याने चांगले रडविल्याची उदाहरणेही आहेत. काही वर्षांपूर्वी सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सत्तारूढ असलेले भाजपचे सरकार कांदा-भाववाढीमुळे निवडणुकीनंतर गडगडले होते. त्यामुळेच की काय विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'आपण कांदाच खात नसल्याचे सांगून कांदा-भाववाढीचे प्रकरण झटकून टाकण्याचा प्रयत्न केला खरा ;मात्र कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या सरकारला कांदा आयात करण्याचा निर्णय घ्यावाच लागला. यापूर्वीच्या सरकारने तर कांदा- भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानातून कांदा आयात केला होता आणि तेथून आलेला कांदाही भारतातील लोकांनी गोड मानून खाल्ला होता. थोडक्यात कांदा हा दोन राष्ट्रांच्या मैत्री मधील ( ते मित्र असोत की शत्रू ) महत्वाचा दुवा ठरू शकतो हेच यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. त्यामुळे कांद्याचे महत्व केवळ भोजनापुरते मर्यादित नसून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही किती महत्वाचे आहे हे लगेच लक्षात येईल. एका चित्रपटात नायिकेच्या तोंडी '' एक चुटकीभर सिंदूर की किंमत तुम क्या जानो बाबू? '' असे गाजलेले वाक्य आहे त्याच धर्तीवर एका कांद्याची किंमत रोज कांदा खाणाऱ्यालाच समजू शकते असे म्हणावे लागेल. अशा या बहुगुणी कांद्याचे हे 'कांदे-पुराण' सांगेल तेवढे कमीच म्हणावे लागेल. ----- श्रीकांत नारायण ( संपर्क ध्वनी -- ९४२२३ १९१४३ )