Wednesday, September 9, 2020
शंकरराव सरदेशपांडे : एका समर्पित जीवनाचा अस्त
शंकरराव सरदेशपांडे : एका समर्पित जीवनाचा अस्त
-----------------------------------------
माणसाचा मृत्यू अटळ असतो असे म्हणतात. असे असले तरी प्रत्येक माणसाची आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची 'मृत्यू तू येऊ नकोस ... ' अशीच धारणा असते. मात्र अनेकदा नियती आपल्या क्रूर खेळाचे दर्शन घडविते आणि अशा काही परिस्थितीत माणसाला मृत्यू येतो की, त्या परिस्थितीपुढे सर्वचजण हतबल ठरतात. आमच्या अप्पांच्या ( शंकरराव सरदेशपांडे ) बाबतीत नेमके हेच घडले असे म्हणावे लागेल. वास्तविक पाहता आप्पांचे वय (८८ वर्षे ) उतरणीला लागले होते. वृद्धापकाळाने त्यांना जवळ केले असले तरी सुखी आणि आनंदी जीवनाचा मंत्र स्वतः जपून तो इतरांना देण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू असायचा. नातवंडा-पतवंडांमध्ये रमलेला त्यांचा खेळकर आणि बोलका स्वभाव त्याचीच सर्वांना साक्ष देत होता. त्यांच्या निधनाच्या आधी पंधरा दिवस आधी त्याची प्रचिती माझ्यासह अनेकांनी घेतली होती. आपल्या जवळच्या आप्तस्वकीयांना मोबाईलवरून प्रत्यक्ष बोलतांना त्यांचा जीवन जगण्याचा दुर्दम्य उत्साह जाणवत होता. असे असतानाच त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे आणि नंतर थोड्याच दिवसात त्यांच्या निधनाचे दुःखद वर्तमान ऐकायला मिळते काय ? हे सारे खरोखरच अनाकलनीय होते.
त्यांच्या निधनानंतर साहजिकच त्यांच्याविषयीच्या अनेक स्मृती जाग्या झाल्या. खरे तर आप्पांचा जन्म एका खानदानी, वतनदार घराण्यातला. नांदेडच्या होळी भागातील सरदेशपांडे घराणे तसे साऱ्या मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. त्याच घराण्यात जन्म घेतलेल्या आप्पांनी मात्र संघाच्या संस्कारामुळे साधेपणाने जीवन जगण्याचा मंत्र स्वीकारला. राज-घराण्यात जन्म घेऊनही संघ-प्रचारक म्हणून काम करताना झालेली पोटाची आबाळ, अनेकांच्या कडून झालेली अवहेलना त्यांनी केवळ संघ-कार्यासाठी आनंदाने स्वीकारली. लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या आप्पांनी अखेरपर्यंत संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक म्हणून कार्य केले. भूतपूर्व सरसंघचालक श्री गोळवलकर गुरूजी यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या घरात केलेला मुक्काम हा त्यांच्या संघ-निष्ठेची प्रचिती देतो. आप्पांनी त्याकाळात पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यांचे अक्षरही चांगले होते. शिवाय त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्वही होते. त्यामुळे त्याकाळात त्यांना बँकेत किंवा इतर कोठेही चांगली नोकरी मिळाली असती. मात्र केवळ रा. स्व. संघाचे काम करायला वेळ मिळावा म्हणून त्यांनी उस्मानशाही मिल मधील नोकरी पत्करली. त्या मिलमध्ये रात्रपाळीची ड्युटी करून त्यांनी आपला संपूर्ण दिवस संघाच्या कामासाठी दिला होता. मिलमध्येही काम करताना ते तळागाळातील कामगारांच्या मध्ये अधिकाधिक रमायचे. त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायचे. त्यामुळे सर्व स्तरातील असंख्य कामगार त्यांचे मित्र होते. कॉम्रेड असलेले अनंतराव नागापूरकर तर त्यांचे खास मित्र होते. वास्तविक विचारसरणीच्या दृष्टीने रा. स्व. संघ आणि कम्युनिस्ट हे तसे हाडवैरी मात्र मैत्रीच्या बाबतीत आप्पांनी आपली विचारसरणी कधीच आड येऊ दिली नाही. त्यामुळे सर्वच पक्षात त्यांचे घनिष्ठ मित्र होते. तरीही संघाची तत्वनिष्ठता त्यांनी राजकारणातही पाळली.
आणीबाणीच्या काळात नांदेडमध्ये अटक झालेले ते पहिले संघ-स्वयंसेवक होते. तब्बल १९ महिने नाशिकच्या कारागृहात राहिल्यानंतर आणीबाणी शिथिल झाल्यानंतरच त्यांची सुटका झाली. आणीबाणीनंतर देशाच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र आप्पांची संघ-निष्ठता कायम राहिली. सामाजिक कार्य करताना जनहिताच्या कामासाठी त्यांनी नेहमीच इतर पक्षातील लोकांना सहकार्य केले. संघ-जनसंघ आणि नंतर भाजप असा आपला राजकीय प्रवास निष्ठेने चालविताना आप्पांनी राजकारणात देखील पक्षातीत मैत्री कायम ठेवली. नांदेड नगरपालिकेत जनसंघाचे नगरसेवक म्हणून काम करताना स्व. रामनारायण काबरा, स्व. सुधाकरराव डोईफोडे, विनायकराव नांदेडकर, नंदीपाल बरारा, सूर्यकांता पाटील, मकबूल सलीम, नुरुल्ला खान, कॉ. नागापूरकर, आदी विविध पक्षातील दिग्गज नगरसेवकांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. जनहिताच्या कामांना कोठेही अडथळा येऊ नये यासाठीच आप्पांनी या मैत्रीला प्राधान्य दिले. त्यासाठी प्रसंगी स्वकीयांकडून त्यांच्यावर टीकाही झाली परंतु त्यांची त्यांनी पर्वा केली नाही.
त्यांचा जनसंपर्क खूपच मोठा होता. अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत विविध स्तरांतील नागरिकांशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. त्यांच्या या घनिष्ट मैत्रीचे नमुन्यादाखल एकच उदाहरण देता येईल. आप्पा संघ-प्रचारक म्हणून काम करीत असताना त्यांचा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांचा परिचय झाला होता आणि त्यानंतर त्यांची हरिभाऊ बागडे यांच्याशी चांगली मैत्रीही झाली. मात्र त्यानंतर मधल्या काळात उभयतांचा संपर्क कमी झाला असला तरी जेंव्हा हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष होते तेंव्हा ते एका कार्यक्रमानिमित्त नांदेडला आले असताना त्यांना आप्पांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली तेंव्हा कोणतीही पूर्वकल्पना न देता ते स्वतःहून आप्पांचे लोकमित्रनगरमधील घर शोधत शोधत आप्पांच्या घरी गेले आणि त्यांची त्यांनी भेट घेतली आणि उभयतांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. राजकारण आणि त्याचबरोबर समाजकारण करताना आप्पांनी साहित्य-संस्कृतीच्या समृद्धीकडेही तेवढेच लक्ष दिले. मग तो त्यांच्या होळीवरच्या घरातील राममंदिराचा उत्सव असो, संस्कृत पाठशाळेचा कार्यक्रम असो, संघाचा उत्सव असो, किंवा नगरपालिकेचा सांस्कृतिक महोत्सव असो प्रत्येक ठिकाणी आप्पांचा उत्स्फूर्त सहभाग असे. वाचनाची त्यांना आवड असल्यामुळे अनेक मान्यवर साहित्यिकांशी त्यांचा चांगला परिचय होता. आप्पांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले मात्र ते कधीही डगमगले नाहीत.
उस्मानशाही मिल अचानक बंद पडली. त्यामुळे बेकारीचे संकट कोसळले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे 'धनंजय पुस्तक भांडार' काढून ग्रंथविक्रीचा व्यवसाय सुरु केला. स्वतः अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी ग्रंथविक्री केली. विशिष्ट ध्येयाने पछाडलेल्या कार्यकर्त्याला आपले सामाजिक कार्य करताना महत्वाची साथ लागते ती म्हणजे आपल्या सहधर्मचारिणीची. त्याबाबतीत आप्पा खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजेत. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती यांनी आप्पांची नेहमीच पाठराखण केली. संघाचे कार्यकर्ते म्हणून आप्पांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या अर्थातच खूप मोठी होती. त्यांचे आदरातिथ्य करताना प्रभाताईनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. हाच अनुभव माझ्यासह आप्पांच्या अनेक नातेवाईकांना नेहमीच आलेला आहे. आणीबाणीच्या काळात आप्पा नाशिकच्या कारागृहात असताना आणि सर्व मुले लहान असताना जवळजवळ दोन वर्षे प्रभाताईंनी ज्या धीरोदात्तपणे आपला परिवार सांभाळला त्याला खरोखरच तोड नव्हती. एक कर्तव्यदक्ष गृहिणीच हे करू शकते. प्रभाताईंच्या सहकार्यामुळेच आप्पांचे सामाजिक कार्य विस्तारित होत गेले हे कोणीही नाकबूल करणार नाही. आप्पांच्या प्रकृतीची तर त्या नियमितपणे खूपच काळजी घेत होत्या. मात्र नियतीच्या मनात काही तरी वेगळेच असावे. आप्पांनी इहलोकाचा अचानक निरोप घेताना त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला चकविले. त्याचीच सर्वांना जास्त हळहळ वाटत आहे. शेवटी 'ईश्वरेच्छा बलियेसी' म्हणतात ते काही खोटे नाही. त्यांच्या निधनामुळे एका समर्पित जीवनाचा अस्त झाला आहे. आप्पांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना.
---- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
Monday, March 9, 2020
'कोरोना' ची दहशत
'कोरोना' ची दहशत
-----------------
''कोरोना'' च्या विषाणूमुळे सर्व जगात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र 'कोरोना' चीच चर्चा चालू आहे. सुरुवातीला चीनमध्ये आढळून आलेला हा 'विषाणू' चिनी मालासारखाच सर्वव्यापी होत आहे. पुण्यामध्येही 'करोना' चे रुग्ण आढळून आल्यामुळे नागिरकांमध्ये नाहक घबराट निर्माण झाली आहे. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा अल्पावधीतच इतका अतिरेक होतो की, त्याबाबत नको त्या अफवांचे पीक येते आणि त्यामुळे गोंधळ निर्माण व्हायला फारसा वेळ लागत नाही. अशा वेळी पुन्हा एकदा 'सरकार' च्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण अशा बाबतीत सरकार नेहमीच उशीरा जाग आल्याप्रमाणे निर्णय घेत असल्याची जाणीव होते शिवाय आपल्याकडे लोकशाही असल्याने सरकारी निर्णयाचे पालन करण्याची जबाबदारी आपली नाही अशाच थाटात नागरिक वावरत असतात. त्यामुळे हा गोंधळ वाढतच जातो. त्यातच या ''कोरोना'' चा ताबा हल्ली सोशल मीडियाने घेतला असल्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडत चालली आहे. सोशल मीडियावर, कोणत्याही गोष्टींची सत्यता पडताळून न पाहता मेसेजेस 'व्हायरल' होत असल्याने 'कोरोना' चा हा 'व्हायरस' अफवांच्या माध्यमांतून सर्वत्र फैलावला आहे. या अफवांचा दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे त्यामुळे 'भीक नको पण कुत्रा आवर' या धर्तीवर एकवेळ 'करोना' झाला तरी चालेल मात्र 'कोरोना' वरची चर्चा नको अशी काहीजणांची मानसिक अवस्था झाली आहे. सोशल मीडियाला 'कोरोना विषाणू' ची एवढी लागण झाली आहे की 'कोरोना' वर त्याच्या उत्पत्तीपासून ते 'टिकटॉक' पर्यंत सर्व प्रकारचे 'टॉक' चालू आहेत. ' कोरोना' चा उगम चीनमध्ये झाल्यामुळे आणि तेथेच त्याची झपाट्याने लागण होत असल्यामुळे या संसर्गजन्य रोगाला त्वरित आळा घालण्यासाठी चीन सरकारने म्हणे ' कोरोना' झालेल्या सर्व रुग्णांना ठार मारण्याचा घाट घातला आणि त्यासाठी न्यायालयाचीही परवानगी मागितली असे वृत्त मध्यंतरी सोशल मीडियावर आले होते. ( चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे तेथे अशा घटना घडूही शकतात ) त्याचा भारतीय जनमानसावर कसा विपरीत परिणाम झाला त्याचीही एक झलक सोशल मीडियावरच पाहायला मिळाली.
यासंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये, '' 'कोरोना' च्या अफवांमुळे घाबरलेली ग्रामीण भागात राहणारी एक अशिक्षित आई शहरात नोकरी करीत असलेल्या आपल्या मुलाला फोनवर बोलताना शहरातील नोकरी सोडून गावाकडे त्वरित येण्याची विनवणी करीत आहे.'' 'कोरोना' झालेल्या रुग्णांना ठार मारण्यात येत आहे असे तिला कोठून तरी कळले होते म्हणून ती आपल्या मुलाला सर्व काही सोडून गावाकडे येण्याची सूचना करीत होती. 'नोकरी गेली तर किती नुकसान होईल हे त्या मुलाने तिला सांगण्याचा प्रयत्न करताच आपण मीठभाकर खाऊन काही दिवस राहूत असे आर्जवंही त्याची आई करत होती. थोडक्यात 'कोरोना'मुळे जनमानसावर कशी दहशत निर्माण झाली आहे त्याचे हे नमुनेदार उदाहरण म्हणता येईल. याशिवाय 'चिकन' मुळे 'कोरोना' होऊ शकतो या अफवेमुळे 'चिकन खाण्यावर स्वयंघोषित निर्बंध आल्यामुळे राज्यातील 'पोल्ट्री' व्यवसाय संकटात आला असून पोल्ट्री व्यावसायिकांच्या डोळ्यात 'कोरोना'ने पाणी आणले आहे. 'कोरोना' मुळे आणखी किती व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी येणार आहे हे 'कोरोना'च जाणो.
एकीकडे भारतासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात 'कोरोनो' चा विषाणू फार काळ जिवंत राहू शकत नाही असा वस्तुस्थितीदर्शक प्रचार होत असताना 'कोरोना' बाबत एवढी दहशत निर्माण कशी होऊ शकते हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार, नागरिक ( आणि सोशल मीडिया ) यांनी परस्परांना विश्वासात घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना केल्यास 'कोरोना' च्या धोक्याला योग्य मार्गाने उत्तर देता येईल. कदाचित 'चिकनगुनिया', 'स्वाईनफ्ल्यू' सारखा 'कोरोना'ही अल्पकाळ टिकेल आणि नंतर नाहीसाही होईल मात्र त्याच्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीचा समाजजीवनावर गंभीर परिणाम होत आहे. मूळ रोगापेक्षाही हा रोग भयानक आहे. तो नष्ट करण्यासाठी समाजजीवनातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन साकल्याने विचार करण्याची गरज आहे.
----- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी ---- ९४२२३ १९१४३ )
Thursday, January 30, 2020
'' चहा --पुराण ''
'' चहा - पुराण ''
-------------------
'' मावळत्या वर्षातील अखेरच्या म्हणजे डिसेंबर महिन्यातील एका रविवारी जागतिक 'चहा- दिन' साजरा करण्यात आला. या जगात अनेक 'दिन' साजरे करण्यात येतात त्यामध्ये आता 'चहा-दिना'ची ची भर पडली आहे. अनेकांनी चहाचे घुटके घेत घेत त्यादिवशी 'चहा-दिन' साजरा केला असेल. तसे पाहता चहा म्हणजे जगातील असंख्य लोकांचे आवडते पेय. त्यामुळे हा 'टी-डे' 'टी-टाईम' न घेताच साजरा झाला असेल. वास्तविक भारतात ब्रिटिश लोक येण्यापूर्वी हा 'चहा' औषधालाही सापडत नव्हता, परंतु ब्रिटिश लोक भारतात आले ते 'चहा' घेऊनच आणि नंतर त्यांनी भारतीयांना या चहाचे असे जबरदस्त व्यसन लावले की, आज जगात इंग्लंड किंवा इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात जास्त लोक चहा पिणारे आहेत. असंख्य भारतीयांची रोजची सकाळच चहाने सुरुवात होते. ज्यादिवशी ज्यांना सकाळी चहा मिळाला नाही त्यादिवशी त्यांना ती सकाळच नव्हे तर अख्खा दिवस सुनासुना वाटून राहतो.अनेकजण तर सकाळी चहा पिल्याशिवाय अन्य कोणत्याही कामाला हात लावत नाहीत. काहीजणांचे ते 'स्फूर्तिपेय' आहे. चहाशिवाय त्यांना 'तरतरी' येत नाही त्यामुळे चहा हा अनेकांना 'अमृता' समान वाटतो. जणू काही पृथ्वीवरचे ते 'अमृत'च आहे अशा थाटात असंख्य लोक या चहाचा आस्वाद घेत असतात. म्हणूनच कदाचित पुण्यात केवळ 'अमृततुल्य चहा' मिळणारी कितीतरी दुकाने आहेत.
'अमृता' समान वाटणाऱ्या या चहाचे प्रकार तरी किती म्हणून वर्णावेत. 'साधा चहा', 'कटिंग चहा', 'स्पेशल चहा', 'मसाला चहा', 'मलई चहा', 'बासुंदी चहा', 'रबडी चहा', 'कडक चहा', 'कडक स्पेशल चहा', 'गोल्डन चहा' वगैरे वगैरे. त्यामध्ये आता नव्याने सांगायचे तर 'प्रेमाच्या चहा' चीही भर पडली आहे. अस्मादिक औरंगाबादला शिकत असताना तेथे चहाच्या टपरीवर 'मारामारी' नावाचा चहा मिळायचा. तो फारच 'चवप्रिय' आणि त्यामुळे 'लोकप्रिय' होता. ही 'मारामारी' म्हणजे 'साधा चहा' आणि 'स्पेशल चहा' यांचे मिश्रण असायचे. हे दोन्ही चहा पहिल्यांदाच मिसळताना या दोन्ही चहांची 'मारामारी' झालेली बहुधा त्या चहा दुकानदाराला दिसली असावी म्हणून त्याने त्या मिश्रणातून झालेल्या चहाला 'मारामारी' हे गोंडस नाव दिले असावे आणि 'मारामारी' करायला जरी नसली तरी 'पाहायला' कोणाला आवडत नाही त्यामुळेच 'ही 'मारामारी' लोकप्रिय झाली असावी.चहाच्या या प्रकारची यादी करायची म्हटले तर 'चहाच्या मळ्यातील चहाची 'पाने' अपुरी पडतील.
'तरुणाई' आणि चहा यांचे तर अतूट नाते आहे.कारण अनेक तरुणांना केवळ चहामुळे 'जिवाभावाचे मित्र भेटतात. केवळ मित्रच नाहीत तर मैत्रिणीही मिळतात आणि हो ! त्यातील एखादी नंतर जीवनाची साथीदारही झालेली असते. केवळ चहाच्या निमित्ताने एखाद्या सुंदर तरुणीची ओळख व्हावी म्हणून अनेक कॉलेज तरुण चहाचे 'व्यसनी' झाले आहेत. त्यामुळे निदान कॉलेजमधला तरुण तरी कोणी चहाची ऑफर दिली तर ती बहुधा नाकारीत नाही. कॉलेजचे पिरियड बुडवून कॉलेज कॅंटीनमध्ये (इकडे-तिकडे पाहत) चहाचे घुटके घेत घेत मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा यासारखे दुसरे सुख ते कोणते असेल. जवळजवळ प्रत्येक कॉलेज युवक अशा सुखात रममाण होऊनच आपल्या आयुष्याची पहिली पदवी घेत असतो. आमच्या कॉलेजमधील माझ्या एका वर्गमित्राचे कँटीन हेच 'कॉलेज' होते. कॉलेजचे तास 'बंक' करून तो सदासर्वदा कँटिनमध्येच चहा पिणाऱ्या मित्रांच्या गराड्यात असे. घरचा चांगला असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्याला चहा पाजणे हाच त्याने आपला 'स्वधर्म' मानला होता. अर्थात त्याचा हा 'स्वधर्म' त्याच्या चांगलाच फळाला आला. चहा पिता पिता त्याचे इतके मित्र झाले की तो एकेवर्षी कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून आरामात निवडून आला. आपल्या भावी काळातील राजकारण प्रवेशाचा श्रीगणेशा त्याने केवळ चहामुळे झालेल्या मित्रांच्या जोरावर केला होता. त्यामुळे कॉलेज कँटीन असो, कॉलेजजवळ असलेली कोण्या 'अण्णां'ची टपरी असो वा मोठे हॉटेल असो तेथे चहा पिणाऱ्या तरुणांची गर्दी ठरलेली असते. बदलता काळ लक्षात घेता 'चहाचा कट्टा' हा अनेक तरुणांचा 'माईलस्टोन' असतो असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
अशा या चहाचे व्यसन हे आरोग्याला घातक (विशेषतः तरुणाईच्या) आहे असे अनेक डॉक्टर्स सांगत असले तरी सहजासहजी हे व्यसन सोडायला कोणी तयार होत नाही कारण चहा हा आपल्या आदरातिथ्याचा अविभाज्य भाग बनला आहे. तुम्ही कोठेही जा तुमचे स्वागत या चहानेच होणार. चहाच्या जागी 'बासुंदी' जरी दिली तरी काहीजणांना ते 'स्वागत' अपुरेच वाटते. म्हणूनच 'बाईने कुंकूवाला आणि पुरुषाने घोटभर चहाला नाही म्हणू नये ' अशी नवी म्हण प्रचलित झाली असावी. एरवी घोटभर चहा औषधालाही न घेणारे काहीजण असतीलही मात्र या चहावर जगणारीही माणसे आहेत. दिवसाला २५-२५ कप चहा पिऊन ताजेतवाने राहणारे लोक जसे आहेत तसेच अन्न म्हणून केवळ चहाचे सेवन करणारे काहीजण सापडतील. यासंदर्भात काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात चौकटीत आलेली बातमी मला चांगली आठवते. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेडेगावातील 'चतुरा' नावाची महिला ही केवळ चहा पिऊन जगत होती. दररोज ती न जेवता केवळ चहाच घ्यायची. कारण तिला चहा इतका अंगवळणी पडला होता की, चहा हेच तिचे 'भोजन' होते. दिवसातून ३०-४० कप चहा पिऊन ती शेतात राबायची. चहाशिवाय तिला खायला-प्यायला लागत नसे. तिचा संसार असा 'चहामय' झाला होता आणि केवळ तिच्या घरात नव्हे तर अख्ख्या पंचक्रोशीत 'चहावाली चतुरा' म्हणून ती प्रसिद्ध होती. चहाप्रेमींच्या अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. लातूरला आमच्या महाविद्यालयात सामान्य प्रशासन विभागात काम करणाऱ्या एका कारकुनाला चहा पिण्याचं इतके जबरदस्त वेड होते की, त्याचा ऑफिसमधील निम्म्याहून अधिक वेळ कॅंटीनमध्ये जात असे. कोणताही विद्यार्थी त्याच्या कामासाठी ऑफिसमध्ये गेला तेंव्हा हा कारकून कधीच जागेवर सापडायचा नाही. आणि जरी तो जागेवर सापडलाच तरी तो त्या विद्यार्थ्याला हमखास म्हणणारच, ''पाच मिनिटांनी या, तोपर्यंत मी चहा पिऊन आलोच. अशा या कारकुनाला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील 'फिशपॉन्ड' च्या कार्यक्रमात 'चला च्या प्यायला' असा शेलका आहेर मिळाला होता. परंतु तो त्याने 'लाईट-चहा' इतकाच लाईटने घेतला त्यामुळे त्याच्या चहा पिण्याच्या कार्यक्रमात मुळीच बदल झाला नाही.
अलिकडच्या काळात तर भारतात 'चहा'चा गौरवाने उल्लेख होतो आहे. कारण एक सामान्य 'चहावाला' पंतप्रधान झाला आहे. त्यामुळे टपरीवाल्या चहावाल्यालाही हल्ली फार महत्व प्राप्त झाले. त्याच्याकडे कधी नव्हे ते आदराने पाहिले जात आहे. 'चहावाला' पंतप्रधान होऊ शकतो यापासून प्रेरणा घेऊन आमच्या पुण्यातील एका इंजिनिअर झालेल्या मित्राने नोकरीच्या मागे न लागता चक्क चहाचे दुकान थाटले आहे.अर्थात आपल्याला मिळालेली इंजिनिअरिंगची डिग्री फ्रेम करून आणि त्याला हार घालून आपल्या चहाच्या दुकानात लावायला तो विसरला नाही. त्याचा 'कडक' चाय आता अनेकांची तल्लफ भागवितो आणि आमचा मित्र 'कडक' मध्ये ऐटीत फिरतो. खरे तर चहापानाच्या निमंत्रणाचे सर्वत्र स्वागतच होते. मात्र राजकारणात मात्र हे 'चहापान' नाकारले जाते असा नेहमीचाच अनुभव आहे राज्यविधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सरकारने आयोजित केलेल्या 'चहापान' कार्यक्रमावर विरोधी पक्षांतर्फे बहिष्कारच घातला जातो असा जणू इतिहास झाला आहे. अनेकदा सत्तारूढ असलेला पक्ष कधीकाळी विरोधी पक्षात असतो तर विरोधी पक्ष सत्तारूढ झालेला असतो तरीही या 'चहापाना'वर बहिष्कार हा ठरलेलाच असतो. निदान 'चहा' वरून तरी त्यांनी राजकारण करू नये. चहा पिऊन झाल्यानंतर उर्वरित कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार घालावा अशीच तमाम चहाप्रेमींची इच्छा असेल. असे हे 'चहा-पुराण' कितीही सांगायला गेले तरी अपुरेच पडेल. चहाचे घुटके घेत घेत ते ऐकायला अनेकांना आवडेल याबद्दल कोणाच्याही मनात शंका राहणार नाही हे मात्र खरे.
---- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
Monday, December 23, 2019
'' कांदे -पुराण ''
'' कांदे -पुराण ''
----------------
" कांद्याच्या भाववाढीमुळे सध्या आपल्या देशात सर्वत्र 'कांदे -- पुराणा'ची चविष्टपणे चर्चा चालू आहे. कांद्यामुळे अनेक पदार्थ 'चविष्ट' होतात हे सर्वांनाच माहित असल्यामुळेच की काय या कांद्याची सगळीकडे चविष्टपणे चर्चा चालू झाली असावी. 'सोशल मेडिया' तर सध्या कांद्यावरच 'गुजराण' करीत आहे असे म्हणावे लागेल . अगदी 'टिकटॉक' पासून ते 'बिग-बी'च्या 'केबीसी' पर्यंत सर्वांचा वापर करून अनेकजणांनी आपल्या विलक्षण बुद्धिचातुर्याने ;(अर्थातच कांदा खाऊन ) कांदा-भाववाढीचे प्रकरण धसास लावले आहे. 'टिकटॉक' च्या माध्यमातून 'व्हाट्स ऍप' वर पाठविण्यात आलेल्या एका संदेशात ' एक माणूस जेवण करीत असताना प्रत्येक घासागणिक समोर टांगलेल्या कांद्याचा, टोमॅटोचा आणि लसणाचा हुंगून वास घेत आहे दृश्य दाखविण्यात आले आहे. कांद्याच्या भाववाढीची अशी छान खिल्ली हसायला भाग पाडत असेल हे खरे असले तरी कांद्याच्या भाववाढीमुळे निर्माण झालेया वांद्यामुळे सामान्य गृहिणीपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. एरवीही हा कांदा, इच्छा नसतानाही डोळ्यात पाणी आणतो आणि आता तर त्याचे गगनाला भिडलेले भाव पाहून अनेकांच्या डोळ्यातून खरेखुरे अश्रू येत आहेत. यामध्ये कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते मध्यमवर्गीय ग्राहकांपर्यंत सर्वांचाच सहभाग आहे. वास्तविक कांद्याचे पीक असे आहे की, ते उगवताना मूळ 'कांदा' दिसत नाही . कारण तो जमिनीखाली उगवतो आणि वरती असते फक्त त्याची 'पात'. थोडक्यात तो गुप्त असतो मात्र एकदा का तो प्रकटला आणि त्याचा वापर करायचे म्हटले की, तो भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
असा हा 'कांदा' बहुगुणी आहे. त्याच्या गुणांचे वर्णन किती म्हणून करायचे. तो प्रकृतीला पोषक तर आहेच शिवाय काही रोगांचा तो 'शोषक' आहे. पूर्वी प्रवासाला निघताना लोक आपल्या खिशात हमखास कांदा ठेवून जायचे असे म्हणतात कारण एक तर त्यामुळे भर उन्हामुळे 'उन्हाळी' लागायची नाही तसेच अतिश्रमामुळे व थकव्यामुळे भोवळ आल्यास हाच कांदा फोडून नाकाला लावल्यास शुद्धीवर यायला मदत होते असे. त्याशिवाय प्रवासातील मुक्कामात कोठे भोजन करायची वेळ आलीच तर तोच कांदा तोंडी लावायला कामी यायचा. कांद्याचा असा 'दुहेरी-तिहेरी ' उपयोग व्हायचा. कांदा तसे पहिल्यापासूनच गोरगरिबांचे खाद्य म्हणून ओळखला जातो. शेतकरीही आपल्या शेतात काम करून दुपारच्या वेळेला 'भाकरतुकडा' खायला बसला की, त्याच्या आसपासच जमिनीत लावलेला कांदा स्वतःच्या हातानेच तोडून भाकरी आणि कोरड्यासबरोबर तोंडी लावून खातो. त्यावेळी या कांद्यामुळे त्याच्या जेवणाला जी चव येते आणि जी लज्जत वाढते तिच्यापुढे कोणतेही स्वर्गीय सुख फिके पडते हा सार्वत्रिक अनुभव आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच अनेक गोरगरिबांच्या भोजनात या कांद्यामुळेच 'ब्रम्हानंद' निर्माण केला आहे. आमच्या लहानपणी शाळेत असताना आमच्या वर्गातील काही मुले शेजारच्या खेडेगावातून शिकायला यायची. रोज चार-पाच मैलाचा रस्ता तुडवीत ती मुले शाळेत यायची आणि जायची.;एकदा मध्यंतरात त्यांच्याबरोबर डबा खाण्याची वेळ आली. त्या सर्वांनी एका फडक्यात आपापल्या भाकऱ्या बांधून आणल्या होत्या. ;त्या भाकऱ्यांपैकी सर्वात वरच्या भाकरीवर सात-आठ मिरच्या ठेचलेल्या होत्या. तेच त्यांचे मुख्य कालवण होते. मात्र त्याबरोबर त्यांनी भरपूर पातीचे ;कांदे आणले होते. भाकरी, तो मिरच्यांचा खर्डा आणि तोंडी लावायला कांदे हेच त्यांचे दररोजचे जेवण होते. असे जेवण रोज करून त्यापैकी काहीजण उच्च शिक्षित झाले. त्यामुळे त्यांच्या जीवनातील कांद्याचे महत्व ते तरी कधीच विसरणार नाहीत.
कांद्याचा महिमा हा असा आहे. म्हणूनच की काय, या कांद्याला उतराई होण्यासाठी आजही ग्रामीण भागात 'कांदे-नवमी' मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यादिवशी जेवणात बहुतेक सर्व पदार्थ हे प्रामुख्याने कांद्याचे केले जातात. 'कांदा' एवढा लोकप्रिय का ? हे सांगण्यासाठी हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे. तुम्ही कोणाच्याही घरात गेलात आणि स्वयंपाकगृहात डोकावले तर दुरडीमध्ये 'कांदा' हमखास आढळून येतोच. खानावळी आणि हॉटेलमधील भटारखान्यात तर अनेक पोत्यांमध्ये हा कांदा दडून बसलेला असतो. त्यातील प्रत्येक कांद्यावर जणू काही प्रत्येक गिऱ्हाईकाचे नाव लिहिलेले असते आणि त्याप्रमाणे तो 'कांदा' पोटात गेल्यावर गिऱ्हाईक तृप्त मानाने बाहेर पडते. अशा या कांद्याला निषिद्ध मानणारेही काही लोक आहेत तसेच फक्त चातुर्मासात कांदा -लसूण न खाणारे लोक आहेत मात्र त्यांची संख्या नगण्य आहे त्यामुळे ते 'अल्पसंख्याक' गटात मोडतात आणि त्यामुळे त्यांची फारशी कोणी दखल घेत नाही.बहुसंख्याक लोकांचा कांद्यावर 'जीव' जडला असल्यामुळेच सध्या कांद्याच्या भाववाढीमुळे सगळेजण त्रस्त झाले आहेत आणि साहजिकच त्याचे राजकारणातही पडसाद उमटले आहेत.
यापूर्वी काही राजकीय नेत्यांना याच कांद्याने चांगले रडविल्याची उदाहरणेही आहेत. काही वर्षांपूर्वी सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत सत्तारूढ असलेले भाजपचे सरकार कांदा-भाववाढीमुळे निवडणुकीनंतर गडगडले होते. त्यामुळेच की काय विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'आपण कांदाच खात नसल्याचे सांगून कांदा-भाववाढीचे प्रकरण झटकून टाकण्याचा प्रयत्न केला खरा ;मात्र कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या सरकारला कांदा आयात करण्याचा निर्णय घ्यावाच लागला. यापूर्वीच्या सरकारने तर कांदा- भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्तानातून कांदा आयात केला होता आणि तेथून आलेला कांदाही भारतातील लोकांनी गोड मानून खाल्ला होता. थोडक्यात कांदा हा दोन राष्ट्रांच्या मैत्री मधील ( ते मित्र असोत की शत्रू ) महत्वाचा दुवा ठरू शकतो हेच यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. त्यामुळे कांद्याचे महत्व केवळ भोजनापुरते मर्यादित नसून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही किती महत्वाचे आहे हे लगेच लक्षात येईल. एका चित्रपटात नायिकेच्या तोंडी '' एक चुटकीभर सिंदूर की किंमत तुम क्या जानो बाबू? '' असे गाजलेले वाक्य आहे त्याच धर्तीवर एका कांद्याची किंमत रोज कांदा खाणाऱ्यालाच समजू शकते असे म्हणावे लागेल. अशा या बहुगुणी कांद्याचे हे 'कांदे-पुराण' सांगेल तेवढे कमीच म्हणावे लागेल.
----- श्रीकांत नारायण
( संपर्क ध्वनी -- ९४२२३ १९१४३ )
Monday, October 7, 2019
'' सुहाना सफर और ..... '' कवी शैलेंद्र यांच्या गीतमय जीवन-प्रवासाची वाचनीय सफर
'' सुहाना सफर और ..... '' कवी शैलेंद्र यांच्या गीतमय जीवन-प्रवासाची वाचनीय सफर
--------------------------------------------------------------------------
' १९५० ते १९७० ही दोन दशके हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ मानला जातो. या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा 'गाणी' हा आत्मा होता. त्या काळांतील चित्रपटांतील गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. चित्रपटाच्या कथेला अनुरूप ठरलेली अनेक गाणी अतिशय अर्थपूर्ण असायची आणि त्या गाण्यांना श्रवणीय चाल देऊन अनेक संगीतकारांनी त्या गीतांना अजरामर केले होते. त्या काळातील संगीतकार आणि गायक-गायिका जसे प्रतिभावान होते तसेच गीतकार देखील प्रतिभावान होते. गीतकार शैलेंद्र हे त्यापैकीच एक होत. आजही त्यांची शेकडो लोकप्रिय गाणी असंख्य रसिकांच्या ओठांवरती रेंगाळतात आणि ते या गाण्यांचा आनंद लुटतात. अशा या प्रतिभासंपन्न कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवन प्रवास सुप्रसिद्ध लेखक विजय पाडळकर यांनी ;'' सुहाना सफर और ..... '' या ग्रंथात शब्दबद्ध केला आहे. शैलेंद्र प्रेमी रसिकांच्या दृष्टीने तो एक सुहाना दस्तऐवजच ठरला आहे.
चित्रपट अभ्यासक असलेले विजय पाडळकर हे चांगले ललित लेखकही आहेत. कवी शैलेंद्र यांच्या प्रत्येक गाजलेल्या गीतांवर लालित्यपूर्ण भाष्य करताना त्यांनी त्या गीताचा, संगीताचा आणि चित्रपटाचा माहितीपूर्ण आढावा घेतला आहे तसेच शैलेंद्र यांच्या अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. त्यामुळे शैलेंद्र यांचा हा गीतमय जीवन प्रवास वाचनीय झाला आहे. कवी शैलेंद्र यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला. अतिशय सामान्य कुळातील कुटुंबात जन्मलेले शैलेंद्र हे लहानपणापासूनच कविमनाचे होते. तसेच लय -सूर-ताल यांची त्यांना जन्मजात देणगी होती. लहानपणापासूनच ते डफली छान वाजवायचे आणि त्या डफलीच्या तालावरच त्यांना अनेक समर्पक शब्दरचना सुचायच्या. त्यातूनच ते कविता करायला लागले. ;पुढे शिकत असताना त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव पडला. अतिशय संवेदनशील असलेले शैलेंद्र यांना सामाजिक अन्याय सहन होत नसे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक कवितांमधून दिसू लागले. आपल्या कविता लोकांना ऐकवणे त्यांना अतिशय आवडायचे त्यामुळे कविसंमेलनात त्यांचा सहभाग दिसू लागला. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेताना त्यांनी तुरुंगवासही भोगला मात्र नंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना सामान्य नोकरी करावी लागली. ;नोकरीनिमित्तानेच ते मुंबईत आले. आणि एका कविसंमेलनात निर्माता-दिग्दर्शक राज कपूर आणि त्यांची ओळख झाली. शैलेंद्र यांची काव्यप्रतिभा पाहून राज कपूर यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मात्र केवळ पैशासाठी चित्रपटासाठी गीतलेखन करणे मनस्वी कवी असलेल्या शैलेंद्र यांना पटले नाही त्यामुळे राज कपूर यांना त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट शब्दात नकार दिला. परंतु विवाहानंतर संसारी बनलेल्या शैलेंद्र यांना खूप आर्थिक ओढाताण सहन करावी लागली त्यामुळे नंतर त्यांनी राज कपूर यांची ऑफर स्वीकारली. आणि तेथून शैलेंद्र यांच्या गीतांची चित्रपटसृष्टीवर जी 'बरसात' झाली त्यामध्ये असंख्य रसिक भिजून चिंब झाले.
शैलेंद्र यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेताना, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कवी शैलेंद्र गीतकार शैलेंद्र झाले आणि त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आणि त्या 'इष्टापत्ती'मुळे दुसऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसंगीतालाही चांगले वळण मिळाले हे लेखकाने केलेले भाष्य मनोमन पटते. राज कपूर यांचे आवडते गीतकार होते शैलेंद्र तर आवडते संगीतकार होते शंकर-जयकिशन. ;या 'त्रयी' ने एक इतिहास निर्माण केल्यामुळे राज कपूर यांचे सर्वच चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात त्यांना यश मिळाले. सुरुवातीच्या 'बरसात' पासून 'मेरा नाम जोकर' पर्यंत राज कपूर यांच्या सर्वच चित्रपटांचे गीतलेखन शैलेंद्र यांनी केले त्यातील गाजलेल्या अनेक अर्थपूर्ण गाण्यांचे श्री पाडळकर यांनी या पुस्तकात सुंदर विवेचन केले आहे. शैलेंद्र यांनी राज कपूर खेरीज बिमल रॉय (मधुमती, परख आदी ), हृषीकेश मुखर्जी (अनुराधा, अनाडी आदी ), विजय आनंद (गाईड) आदी अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठीही गीत लेखन केले . ('गाईड' साठी तर विजय आनंद यांना शेलेंद्रच हवे होते ) या चित्रपटातील गाजलेल्या सर्व गाण्यांचा तपशीलवार आढावाही या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्यातून शैलेंद्र यांच्या गीतलेखनातील खुमारी अधिक स्पष्ट होते.
'तीसरी कसम' हा शैलेंद्र यांची निर्मिती असलेला एकमेव चित्रपट. मात्र त्याच्या निर्मितीपासून शैलेंद्र यांच्या आयुष्याला जी उतरती कळा लागली ती कायमचीच. त्यातून त्यांची सुटका केली ती मृत्यूनेच. एका अर्थाने ;'तीसरी कसम' हा चित्रपट शैलेंद्र यांची शोकांतिकाच ठरली. त्यासंदर्भात पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील घटनांचेही विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. त्यातून 'तीसरी कसम' ची काव्यात्मता आणि शोकात्मता शैलेंद्र यांच्याच वाट्याला कशी आली हे अधोरेखित होते. याशिवाय गीतकार शैलेंद्र यांनी 'बरसात' (१९४९) पासून 'ममता की छाव मे' (१९८९) पर्यंत लिहिलेल्या असंख्य चित्रपटातील गीतांची (संगीतकार आणि गायक-गायिकांच्या नावासह ) देण्यात आलेली सूची ही देखील या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
---- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
विजू खोटे : जमिनीवर पाय असलेला सच्चा कलावंत
विजू खोटे : जमिनीवर पाय असलेला सच्चा कलावंत
-----------------------------------------
" अफाट प्रसिद्धी मिळूनही अभिनेते विजू खोटे यांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले कारण मराठी मातीत जन्मलेले ते एक सच्चा कलावंत होते. चित्रीकरणादरम्यान मराठी तसेच हिंदी चित्रपट कलाकारांना त्यांचा हा अनुभव नेहमीच यायचा. त्यांच्या निधनामुळे एक अजातशत्रू, मनमिळावू आणि अभिनयकलेवर मनापासून प्रेम करणारा सच्चा कलावंत हरपला आहे असेच म्हणावे लागेल.
अभिनेते विजू खोटे यांच्या निधनाचे वृत्त कानावर आले आणि चटकन डोळ्यासमोर उभा राहिला तो 'शोले' चित्रपटातला त्यांनी रंगविलेला 'कालिया' नावाचा डाकू आणि डाकूंचा सरदार असलेला अमजदखान याला उद्देशून म्हटलेला त्याचा तो अतिप्रसिद्ध डॉयलॉग ... '' सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं '' तसेच 'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील त्याने रॉबर्टच्या भूमिकेत '' बॉस, गल्तीसे मिस्टेक हो गयी '' हा स्वतःची चूक लक्षात आल्यावर प्रत्येक वेळी म्हटलेला डॉयलॉग. अभिनेते विजू खोटे चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकाच करायचे मात्र प्रत्येक भूमिका वेगळी असूनही ती प्रेक्षकांच्या लक्षात कशी राहील यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे 'या मालक' या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटापासून नंतर असंख्य हिंदी चित्रपटांत त्यांनी रंगविलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्या आणि मोठ्या पडद्यावरील एक प्रमुख 'ओळखीचे चेहरा' म्हणून ते नावारूपास आले.
विजू खोटे यांचा जन्म १९४१ साली मुंबईतील एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील नंदू खोटे हे देखील नाट्य आणि चित्रपट व्यवसायातील नावाजलेले कलावंत होते. तर विजू खोटे यांच्या 'काकी' दुर्गा खोटे या तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांच्या घरातच अभिनयकलेचे वातावरण होते. नंदू खोटे यांनी १९६४ साली 'या मालक' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आणि त्याद्वारे विजू खोटे यांची मोठ्या पडद्यावर 'एंट्री' झाली. 'या मालक' चे नायक-नायिका होते प्रसिद्ध विनोदी कलाकार मेहमूद आणि शुभा खोटे. मेहमूद यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. या चित्रपटाची नायिका असलेली शुभा खोटे ही विजू खोटे यांची सख्खी बहीण. खरे तर शुभा खोटे यांच्यामुळेच विजू खोटे यांना हिंदी चित्रपटांत भूमिका करण्याची संधी मिळाली. तो एक विलक्षण योगायोग होता असेच म्हणावे लागेल . त्याचा किस्सा खुद्द विजू खोटे यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता.
त्याचे असे झाले.... शुभा खोटे यांनी नुकतीच सहकलाकार म्हणून हिंदी चित्रपटात भूमिका करण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका देण्यासाठी एक हिंदी निर्माता खोटे यांच्या घरी आला. 'विजू' हे नाव थोडेसे स्त्रीलिंगी असल्यामुळे तो शुभा खोटे यांचे नाव विजू खोटे असे समजूनच तो भेटायला आला होता. आणि त्यादिवशी नेमक्या शुभा खोटे घरी नव्हत्या. त्याला सामोरे गेले ते विजू खोटे. आणि नंतर साहजिकच त्या निर्मात्याचा गैरसमज दूर झाला. मात्र त्या निर्मात्याला काय वाटले कोणास ठाऊक, तो विजू खोटे यांना म्हणाला की, मी आलो होतो तुमच्या बहिणीसाठी परंतु मी तुम्हालाही छोटीशी भूमिका देऊ शकतो तुमची इच्छा असल्यास तुम्ही ती भूमिका करू शकता. विजू खोटे यांनी यांची ही ऑफर स्वीकारली आणि अशा रीतीने विजू खोटे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री झाली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका केल्या. आपल्या बहिणीमुळे आपल्याला हिंदी चित्रपटात संधी मिळाली त्याबद्दलची कृतज्ञता ते कधीच विसरले नाहीत. एक कलाकार म्हणून शुभा खोटे आणि विजू खोटे ही गाजलेली बहीण-भावाची जोडी चित्रपटसृष्टीत एक अनोखे उदाहरण ठरली होती.
विजू खोटे यांच्या व्यक्तीमत्वामुळे त्यांना सुरुवातीला हिंदी चित्रपटात गुंड किंवा तत्सम भूमिका मिळाल्या. ('अशी ही बनवाबनवी' या मराठी चित्रपटात देखील त्यांनी एका गुंडाचीच भूमिका केली होती) मात्र कोणतीही भूमिका वाईट नसते या भूमिकेतूनच त्यांनी प्रत्येक भूमिका केली आणि ती प्रेक्षकांच्या कायम कशी लक्षात राहील अशा पद्धतीने पेश केली. वास्तविक शुभा खोटे यांचेच ते बंधू असल्यामुळे त्यांना विनोदी भूमिका करण्याची अधिक आवड होती. त्याप्रमाणे त्यांना विनोदी भूमिकाही मिळत गेल्या आणि त्याही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्या लक्षात राहिल्या. एक काळ तर असा होता की, एकीकडे खलप्रवृत्तीच्या भूमिका करताना त्यांनी दुसरीकडे त्याला विनोदाचीही डूब दिली. त्यामुळे त्यांनी रंगविलेला 'शोले' चित्रपटातील 'कालिया' त्याचप्रमाणे 'अंदाज अपना अपना' मधील 'रॉबर्ट' देखील प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून बसला. 'शोले' चित्रपटातील डाकूंचा सरदार असलेला अमजदखान याला उद्देशून म्हटलेला त्यांचा तो अतिप्रसिद्ध डॉयलॉग ... '' सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं '' खूपच गाजला आणि विजू खोटे यांना एका रात्रीत भारतभर प्रसिद्ध मिळाली. 'कालिया' च्या भूमिकेबद्दल त्यांना त्यावेळी अवघे २५०० रुपये मानधन मिळाले होते मात्र भूमिकेपुढे त्यांनी पैशाला कधीच महत्व दिले नाही त्यामुळे आजही जेंव्हा 'शोले' चित्रपट आठवतो तेंव्हा त्यातील त्यांचा हा प्रसिद्ध डॉयलॉग अगदी सहजतेने आठवून त्यांचा तो 'कालिया' डोळ्यासमोर येतो. एका छोट्याश्या भूमिकेबद्दल आणि एका डॉयलॉगमुळे एवढी प्रचंड प्रसिद्धी मिळालेले विजू खोटे हे एकमेव अभिनेते असतील. मात्र एवढी अफाट प्रसिद्धी मिळाली तरीही त्यांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले कारण मराठी मातीत जन्मलेले ते एक सच्चा कलावंत होते. चित्रीकरणादरम्यान मराठी तसेच हिंदी चित्रपट कलाकारांना त्यांचा हा अनुभव नेहमीच यायचा. समोरच्या कलाकारांची अडचण ओळखून ते त्यांना नेहमीच सहकार्य करायचे. त्यांच्या निधनामुळे एक अजातशत्रू, मनमिळावू आणि अभिनयकलेवर मनापासून प्रेम करणारा सच्चा कलावंत हरपला आहे असेच म्हणावे लागेल.
----- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
Subscribe to:
Posts (Atom)